Saturday, October 28, 2017

बंड्या उवाच - अन्न हे पूर्णब्रह्म !

प्रसंग - पुण्यातल्या कोणत्याही मंगल कार्यालयातल्या कोणत्याही "आमच्या बाळ्याचं" त्यांच्या "चिसौकां" बरोबरचं शुभमंगल (किंवा कोणताही प्रसंग, तेरावं सोडून!)

उपस्थित मंडळी - बंड्या, बंडी आणि नोकरीच्या ठिकाणी "आलोच जेवून" असं सांगून अक्षता टाकायला पोचलेली, आणि प्रत्येकी एक डोळा जेवण कधी वाढतायत तिकडे लावून बसलेली बरीच जनता. एखादा अगदीच गांजलेला IT वाला कानाला मोबाईल लावून कानात प्राण आणून तेवढ्यात मीटिंग अटेंड करतोय.

अक्षता (एकदाच्या) पडतात, शुभमंगल पार पडतं आणि बंड्या, बंडी आणि मंडळी मुख्य कामासाठी भोजनगृहाकडे वळतात. पटापट खुर्च्या बळकावून बसून घेतात.

पाहता पाहता अर्धं जेवण होत येतं, बंड्यानं आवडतं म्हणून आम्रखंडाची वाटी संपवून अजून एकदा मागून घेतलेलं असतं. आता इथून पुन्हा ऑफिसला जाऊन तीनची मीटिंग न पेंगता कशी पार पाडायची या टेन्शनमध्ये बंड्या मठ्ठा संपवतो आणि नेमके चार खुर्च्या सोडून खणखणीत आवाज येतो ...

"अरे वाढ त्याला .. वाढ. नाही काय म्हणतो.  जाऊन मस्त झोपायचंच आहे ना. नाही म्हणायचंच नाही. तू बघतोयस काय .. वाढ रे!"

बंड्याच्या त्या डब्ब पोटातही त्या आवाजानं गोळा येतो आणि तो हळूच डोकावून बघतो. अर्थात तो आवाज ऐकून सगळ्या पंगतीचेच कान टवकारलेले असतात.

बंड्याच्या चार खुर्च्या पलीकडे साधारण पन्नाशीच्या आसपासचे सदुकाका बसलेले असतात. त्यांच्यापुढे दोन इंचांवर दामूकाकांची ढेरी आणि त्यामागे सहा इंचावर दामूकाका उभे. बाजूला त्यांचा हक्काचा आग्रहगडी केशव. केशवच्या हातात आम्रखंडानं उचंबळणारी थापी.  सदुकाका केविलवाण्या चेहऱ्यानं त्या थापीचं त्यांच्या पानावरचे आक्रमण थोपवायला बघतायत. पण दामूकाका आग्रहाच्या बाबतीत कुणाला ऐकणारे नाहीत. आपण आग्रह करकरून लोकांच्या घशात अन्न कोंबलं नाही तर लोक उपाशी  मरतात यावर त्यांचा ठाम विश्वास. मग त्या आग्रहाच्या मध्ये कोणीही येणे नाही. ना सदुकाकांच्या विनवण्या, ना सदुकाकांचा बळावलेला मधुमेह.

मागच्याच महिन्यात सदुकाका त्यांच्या मधुमेहामुळे हॉस्पिटलची वारी करून आले होते. पण आता हा आम्रखंडाचा ताटात येऊन पडलेला डोंगर संपवणं भाग होतं, आणि तोही दामूकाका परत परात घेऊन येण्याच्या आधी! आपत्तीत पडल्याप्रमाणे सदुकाका चमचा उचलतात. तोवर दामूकाका पुढच्या सावजाकडे वळतात.

चार खुर्च्या आटोपून विजयी मुद्रेनं दामूकाका बंड्याच्यासमोर पोचतात. बंड्या आम्रखंडाची वाटी हातानं झाकतो.

"असं चालायचं नाही . लाजतोय काय!" - दामूकाका
"माझं पोट भरलंय . अगदी न लाजता खाल्लंय मी, आणि गोड जरा कंट्रोल करतोय सध्या " - इति बंड्या
"बघितलं का.. हि आजची पिढी. यांचे नखरेच फार."
"नखरे कसले काका... माझं पोट भरलंय , आणि इथून परत ऑफिसला जायचंय."
"ते काही नाही चालायचं. आग्रहाचं गोड घेतलंच पाहिजे"
"अहो कशाला आग्रह ? मी काय लाजत नाहीये . चांगला ताव मारून खाल्लंय"
"मग एक-दोन डाव आम्रखंडाने काय फरक पडतो रे? वाढ रे त्याला केशव. वाटी सोडली नाही तर बाजूला ताटात वाढ"

केशव उत्साहानं पुढे सरसावतो. बंड्या थंडपणे त्याच्याकडे एक नजर टाकतो. केशव जागेवर थिजतो. बंड्या वाटीवरचा हात बाजूला घेतो.

"ठीक आहे. वाढा वाढायचं असेल तर ...", इथे दामूकाकांचा अहंकार सुखावयाला लागलेला असतो तोच बंड्या वाक्य पूर्ण करतो, "... पण मी खाणार नाही. वाया जाईल ".

दामूकाकांच्या कपाळावरची शीर क्षणभर ताडकन उडते.

"काय म्हणालास??"
"तुम्ही ऐकलं तेच. जबरदस्तीनं वाढलं तर मी खाणार नाही. माझं पोट भरलं कि मी उठून जाणार."
"लाज वाटते का असं बोलायला? या देशात एवढी लोकं भुकेनं मरतात रोज, आणि तुम्ही खुशाल अन्न टाकता! अरे अन्न वाया घालवणं पाप असतं .. शिकवलं नाही का कुणी तुला ?"
"अच्छा .. म्हणजे अन्न वाया घालवणं पाप असतं हे पटतंय तर तुम्हाला काका !"
"अर्थात, तुलाच ते कळत नाहीये"
"बर मग मला सांगा, ज्या माणसाचं पोट भरलंय त्याला जबरदस्ती करून करून अन्न वाढणं म्हणजे अन्न वाया घालवणं नाहीये का? जे लोक बाहेर भुकेनं मरतायत म्हणताय त्यांना द्या कि हे सुग्रास अन्न. ज्या क्षणी तुम्ही ते अन्न जबरदस्तीनं वाढलं त्याच क्षणी ते वाया गेलं. पाप झालं. आता ते नको असताना खाऊन , माझ्या शरीरावर अन्याय करून, मी दुसरं पाप करू का?"

अर्थातच या प्रश्नाचं उत्तर दामूकाकांकडे नसतं, आणि त्यामागचं लॉजिक समजून घेण्यात अहंकार आड येत असतो. त्यामुळे आजची पिढी कशी उर्मट आणि परंपरा न जुमानणारी आहे यावर पुट्पुट करत ते पुढच्या रांगेकडे वळतात आणि नव्या दमानं अन्नाची नासाडी सुरु करतात.

बंड्याच्या अलीकडच्या खुर्च्यांवरची लोकं मनातल्या मनात बंड्याचे आभार मानतात आणि दामूकाका दुसऱ्या रांगेत आहेत तोवर आपलं जेवण आटपायच्या मागे लागतात .


ताजा कलम: पहिल्या परिच्छेदात लिहिलेलं माझं वाक्य मी परत घेतो. मी एका तेराव्यालापण एका अतिउत्साही कार्यकर्त्याला लाडूचा आग्रह करताना पाहिलंय!

Monday, October 16, 2017

शब्दचित्रं - पुनर्जन्म - भाग १


कधी कधी मागे वळून बघताना अशा काही आठवणी येतात ज्या आपण पूर्ण विसरून गेलेलो असतो, किंवा आपण त्या जाणून बुजून मनाच्या एखाद्या खोल कप्प्यात दडवून टाकलेल्या असतात. आज दिवाळीच्या निमित्तानं एकदम अशी एक आठवण आली, माझ्या (पहिल्या) पुनर्जन्माची!

मी कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होतो त्यावेळची गोष्ट. दिवाळीची वेळ होती. मी आणि माझा एक मित्र अवी एका संध्याकाळी काही कामासाठी अप्पा बळवंत चौकात गेलो होतो. आधीच तो अप्पा बळवंत चौक, आणि त्यात दिवाळीची वेळ. त्यामुळे सगळा चौक माणसांनी दुथड्या भरून वाहत होता. सगळीकडे दिव्यांच्या माळांची रोषणाई होती. दुकानं प्रकाशानं लखलखत होती. जिकडे तिकडे लोकच लोक दिसत होते.

मी आणि अवी नूमवि (नूतन मराठी विद्यालय .. नॉन पुणेकरांच्या माहितीसाठी !) जुनिअर कॉलेजजवळ पोचलो होतो. त्याचं घर नूमविला लागूनच असलेल्या बिल्डिंगमध्ये होतं. त्याला घरातून काहीतरी आणायचं होतं, बहुदा तो त्याचं पैशांचं पाकीट घरी विसरला होता. आता नक्की काहीच आठवत नाही कि तो परत घरी का गेला, पण त्या नंतरची घटना मात्र अगदी धडधडीत आठवतेय.

अवी त्याच्या घरी गेला तोवर मी रस्ता पार केला आणि समोरच्या बाजूला थांबलो. मी तिथेच नूमविच्या बाजूला न थांबता रस्ता पार का केला? हेपण मला आठवत नाही. कदाचित त्या बाजूला दुकानं होती म्हणून टाईमपाससाठी गेलो असेन, किंवा पुढे जे होणार होतं ते घडवून आणण्यामधली ती एक पायरी असावी ... माहित नाही. पण मी रस्ता पार करून थांबलो खरा. थांबलो तोही तिथल्या दुकानांकडे पाठ करून रस्त्याच्या बाजूला तोंड करून. समोरून अखंड चालणारी माणसं आणि थांबत थांबत रडतखडत चाललेल्या वाहनांचा अखंड कोलाहल चालू होता. ती सगळी गम्मत बघत मी उभा होतो.

आणि माझी नजर त्याच्यावर पडली. सगळ्या नटूनथटून बाहेर पडलेल्या लोकांमध्ये एकदमच वेगळा दिसणारा. अतिशय गलिच्छ, फाटके कपडे... कपडे कसले , लक्तरंच. केसांच्या जटा. अनवाणी पाय. भिरभिरणारी अस्वस्थ नजर. तोंडातून गळणारी लाळ. बघितल्याबरोबर शिसारी यावी असा अवतार. मला वाटलं कि एखादा भिकारी असावा. असे भिकारी ही दुर्दैवानं आपल्या शहरांच्या रस्त्यांवर नाक्यानाक्यावर दिसतात. त्या मुळे त्या माणसाचं तिथे असणं मला फारसं विशेष वाटलं नाही. माझी नजर त्या भिकाऱ्यावर गेली आणि एक-दोन सेकंद स्थिरावली, तिरस्कार किंवा करुणा कोणत्याच भावनेनं नाही, तर केवळ तो माणूस एकदम "आऊट ऑफ प्लेस" वाटला म्हणून.

आणि नेमक्या त्याच एक-दोन सेकन्दात त्याची ती भिरभिरणारी नजर माझ्याकडे वळली. आमची नजरानजर झाली आणि त्याचक्षणी मला जाणीव झाली कि हा नुसता भिकारी नाहीये, तर ठार भ्रमिष्ट आहे. मी चटकन नजर दुसरीकडे वळवली, पण त्या माणसानं एव्हाना त्याच्या चालण्याची दिशा बदलून माझ्याकडे मोर्चा वळवला होता, एवढ्या सगळ्या गर्दीमध्ये!

१-२ सेकंदातच ढांगा टाकत तो तो माझ्यासमोर येऊन उभा राहिला, गलिच्छपणे थुंकला आणि काहीतरी अगम्य बोलायला लागला. तो माझ्यापासून ५-६ फुटांवर उभा होता तरी त्याच्या अंगाची असह्य दुर्गंधी माझ्यापर्यंत येत होती. आधी त्याच्या नजरेला नजर देऊन मी एक चूक केली होती, त्या असह्य दुर्गंधीला वैतागून मी दुसरी मोठी चूक केली. मला वाटलं कि मी जर त्याच्याकडे सपशेल दुर्लक्ष केलं तर तो निघून जाईल, आणि मी त्याच्याकडे पाठ फिरवली.

दुसऱ्याक्षणी त्या वेड्या माणसानं मागून माझ्यावर झडप घातली आणि एका हाताचा घट्ट विळखा माझ्या गळ्याभोवती घालून सर्वशक्तीनिशी आवळला! एका क्षणात माझा श्वासाचा मार्ग पूर्ण बंद झाला. मानेला जोरदार हिसका बसून मी मागे ओढला गेलो. तो असह्य दुर्गंध आता नाकाला जाणवत नव्हता, कारण त्याहून मोठा प्रॉब्लेम आता माझ्यापुढे होता. श्वास बंद झाला होता, त्या अचानक बसलेल्या हिसक्यानं मान आणि गळ्याचे स्नायू प्रचंड दुखावले होते आणि डोळ्यापुढे अंधारी यायला सुरुवात झाली होती. मी दोन्ही हातांनी त्याची ती मगरमिठी सोडवायचा प्रयत्न करत होतो. पण त्याची पकड राक्षसी होती. खरं तर देहयष्टीनं तो एवढा कुपोषित माणूस होता कि फुंकर मारली तर पडेल. पण डोकं फिरलं कि असे लोक दहा लोकांना ऐकत नाहीत.

एव्हाना माझ्या हातापायातला जीव जाऊन ते लुळे पडायला सुरुवात झाली होती. आसपास एव्हाना लोकं जमा झाली होती, पण कुणीच मदतीला आलं नाही. सगळे गम्मत बघत उभे होते. त्या वेळी मोबाईल फोन नव्हते, नाहीतर तो झटापटीचा व्हिडीओ "व्हायरल" पण झाला असता!

अचानक गर्दीतल्या कुणाचीतरी ट्यूब पेटली आणि तो ओरडला... "अरे हा वेडा माणूस आहे" (हे तो त्याच्याकडे बघून म्हणाला!).... "सोडवा त्या पोराला" (हे तो माझ्याकडे बघून म्हणाला)! तरीपण कुणाची पुढे होऊन त्याला पकडायची छाती होत नव्हती. पण लोकांनी आरडाओरडा सुरू केल्यावर त्या वेड्याचा धीर सुटला आणि माझ्या गळ्यावरची त्याची पकड सैल झाली. मी पोट भरून श्वास घेतला आणि एक जोरदार हिसका देऊन बाजूला झालो. एव्हाना बिथरून तो वेडा पळत सुटला होता आणि माझा पारा चढला होता. मी त्याच्या मागे धावत सुटलो आणि त्याच्या पाठीत लाथ घातली. तो वेडा तोंडावर आपटला. मी लाथाबुक्क्यांनी त्याला तुडवायला सुरुवात केली. माझं डोकं एवढं चढलं होतं की त्यावेळी मी त्याला किती मारला असता माहीत नाही. २-३ लोकांनी मला धरून मागे ओढलं आणि समजूत घातली, तोवर तो वेडा गर्दीत दिसेनासा झाला होता.

हि सगळी घटना केवळ १-२ मिनिटात झाली असेल. पण माझा गळा पुढे महिनाभर दुखला. गळ्यावर लाल काळे व्रण त्याहून जास्त काळ टिकले, आणि ती आठवण आयुष्यभराची राहिली!

हि घटना घडल्यावर माझी लगेचची प्रतिक्रिया तीच होती जी सगळ्या व्हिक्टिम्सची असते ... हे माझ्याच बाबतीत का झालं? पण नंतर मी जेव्हा त्याबद्दल विचार करतो तेव्हा मनात विचार येतो.. मी नसतो आणि त्या वेड्यानं एखाद्या लहान मुलाचा किंवा एखाद्या मुलीचा गळा आवळला असता तर? किंवा एखाद्या म्हाताऱ्या व्यक्तीचा? शेवटी मला त्यामधून कोणतीही कायमस्वरूपी इजा झाली नाही हे महत्वाचं! पण त्यामुळे ती दिवाळी कायमची लक्षात राहिली हे मात्र खरं!

Friday, October 13, 2017

शब्दचित्र - इगो


माझा "श्रीगणेशा" हा माझ्या चित्रप्रवासाबद्दल लिहिलेला लेख आणि त्या नंतरचे लेख वाचून बऱ्याच प्रतिक्रिया आल्या. त्यातील बऱ्याच चांगल्या होत्या, काहीजणांनी काही बदल सुचवले. काहीजणांना काही गोष्टी खटकल्या. पण यातली एक प्रतिक्रिया जास्त लक्षात राहिली आणि त्यासाठीच हा लेख लिहायला घेतला.

परवा माझा माझ्या एका मैत्रिणीशी फोन झाला. त्या वेळी बोलता बोलता त्या लेखाचा विषय निघाला आणि मी तिला त्याबद्दल फ्रॅंक फीडबॅक विचारला. त्यावर तिचं असं मत पडलं की
१. त्या लेखामध्ये एक प्रकारचा "I have arrived" प्रकारचा एक दर्प जाणवला आणि
२. इगो या भावनेचं त्यामध्ये उदात्तीकरण केलं गेलंय.

या दोन्ही गोष्टी जशा तिला जाणवल्या तशा इतरही कुणाला जाणवल्या असतीलच. काही वेळा लिहिताना आपल्याला जे म्हणायचं असतं आणि वाचक जे वाचतो त्या मध्ये व्यक्ती व्यक्ती मध्ये फरक पडू शकतो आणि पडणारच. पण मला या गोष्टी clarify कराव्याश्या वाटल्या.

त्या लेखाचा उद्देश हा केवळ त्या त्या वेळी क्षुल्लक वाटणारी एखादी गोष्ट आपल्या आयुष्यावर केवढा खोलवर परिणाम करू शकते हे सांगण्याचा होता. मी फार ग्रेट आर्टिस्ट नाही आणि कलाक्षेत्र हे एवढं विस्तीर्ण आहे की शंभर जन्म त्यामध्ये घालवले तरी "I have arrived" असं काही होणार नाही. इंटरनेटमुळे जगभरातल्या कलाकारांचं एवढं आर्टवर्क रोज समोर येतं की अजून किती आपण मागे आहोत हेच जाणवत राहतं.

दुसरा आणि महत्वाचा मुद्दा ...इगो. आपल्या आसपास इगो हा शब्द फक्त वाईट अर्थानं वापरला जातो. कारण सगळीकडे ईगोची वाईटच अभिव्यक्ती आपल्याला दिसत राहते. रस्त्यावरून लोकांची पर्वा न करता रॅश ड्रायव्हिंग करणारे लोक असोत कि छोट्या छोट्या गोष्टींवरून आपल्या हाताखालच्या लोकांचा अपमान करणारे बॉस असोत. मी ज्या अर्थानं इगो हा शब्द लेखात वापरला त्यामध्ये असा इगो अभिप्रेत नव्हता. त्यातला इगो हा "स्वभान" या अर्थी होता. लोकांचा अपमान करणारे लोक खरंतर न्यूनगंडानं गांजलेले असतात. आपण पुढे जाण्यापेक्षा इतरांना मागे ओढणं कधीही सोपं ही त्यांची विचारसरणी असते. त्याउलट स्वभान असणारे लोक असतात.

आपल्या आणि पश्चिमेच्या संस्कृतींमध्ये असलेला मोठा फरक म्हणजे आपल्याकडे मुलांच्या सर्व गोष्टींमध्ये होणारी पालकांची ढवळाढवळ! त्यामुळे लहानपणापासूनच स्वतःचे निर्णय स्वतः घेणं आणि मुख्य म्हणजे त्या निर्णयांची जबाबदारी स्वतः घेणं याची मुलांना सतत भीती वाटते. लोक काय म्हणतील हा विचार मला काय वाटतं यापेक्षा नेहमी प्रबळ होऊन राहतो.

याचं एक उदाहरण मी काही वर्षांपूर्वी पाहिलं. आम्हां काही मुला-मुलींचा ग्रुप एकदा गप्पा मारत होता. बोलता बोलता विषय सुरु झाला की प्रेमविवाह चांगला की ठरवून केलेला. माझ्या एका मैत्रिणीनं त्यावेळी ठामपणे मत मांडलं की लग्न हे ठरवूनच झालं पाहिजे. आणि त्यासाठी तिनं दिलेलं कारण फारच जबरदस्त होतं. ती म्हणाली, लग्न जर का आई-बाबानी ठरवून करून दिलं असेल आणि पुढे माझं नवऱ्याशी पटलं नाही तर ती जबाबदारी माझ्यावर येत नाही ना! म्हणजे लग्नासारख्या आयुष्य व्यापून टाकणाऱ्या घटनेतसुद्धा चुकीचा पार्टनर मिळण्याच्या भीतीपेक्षा तिला जबाबदारी घेण्याची भीती जास्त होती!

लहानपणापासून सतत आपले निर्णय दुसऱ्या कुणीतरी घेण्याच्या या सवयीमुळे बहुतेक सगळ्या लोकांचा "मी"पणा कुठेतरी हरवून जातो. सतत लोकांना काय वाटेल याचा विचार करताना आपल्या आवडीच्या गोष्टी करणं, स्वतःला वेळ देणं या सारख्या साध्या गोष्टींनीसुद्धा अपराधीपणा वाटतो. ज्या लोकांचा इगो (चांगल्या अर्थानं) जागा असतो ते अशा गोष्टींना धूप न घालता आयुष्य जगतात, आपले निर्णय स्वतः घेतात आणि त्या निर्णयांच्या भल्या-बुऱ्या परिणामांची जबाबदारीही स्वतः घेतात.

हा इगो कलाकार लोकांमध्ये जास्त असतो, कारण ते लोक कलाकार होण्याचं त्यांचा इगो हे एक महत्वाचं कारण असतं. अर्थात नॉर्मल लोकांप्रमाणेच काही कलाकारांच्या बाबतीत हा इगो त्यांच्या उत्तम कामातून व्यक्त होतो तर काही कलाकारांच्या उर्मट आणि लहरी वागणुकीतून. स्वभान असणारे कलाकार सतत स्वतःला "पुश" करत राहतात, कारण त्यांना माहित असतं की त्यांच्यामध्ये अजून पुढे जाण्याची, जास्त सुंदर निर्मिती करण्याची क्षमता आहे. बाकी कलाकार "I have arrived" असं समजून इतरांना तुच्छ लेखतात, स्वतःचा विकास थांबवतात, आणि कधीतरी कलाकार म्हणून तरी मरून जातात.

तात्पर्य हे, कि इगो, राग, प्रेम या सगळ्या भावना आहेत. या भावना चांगल्या किंवा वाईट नसतात. त्या व्यक्त कशा होतात आणि त्यातून outcome काय येतं हे महत्वाचं!

Monday, October 9, 2017

बंड्या उवाच - पेन्शनर काका

परवा शनिवारच्या दिवशी बऱ्याच दिवसांनी एका "मराठी बाणा" बँकेत जाण्याचा योग आला. आजकाल ऑनलाईन बँकिंगमुळे बँकेत जाण्याची गरजच पडत नाही, आणि तशी वेळ आलीच तरी खासगी बँकांमध्ये जाण्याची, जिथे सॅलरी अकाउंट्स असतात. तिथे बँकेत आल्या आल्या कोणीतरी आपली चौकशी करतं आणि आपल्याला योग्य त्या काउंटरकडे धाडतात. सरकारी ऑफिसेस आणि "बाणा"वाल्या जागांची वेगळीच खासियत असते. बाहेरच्या जगात तुम्ही कोण पण तीस मार खां असा, तुम्हाला आत गेल्याबरोबर आपण एवढं बावळट असल्याचं फीलिंग येतं कि आपण पार पंक्चरच होऊन जातो.
या बँकेतही माझं असंच झालं. मला थोडे पैसे काढायचे होते. withdrawal स्लीप भरणे आणि ते कॅशियरला दाखवून पैसे काढणं एवढ्याच जुजबी ज्ञानावर मी पुढे गेलो, तर कोणत्या काउंटरला जावं तेच कळेना! २-३ काउंटर फिरून आलो तर माझ्याकडे कोणी लक्षच दिलं नाही. हे बघत असलेल्या वॉचमनला माझी दया आली आणि त्यानं मला कोणत्या लाईनित जायचं ते दाखवलं.
हि जी "लाईन" होती ती बैठी होती. ४-५ लाईनमध्ये खुर्च्या मांडल्या होत्या आणि त्यावर सगळे इच्छुक स्थानापन्न झाले होते. मी गुपचूप शेवटच्या रिकाम्या खुर्चीवर टेकलो. दर वेळी पुढच्या लाईनीत कुणाचा नंबर आला की सगळी लोकं उठून पुढच्या खुर्चीवर बसायची. आपली लाईन संपली कि पुढच्या लाइनीतल्या खुर्चीवर.
माझ्या शेजारी एक पेन्शनर काका बसले होते. दर वेळी उठून पुढच्या खुर्चीवर बसण्याच्या या सक्तीच्या व्यायामानं ते जेरीस आले होते. मी हुशारीनं वेळ घालवायला पुस्तक घेऊन आलो होतो. काकांना काहीच टाईमपास नव्हता. पुढच्या लाईनीत बसलेल्या ऑफशोल्डर टॉप आणि टाइट जीन्स घालून बसलेल्या तरुणीकडे बघून बघूनही शेवटी त्यांना कंटाळा आला, आणि त्यांनी माझ्याकडे मोर्चा वळवला.
"हि असली लाईनची सिस्टिम सगळ्या जगात फक्त इथेच असेल".
माझं डोकं पुस्तकातून वर आलं.
"हो ना". परत मी पुस्तकात गेलो.
"आजकाल कोणी तरुण लोक अशा बँकेत येतात तरी का!"
आता माझ्या दाढीचे खुंट थोडे वाढलेले होते आणि त्यातले काही केस चंदेरी होते, म्हणून काकांनी लगेच मला त्यांच्या कॅटेगरीत ओढावं हे मला पटलं नाही. शिवाय आता शांतपणे वाचणं अशक्य आहे हे मी समजून घेतलं आणि पुस्तक मिटलं.
"अहो जुनं अकाउंट आहे, पैसे काढून बंद करायचंय", आम्ही वदलो.
"आमचं पेन्शनचं अकाउंट आहे ना.. म्हणून झक मारत यावं लागतं, नाहीतर कशाला येतोय?" इति काका.
"हं".
"या बँकेला ना ती अमुकतमुक बँक तीन वर्ष आधीच विकत घेणार होती, पण त्यांनी इथला एकंदर कारभार पहिला आणि हाय खाल्ली. हे लोक काय सुधारणार नाहीत, आपणच सुधरावं म्हणले म्हणे."
"हं".
इथे मी तिरक्या नजरेनं काउंटरकडे नजर टाकली. म्हणलं त्या काउंटरवाल्या/वाली ची आपल्यावर खप्पामर्जी झाली तर परत पुढच्या शनिवारी यावं लागायचं! पण काउंटरवाले निर्विकार होते. रोजच अशा शिव्या खायची सवय असावी.
"अभिमन्यूसाठी चक्रव्यूह रचण्याआधी कौरव या बँकेत आले होते म्हणे. हे लाईनचं डिझाईन पाहूनच त्यांना चक्रव्यूह सुचला म्हणे!". या वाक्यसरशी फस्सकन उफाळून येणारं हास्य मी दाबलं. त्याचवेळी काकांचा नंबर आला आणि काकांच्या पेन्शनचा मार्ग या महिन्यासाठीतरी मोकळा झाला!

शब्दचित्रं - बिझी माणसं आणि मृत्यू


दोन वर्षांपूर्वी मी व्हॉइसओव्हरचा एक कोर्स केला होता. आजकाल कोणताही क्लास केला किंवा कोर्स केला की त्यातील लोकं व्हाट्सऍप ग्रूप बनवतात, तसा त्याही क्लासचा बनला, आणि अशा सगळ्या ग्रुपचं जे होतं तेच झालं... काही दिवस ठराविक २-३ मेंबर पोस्ट टाकत राहिले. कालांतरानं तेही बंद झाले आणि ग्रुप dormant झाला. ग्रुप मधल्या २-३ लोकांशी संपर्क राहिला. बाकी सगळे गायब झाले.

ज्या लोकांशी संपर्क बाकी राहिला त्यात एक होती अनुश्री. पन्नाशीच्या आसपास असलेली अनुश्री म्हणजे मूर्तिमंत उत्साहाचा धबधबा! अगदी एखाद्या टीनएजरला लाजवेल असा. जिथे जाईल तिथे दोस्ती करणारच. आमच्या सगळ्या ग्रुपमध्ये माझी तिची मस्त दोस्ती जमली. कोर्स संपल्यावरही आमचे मधून मधून फोन व्हायचे. कधी तिला व्हॉइसओव्हरवर माझा सल्ला हवा असायचा, तर कधी कधी माझं एखादं चित्र बेहद्द आवडलेलं असायचं. मागच्या वर्षीच्या शेवटी शेवटीच आमचा फोन झाला होता, चांगला अर्धा तास. ३० डिसेंबर ला नवीन वर्षाच्या शुभेछया देऊन घेऊन झाल्या, आणि मग नंतर फोन झालाच नाही. मी बिझी झालो आणि ती पण बिझी झाली असेल असं समजून घेतलं. अगदी बरेच दिवसात फोन झाला नाही हे पण जाणवलं नाही.

आणि अचानक परवा तिच्या मृत्यूची बातमी समजली! जानेवारीमधेच एका दुर्दैवी अपघातात तिचा मृत्यू झाला होता, आणि मला हे समजायला तब्बल १० महिने लागले. म्हणजे १० महिन्यात एकदाही मी तिला फोन केला नव्हता, न तिचा फोन न आल्याचं मला जाणवलं होतं. खरंच मी एवढा बिझी होतो का? नक्कीच नाही. कोणीच एवढं बीझी नसतं. पण आपण आपल्या रोजच्या धबडग्यात एवढे हरवलेलो असतो की आपल्या बरोबर धावणारे सोडून बाकी कुठे लक्षपण जात नाही. आणि मग एखादी अशी बातमी आपल्याला खाडकन जमिनीवर उतरवते.

परवा हे समजल्यापासून अस्वस्थ होतो. असाच एक प्रसंग आठवला, १० वर्ष आधीचा. खाडकन जमिनीवर उतरवणारा.

समीर म्हणजे माझा मामेभाऊ. मिरजेला असायचा. माझ्यापेक्षा ३-४ वर्षं मोठा. दिसायला माझा जुळा भाऊ असेल असा. प्रचंड काटक आणि तेवढाच वात्रट. मी सगळ्या मावस-मामे भावंडांत सगळ्यात धाकटा, त्यामुळे त्यातल्या त्यात जवळच्या वयाचा समीरच. आमचं मस्त जमायचं. कधी मी मिरजेला गेलो आणि आम्ही बाहेर फिरताना कोणपण समोरून येऊदे, हमखास विचारणारच .. सम्या, हा तुझा भाऊ काय रे? आणि समीर म्हणजे जगन्मित्र असल्यामुळे दर १०-१५ मीटरवरती हा प्रश्न यायचाच.

लहानपणी मिरजेला बरेचदा जाणं-येणं व्हायचं, नंतर आम्ही दोघं आपापल्या शिक्षणांत बिझी झालो. समीर सांगलीला कॉलेजमध्ये शिकत होता. रोज मिरज सांगली बसनं जाणंयेणं करायचा. एकदा सांगलीमध्ये काही कारणानं दंगल झाली, आणि तो त्यात सापडला. कसाबसा सुखरूप परत आला, पण नेमकं त्याचं नाव पोलीस रेकॉर्डमध्ये गेलं. कसं ते अजूनही कुणाला माहित नाही. त्याचा त्या दंगलीशी काडीचा संबंध नव्हता, त्याची चूक एवढीच कि तो चुकीच्या वेळी चुकीच्या जागी होता. त्या एका प्रसंगानं त्याच्या आयुष्यातली पुढची ३-४ वर्षं कोर्टाच्या वाऱ्या करत खाल्ली.

हे सगळं होत असताना मी माझं कॉलेज आणि त्यानंतर नोकरी, घराचा शोध या मध्ये बिझी झालो होतो. नंतर एक वर्ष मी भारताबाहेर काढलं. पुण्याला माझ्या लग्नात तो आला. खूप धमाल केली होती आम्ही. आदल्या दिवशी रात्रभर जागलो. भेंड्या खेळलो. एकमेकांना नॉनव्हेज जोक्स सुनावले. मी लग्नानंतर पुन्हा भारताबाहेर गेलो.

त्याच सुमाराला समीरचं लग्न झालं. एव्हाना अनेक वर्षांच्या कटकटीनंतर तो त्या केसमधून निर्दोष सुटला होता, पण दुर्दैव परत आड आलं, आणि एका अपघातात त्याचा पाय खूप विचित्र पद्धतीनं मोडला. पुढचे कित्येक महिने त्याला पुन्हा पायावर उभं राहायला लागले.

मी २००३ साली परत भारतात आलो. त्या नंतर एकदा तो पुण्यात आला होता, मला ऑफिसवर भेटायला, अवघ्या काही मिनिटांसाठी. मग तो आंध्रप्रदेश आणि कर्नाटक सीमेवरच्या चित्तूर नावाच्या एका छोट्या गावात कामानिमित्त राहायला गेला आणि मग आमचा संपर्क तुटला.

एव्हाना मी टिपिकल IT च्या करियर मध्ये बुडून गेलो होतो. प्रमोशन, increments आणि प्रोजेक्ट्स एवढंच माझं जग झालं होतं. दिवसरात्र ऑफिसमध्ये राबणे आणि रात्री उशिरा घरी येऊन पुन्हा उद्याच्या कामाचा विचार करत झोपणं असा दिनक्रम होता. रात्री जेवायला घरी आलो तर घरात दिवाळी साजरी व्हायची अशी परिस्थिती होती. मुलाला फक्त आडवा वाढताना बघत होतो. समीरला मुलगी झाली होती हे ऐकलं होतं, पण एवढ्या लांब चित्तूरला जायला वेळ कुणाला होता? विशेषतः प्रोजेक्टची एवढी कामं माझ्यावर अवलंबून असताना!

आणि अश्याच एका बिझी दिवशी ऑफिसमध्ये माझा फोन वाजला. घरचा नंबर बघून जरा आठ्याच पडल्या. दुपारी भर कामाच्या वेळेला फोन करायला काय नडलंय हाच विचार. तरी फोन घेतला. फोनवरची बातमी ऐकली आणि पायातलं बळच गेलं. चित्तूरच्या जवळ ऑफिसच्या कामानिमित्त जाताना हायवेवर जोरदार अपघात झाला होता आणि समीरचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर मला कुणीतरी घरी सोडलेलं आठवतंय. माझ्यात त्राणच राहिले नव्हते. एकीकडे काहीतरी खूप दुःखाचं फीलिंग होतं, तर एकीकडे खूप काही राहून गेल्याचं. आणि हे दुसरं फीलिंग खूपच जास्त वाईट होतं.

दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह पुण्याला अंत्यसंस्कारासाठी आणला. त्या दिवशी मी पहिल्यांदा वहिनीला भेटलो. त्याची मुलगी तीन नुकतीच वर्षांची झाली होती आणि तिला पहिल्यांदा भेटण्यासाठी हि वेळ साधली गेली होती. नियती कधी कधी आपल्या आयुष्याची आणि त्यातील माणसांची किंमत आपल्याला अशी समजावून देते, वेळ हातातून निघून गेल्यावर!

या घटनेला आता दहा वर्षं झाली. सहसा कोणाच्याही मृत्युप्रसंगी मला रडू येत नाही. त्या वेळी मी खूप प्रॅक्टिकल विचार करतो. माझी आई गेली तेव्हाही माझ्या डोळ्याला टिपूस नव्हता. पण फक्त दोन वेळा असे प्रसंग आले की आपल्या काळजाचा तुकडा कुणीतरी तोडल्याची भावना झाली, त्यातला हा एक प्रसंग. दुसऱ्या प्रसंगाबद्दल लिहिण्याचं अजूनही माझ्यात धाडस नाही.

पुढे वहिनी सावरली, आणि तिनं परत नव्यानं संसार सुरु केला. दोन वर्षापूर्वी तिच्या गावी गेलो होतो, तेव्हा तिला आवर्जून भेटलो. सम्याची पोरगी अगदी हुबेहूब त्याचा चेहरा घेऊन आलीये, आणि त्याच्याचसारखी बिनधास्त आहे. बरं वाटलं. थोडा सल कमी झाला.

आपली नोकरी आणि आपलं करिअर हे महत्वाचं आहेच, पण त्यातून जाताना आसपासच्या जगाचं भान सुटू नये हे मात्र लक्षात ठेवायला हवं. माझा एवढा लाडका भाऊ, पण ना त्याच्या सुखाचे क्षण मला त्याच्याशी शेअर करता आले ना दुःखाचे. उद्या भेटू, परवा भेटू म्हणत तो निघूनही गेला. हातातून रेती निसटून जावी तसे ते अमूल्य क्षण निसटून गेले आणि मग फक्त राहिले फक्त त्या न शेअर केलेल्या क्षणांचे रीग्रेट्स!

शब्दचित्रं - सीमोल्लंघन


आज दसऱ्याच्या निमित्तानं सुमारे सतरा वर्षं आधी केलेल्या सीमोल्लंघनाच्या आठवणी ताज्या झाल्या आणि हा लेख लिहायला घेतला.

माझा जन्म पुण्यातला. आई-बाबा माझ्या जन्माच्या वर्षभर आधी पेठेतल्या एका लहानश्या घरात भाड्यानं राहायला आले होते. आई-बाबा , दोन मोठ्या बहिणी, आजी, आजोबा आणि मी असा आजच्या तुलनेत भरगच्च परिवार त्या एवढ्याश्या तीन खोल्यांमध्ये राहायचा.

आज काल स्वतः आलिशान फ्लॅटमध्ये राहून जुन्या पुण्याच्या वाड्यांबद्दल कळवळा असणारे लोक खूप भेटले. जुनं पुणं कसं संपत चाललंय आणि ते जतन करणं कसं आवश्यक आहे या वर बरीच मतं मी ऐकतो. ज्याला त्याला त्याचं मत असायला माझी काहीच हरकत नाही, पण मी माझ्या पुरतं एवढं सांगेन , की कळायला लागल्यापासून असा एक दिवस गेला नाही ज्या वेळी मला त्या वाड्यातून बाहेर पडण्याची इच्छा झाली नाही! ज्या लोकांना जुन्या पुण्याचा एवढा कळवळा आहे त्यांनी फक्त एक वर्ष अशा एखाद्या वाड्यात राहून पाहावं आणि तिथल्या कूपमंडूक वृत्तीचा अनुभव घ्यावा, आणि मग आपली मतं मांडावीत असं माझं जाहीर आव्हान आहे.

आम्ही राहायचो त्या घराची रचना आगगाडीसारखी, एका मागोमाग एक अशा खोल्या. त्या मुळे मधली खोली, जी स्वयंपाकघर म्हणून वापरली जाई, ती सदैव रोगट आणि अंधारलेली. सर्वात मागची लहान खोली पावसाळ्यात एवढी गळायची की सहा महिने ती वापरण्याच्या लायकीची नसे. त्या मुळे वापरण्याच्या त्यातल्या त्यात लायकीची एकच खोली, जी रस्त्याला लागून होती. त्या वाड्यातलं वातावरण सदैव रोगट आणि त्यातील खोल्यांप्रमाणेच संकुचित आणि खुरटलेली लोकं. सार्वजनिक संडासात जाऊन आल्यावर पाणी ओतावं एवढीही जाणीव नसलेले आणि सदैव इतरांना पाण्यात पाहणारे जीव. त्यावेळी त्या लोकांचा खूप राग येत असे. आता फक्त कीव येते.

पुढे रस्त्यावर रहदारी प्रचंड वाढली आणि पुढची एक खोली सुद्धा वापरण्यासारखी राहिली नाही. प्रचंड प्रदूषण, धूर आणि धूळ यांनी जीव गुदमरून जाऊ लागला. घरात एकमेकांशी बोलणं आवाजामुळे अशक्य झालं. तिथली शेवटची काही वर्षं मी रात्री ९-१० पर्यंत बाहेरच राहायचो, आणि रहदारी कमी झाली की घरी यायचो.

शहरे ही सगळीकडे बऱ्यापैकी "melting pots" झालीयेत असं आपण ऐकतो. कामाच्या ठिकाणी तरी कोण कुठल्या जातीचा आणि धर्माचा आहे याचा आपल्याला फरक पडत नाही. त्या मानानं गावांमध्ये जातीपातीचे प्रस्थ बऱ्यापैकी आहे. जातीचा अभिमान हि गोष्ट मला आजपर्यंत कळली नाही, आणि या पुढेही कळेल असं वाटत नाही. पण या बद्दल माझं एक निरीक्षण आहे (आणि असायलाच हवं , कारण मी पुणेकर आहे!). लोक जातीच्या बाबतीत खालीलपैकी एक भावना बाळगून असतात:

१. माझ्या पूर्वजांवर जोरदार अन्याय झाला, त्या मुळे मी जन्मापासून victim आहे (आत्ता मी ऐश्वर्यात लोळत असलो तरी).
२. माझ्या पूर्वजांनी इतरांवर जोरदार अन्याय केला, त्या मुळे मला कायम अपराधी भावनेनं जगणं भाग आहे (मी कुणाचं काही वाकडं केलं नसेल तरी).
३. यांच्या पूर्वजांनी इतरांवर जोरदार अन्याय केला, त्या मुळे मी यांच्यावर उगाचच खार खाऊन जगणार.
४. माझ्या पूर्वजांनी खूप कर्तृत्व गाजवलं, त्या मुळे मी काही न करताच आपोआप भारी झालो.
५. कोण कुठल्या जातीत, धर्मात आणि कुटुंबात जन्माला येतो तो केवळ एक योगायोग (अपघात) असतो. जन्माला येऊन आपण पुढे काय करतो हे पूर्वजांनी काय केलं या पेक्षा महत्वाचं असतं.

आम्ही जेथे राहत होतो तिथली जनता १ ते ४ मध्येच जगत होती. सुदैवानं मला ५ वा पर्याय भावला. आज मला कोणत्याही व्यक्तीशी बोलताना ती व्यक्ती दिसते, तिची जात नाही. त्या बद्दल माझ्या आई-बाबांची आणि विशेषतः आईची किंमत आज मला कळते. कोणत्याही कर्मठपणापासून आणि कर्मकांडापासून तिनं मला दूर ठेवलं. तिला शेवटी शेवटी जेव्हा आपलं आयुष्य संपत आल्याची जाणीव झाली त्या वेळी तिनं मला स्पष्ट सांगितलं कि माझे १०वं -१३ वं वगैरे दिवस करू नकोस. आज कोणत्याही निरर्थक धार्मिक रूढीला स्पष्ट नकार देण्याची नैतिक ताकद आहे ती तिच्याचमुळे.

असो, तर शेवटची काही वर्षं आधीच असह्य असलेलं तिथलं राहणीमान अती यातनामय झालं. प्रदूषण आणि अस्वच्छता, सतत होणारा डास, झुरळं, पाली आणि कधी कधी सापसुद्धा, या प्राण्यांचा उपद्रव, या बरोबरीनं माणसांचाही उपद्रव वाढला. भैXX, माXXXX, या शब्दांनी वेळीअवेळी उद्धार चालू झाला. कधीकधी अंगावर धावून येणं आणि मारहाण करण्याचाही प्रयत्न झाला. अर्थात या सगळ्यात मी मेन टार्गेट होतो. अशा खुरटलेल्या जागांची एक खासियत असते. तिथे आपण जर मॉबचा भाग नसू तर आपण आपोआप शत्रुपक्षात जातो. There's no neutral territory. मी कधीच आसपासच्या लोकांमध्ये मिसळणं सोडलं होतं. त्यामुळे मी आपोआपच शत्रुपक्षात गेलो. एकदा अनंतचतुर्दशीच्या मिरवणुकीच्याआडून आमच्या घरावर झालेली दगडफेक सुद्धा स्पष्ट आठवतीये.

या सर्व गोष्टींमुळे माझा आयुष्यातला पहिला स्ट्रॉंग गोल आपोआप तयार झाला. या नरकातून लवकरात लवकर बाहेर पडायचं. खरं तर माझा रस त्यावेळी आर्ट्समध्ये होता. पण त्याच वेळी भारतात IT इंडस्ट्री जोम धरत होती, आणि त्यामध्ये लगेच पैसा आहे एवढं माझ्या लक्षात आलं, आणि मी तिकडे जाण्याच्या दृष्टीनं पावलं उचलली. मला कॅम्पस इंटरव्हूमधून नोकरी मिळाली, आणि लगेचच मी फ्लॅट शोधायला सुरुवात केली. अर्थात ते अजिबात सोपं नव्हतं. हातात काहीही पैसे नव्हता. कर्ज मिळणं अतिशय कठीण होतं. पण इरादा पक्का होता. आणि परतीचे दोर कापले होते. अडीच वर्षं प्रयत्न केल्यावर शेवटी सगळं जुळून आलं आणि माझ्या पहिल्या घराची किल्ली हातात आली.

पण आता पुढचा प्रॉब्लेम सुरु झाला. आई-बाबांना पेठेतून बाहेर हलायची इच्छा नव्हती. माणसाची एक inertia नावाची गंमतशीर गोष्ट असते. आपण नरकात लोळत असू आणि कुणी १० फुटावर स्वर्गाचा दरवाजा दाखवला, तरी आधी हलायची इच्छाच होत नाही! वाड्यातले प्रॉब्लेम दिवसेंदिवस वाढत चालले होते. आम्ही राहत होतो त्या घराच्या एका खोलीची फरशी चक्क खचली होती. पण आईचा हट्ट कायम होता.

२४ सप्टेंबर २००० चा दिवस. भल्या पहाटे ५ वाजता मला अचानक जाग आली. खरंतर त्या वेळी मला ८ च्या आधी जाग येत नसे. कोणताही मोठा आवाज झाला नव्हता. कुणी मला हाकही मारली नव्हती. तरीही मी जागा झालो, आणि तेही पूर्ण सतर्क. कदाचित यालाच sixth सेन्स म्हणत असावेत. उठून मी सरळ मागच्या खोलीकडे धावलो, कुणीही न बोलावता. तिथे पोचलो तर काय... तिथली आधीच खचलेली जमीन आता पूर्ण खचली होती, आणि त्यातून आई खाली गेली होती!

आईचं (आणि आमचं) नशीब बलवत्तर, कि ती सरळ खालच्या घरात न पडता त्या घराच्या छताच्या तुळईवर पडली, त्या मुळे ती कमरेपर्यंत जमिनीत गायब झाली होती. मी उंबरठ्यावर बसकण मारली आणि सगळी ताकत लावून आईला बाहेर ओढली. त्या दिवशी तडक त्या नतद्रष्ट वाड्यातून बाहेर पडण्याचा निर्णय आईनं घेतला आणि लगेच अमलात पण आणला.

ह्या अपघाताची बातमी कळल्यावर आमचे काही नातेवाईक घरी येऊ लागले, आणि माझ्या चेहर्यावरचा अतीव आनंद पाहून बुचकळ्यात पडू लागले. पण माझा आनंद गगनात मावत नव्हता. इतके वर्षं ज्या गोष्टीची वाट पाहत होतो तो क्षण जवळ आला होता.

१-२ दिवसातच आम्ही नवीन घरी राहायला गेलो आणि माझ्या आयुष्यातली एक साडेसाती संपली. पण आजही कधी कधी मनात पाल चुकचुकते, कि जर त्या पहाटे आई तुळईवर न पडता सरळ खाली गेली असती तर? किंवा मला गाढ झोपेत हे सगळं ऐकू आलं नसतं तर? हे सगळं झालं यामागे कोणती अदृश्य शक्ती काम करत होती? की माझ्या जबरदस्त इच्छाशक्तीचा हा परिणाम होता? असो. ज्याचा शेवट गोड ते सगळंच गोड!

शब्दचित्रं - श्रीगणेशा!

 (१७ सप्टेंबर रोजी लिहिलेला पहिला लेख)

आज माझा वाढदिवस. आणि आज नेमकी अजून एका चित्र प्रदर्शनाची सांगता झाली. मागे वळून बघताना काही त्या वेळी साध्या साध्या वाटणाऱ्या गोष्टींनी आयुष्याला केवढी मोठी कलाटणी मिळाली या बद्दल एकीकडे गंमतही वाटते, आणि त्याच वेळी त्या गोष्टी त्या वेळी घडल्या नसत्या तर ... या विचारानं अस्वस्थही होतं .

आज मला माझ्या आयुष्यातली अशीच एक साधी सुधी गोष्ट आठवली. १० वर्षाचा होतो तेव्हा. पाचव्या यत्तेत. आज कालची पाचव्या यत्तेतली मुलं जेवढी ओव्हरस्मार्ट असतात त्या वरून अजिबात मला डोळ्यापुढे आणू नका बरं का! आम्ही सगळे त्या वेळी मुलखाचे बावळट होतो. आज कालच्या मुलांना जेवढं exposure असतं त्याच्या २-३ % सुद्धा आम्हाला नसेल. खाकी हाफ पॅन्ट आणि मळका पांढरा शर्ट, ज्यांना कधीही इस्त्रीचा स्पर्श झालेला नसे. कॉलेज मध्ये जाई पर्यंत आम्ही डिओड्रंट चं तोंड पाहिलं नाही. जास्त अक्कल नसल्यामुळे आंघोळ करणे ही ग्रूमिंगची परमावधी होती. आणि फक्त मुलांची शाळा असल्यामुळे जास्त नट्टापट्टा करण्यासाठी काही इन्स्पिरेशन पण नव्हतं !

तर सांगायाची गोष्ट हि, की आज मला बऱ्याचं लोकांचे फोन आले वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला. त्यात काही लोक असेही होते जे फेसबुक वर माझ्या पोस्ट्स नेहमी बघतात, पण नेहमी नेहमी भेटी -बोलणं होत नाही. अर्थात सगळेच आपापल्या कामांत व्यस्त असतात , त्या मुळे त्यात कोणाचीच चूक नाही. पण सांगायचा मुद्दा हा , कि त्यातल्या बऱ्याच जणांनी मला हा प्रश्न विचारला - "काय रे , तू अजून हि जॉब करतोस IT मध्ये का फुल टाइम चित्रकला?", आणि मला एकदम जाणवलं , की लोकांना एवढं वाटण्याइतपत आपण चित्रकलेत बुडालेले आहोत.
त्या वेळी, इयत्ता पाचवी मध्ये मी जेव्हा नुकताच प्रवेश केला होता, तेव्हा मला अजिबात चित्रकला आवडायची नाही हे मी सांगितलं तर लोकांना आश्चर्य वाटतं.

पाचवी मध्ये येई पर्यंत चित्रकलेचा तास जवळ आला की मला धडकी भरायची. याची कारणं दोन : एक म्हणजे माझी अशी समजूत होती कि मला चित्रकला अजिबात जमत नाही, आणि दुसरं कारण म्हणजे ती समजूत अगदी खरी होती! मला खरंच ते काम अजिबात जमत नसे! दर वेळी चित्र काढताना माझ्या मनात फक्त भीती असायची, की मी काढतोय वाघ, आणि बघणारा हमखास विचारणार, की या कबुतराला पंख का नाही काढले! त्या वेळी कुणी मला पुढे जाऊन चित्रकला हे माझ्यासाठी alternate करिअर होऊ शकेल असं म्हणलं असतं तर मी त्याला वेड्यात काढलं असतं. पण त्या वेळी एका साध्या सुध्या वाटणाऱ्या घटनेनं सगळ्याच प्रकाराला कलाटणी दिली.

झालं असं , की पाचवीच्या इतिहासाच्या पुस्तकात राणा प्रताप वरती एक धडा होता. पाचवीच्या वर्षाची ती सुरुवातच होती, आणि इतिहासाची अजून एकही परीक्षा न झाल्यामुळे आमचा इतिहासातला रस अजून शिल्लक होता. म्हणजे आमच्या शिक्षकांना सनावळ्यामध्ये तो इतिहास गाडून त्यातला सगळा रस घालवायची संधी मिळालेली नव्हती. त्या धड्यामध्ये राणा प्रतापचं एक चित्र होतं. एकदम करारी मुद्रा, भारदस्त शरीर , चिलखत आणि पोलादी शिरस्त्राण असा पेहराव. त्या दिवशी मी सकाळी वर्गात आलो तर माझ्या डेस्कपाशी पोरांची ही गर्दी ! मला काय कळेना आपण एकदम का डिमांडमध्ये! जवळ गेल्यावर कळलं कि हि डिमांड मला नव्हती. माझ्या शेजारी बसणाऱ्या मुलानं ते राणा प्रतापचं चित्र त्याच्या स्केचबुक मध्ये कॉपी करून आणलं होतं, आणि ते बघून सगळी पोरं फुल इम्प्रेस झाली होती.

खरं सांगायचं तर माझी जरा जळजळच झाली. आपला शेजारी एवढा छान चित्र काढतो आणि आपल्याला हातात पेन्सिल धरणं म्हणजे पण टेन्शन येतं, काय अर्थ आहे का याला! तरीपण कसनुसं बळेबळे त्याचं अभिनंदन करून मी स्थानापन्न झालो. पण ते चित्र पहिल्यापासून मला सारखं वाटत होतं कि हे आपल्या वहीत पण असायला पाहिजे. शेवटी माझा इगो गिळून मी माझ्या शेजाऱ्याला विचारलं, "काय रे, मला पण माझ्या वहीत हे चित्र काढून देशील का?". त्यावर त्यानं (झुरळाला न घाबरणारे लोक) झुरळाला झटकून टाकण्याआधी ज्या नजरेनं बघतात तसं माझ्याकडे पाहिलं. मला माझं उत्तर मिळालं आणि मी खजील होऊन परत मान वर केली नाही.
आता या घटनेची जेव्हा आठवण होते तेव्हा लक्षात येतं कि त्याची नाही म्हणण्यात काहीच चूक नव्हती. मी त्याच्याकडून परत ते चित्र माझ्यासाठी काढण्याची अपेक्षाच चूक होती. पण हे कळण्याची अक्कल कमी होती, आणि माझा इगो फार मोठा होता, जो त्या वेळी जरा जोरातच दुखावला गेला. त्या वेळी जर त्यानं मला ते चित्र काढून दिलं असतं तर कदाचित मी आजही पेन्सिलला घाबरून जगलो असतो. पण तो इगो दुखावला जाणं हि इष्टापत्ती ठरली.

मी शाळा सुटल्यावर घरी गेलो आणि तडक ते इतिहासाचं पुस्तक समोर घेऊन बसलो. माझ्या डोळ्यापुढे एकच लक्ष्य होतं. ते चित्र मी काढणार. किती पण वेळ लागुदेत. २-३ तास , किती वेळ बसलो ते आठवत पण नाही. किती चुका केल्या तेही आठवत नाही. एवढंच आठवतं कि माझ्या शेजाऱ्यापेक्षा कितीतरी चांगलं चित्र तयार झालं. दुसऱ्या दिवशी विजयी मुद्रेनं ते शाळेत घेऊन गेलो आणि मनसोक्त कौतुक करून घेतलं. त्या दिवशी मेंदूतला एक मेगाब्लॉक निघाला, आणि चित्रकलेनं अस्मादिकांच्या आयुष्यात चंचुप्रवेश केला. त्यानंतर या चित्रकलेनं आत्तापर्यंत कायम साथ दिली. शाळा आणि कॉलेजमधले कंटाळवाणे तास असोत, की मित्रांची (आणि मैत्रिणींची) वाट बघणं असो, की ऑफिसच्या न संपणाऱ्या मीटिंग असोत!

पण या सगळ्याची सुरुवात झाली ती त्या एका क्षुल्लक वाटणाऱ्या प्रसंगानं, आणि त्यातून माझ्या दुखावलेल्या इगोनं. खरं तर इगो हा दुर्गुण समजला जातो. पण त्याला योग्य दिशा दिली तर तोच इगो गुणी होतो. आणि हे सगळ्याच भावनांना लागू नाही काय! असो, त्या बद्दल परत कधी बोलेन.
तुमच्या आयुष्यात अशा काही गोष्टी घडल्यात का ज्यानी अशी कलाटणी दिली? जरूर शेअर करा. पुन्हा भेटूच या कट्ट्या वर. तो पर्यंत शिरीषकडून सायोनारा!

मुलींचे कपडे आणि NCB

परवा फेसबुकवर भिंतींना तुंबड्या लावत बसलेलो असताना माझ्या मित्रयादीतील एकाची पोस्ट पाहिली . सध्या बॉलीवूडमध्ये ड्रग्सवरून जे ...