Saturday, January 6, 2018

शब्दचित्रं - पुनर्जन्म - भाग २

जून २००५ ची गोष्ट. एका मित्राचं नारायणगावला लग्न होतं. दुर्दैवानं त्याच्या वडिलांना लग्नाच्या आदल्या दिवशीच काही कारणानं हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. बाकी सगळं वऱ्हाड नारायणगावला पोहोचलं होतं. पण याचा मोठा भाऊ वडिलांपाशी पुण्यात थांबला होता. माझाही त्या दिवशी सकाळीच नारायणगावला जाण्याचा बेत होता. लग्नाचा मुहूर्त दुपारचा होता. त्यामुळे सकाळी आरामात ८-८:३० ला निघायचं होतं. मी, नवरदेवाचा भाऊ आणि त्याचे दोन मित्र असे चारजण माझ्या कारमधून पुण्याहून निघालो. जास्तीतजास्त दीड-दोन तासात नारायणगाव गाठायचा बेत होता.

सकाळच्या गर्दीच्या आधी आम्ही पुण्यातून बाहेर पडून मंचरच्या रस्त्याला लागलो. रस्ता चांगला गुळगुळीत होता आणि रहदारी तुरळक होती. त्यामुळे मस्त साठ-सत्तर किमी च्या गतीनं आमचा प्रवास चालू होता. मंचरला थांबून आधी मिसळ खायची का डायरेक्ट नारायणगावला जायचं यावर गाडीत गंभीर चर्चा चालू होती.

मंचरपासून १५-२० मिनिटं अलीकडे रस्ता अरुंद झाला. एक कार एका दिशेनं जाऊ शकेल आणि दुसऱ्या बाजूनं एक येऊ शकेल एवढाच. त्यातून तो रस्ता चांगलाच चढउतारांचा होता. म्हणजे एका क्षणात आपण टेकाडावर चाल्लोय असं वाटेपर्यंत परत उतार चालू व्हायचा. थोड्या वेळानं पुन्हा एकदम चढ!

अशाच एका चढावर माझ्यापुढे एक ट्रक चालला होता. ट्रकचा स्पीड जास्तीतजास्त २०-२५ किमी असेल. पण एकच लेन पुढे जाण्यासाठी असल्याकारणाने मला झक मारत त्याच्या गतीनं त्याच्यामागे जावं लागत होतं. त्याला पार करून पुढे जायला हात शिवशिवत होते. पण अशा चढउताराच्या रस्त्यावर समोरून येणारी वाहनं दिसणं अवघड असतं. त्यामुळे या परिस्थितीत ओव्हरटेक धोकादायक असतो. तरीही मी त्या ट्रकच्या उजव्या बाजूनं डोकावून डोकावून एखादी पुढे जाण्याची संधी शोधत होतो.

आणि अचानक ती संधी चालून आली!

त्या ट्रकच्या उजव्या बाजूनं बघताना माझ्या लक्षात आलं की उजव्या बाजूची लेन पुढचे साधारण शंभर मीटर पूर्ण रिकामी होती. साधारण शंभर मीटरच्या अंतरावर पुढच्या टेकाडावर एक मारुती व्हॅन मला पाठमोरी चालली होती. ती व्हॅन मी चाललो होतो त्याच दिशेनं पुढे चालली होती आणि उजव्या बाजूनं कुणालातरी ओव्हरटेक करत होती. याचाच अर्थ त्या व्हॅनच्या पुढेही बराच रस्ता मोकळा असणार होता.

मी कार उजव्या लेनमध्ये घेऊन वेग एकदम सत्तरच्या पुढे नेला आणि ट्रकला समांतर आणली, आणि त्याच क्षणी आपण केवढी भयंकर चूक केलीये हे माझ्या ध्यानात आलं!

जी मारुती व्हॅन मी चाललोय त्याच दिशेला चालली आहे असं मी समजत होतो ती मला पाठमोरी नव्हतीच. ती सरळ माझ्या दिशेनं येत होती. रस्त्यांच्या चढउतारामुळे आणि त्या व्हॅनच्या आकारामुळे एक मृगजळ तयार झालं होतं, आणि मला वाटलं होतं त्यापेक्षा परिस्थिती पार उलटी होती! त्याहून वाईट गोष्ट म्हणजे ती व्हॅनसुद्धा सत्तरच्या पुढे वेगानं माझ्या दिशेनं सुसाट येत होती, आणि आमच्यामध्ये शंभर मीटरपेक्षा कमी अंतर होतं!

मी मागे एका पुस्तकात युद्धात किंवा तत्सम आणीबाणीच्या परिस्थितीत सापडलेल्या लोकांच्या मनःस्थितीबद्दल वाचलं होतं. अशावेळी माणसाच्या (किंवा कोणत्याही प्राण्याच्या) शरीरात आणि मनात "fight or flight रिस्पॉन्स" जागृत होतो. सगळी इंद्रियं "जिवंत राहणं" या एकाच ध्येयाभोवती केंद्रीत होतात. अशा वेळी मेंदू, डोळे, कान, स्नायू सगळेच तुफान वेगानं आणि फोकसनं एकत्र येतात.

पण काही माणसांच्या बाबतीत हे सगळं उलटंच होतं. संकट आल्यावर ते इतके गर्भगळीत होऊन जातात की त्यांचं डोकंच काम करत नाही. जे जे होईल त्याला ते मुकाट्यानं शरण जातात.

माझ्या बाबतीत हा पहिला प्रकार झाला आणि त्या मारुती व्हॅनच्या ड्रायव्हरच्या बाबतीत दुसरा!

त्या वेळी पुढच्या काही वेळात ज्या घटना घडल्या त्या अगदी "स्लो मोशन" मध्ये घडल्याप्रमाणे जशाच्या तशा लक्षात आहेत, किंबहुना मेंदूवर कोरल्या गेलेल्या आहेत म्हणलं तरी चालेल.

माझ्या आणि समोरच्या गाडीच्या अफाट वेगामुळे दोन्ही गाड्या आता एकमेकांपासून अक्षरशः वीसेक मीटरवर आल्या होत्या. मी किंवा समोरचा ड्रायव्हर आपापल्या ब्रेकवर उभे राहिलो असतो तरी एकमेकांवर धडकण्याआधी थांबणं अशक्य होतं. माझ्या डाव्या बाजूला ट्रक होता. त्यामुळे ती बाजू बंद झाली होती.  उजव्या बाजूला रस्त्याच्या खाली तीव्र उतार होता. तो उतार किती खोल आहे, तिथे खाली दगडगोटे आहेत, झुडुपं आहेत कि दरी, मला काहीही कल्पना नव्हती . त्यामुळे उजवी बाजू अनिश्चित होती. ब्रेक लावून पटकन कार ट्रक च्या मागे घ्यावी तर तेवढा वेळ नव्हता.

एव्हाना आमच्या गाड्या इतक्या जवळ आल्या होत्या की माझी आणि समोरच्या ड्रायवरची चक्क नजरानजर झाली. तो माणूस भीतीनं अक्षरशः थिजला होता. त्याच्या नजरेत फक्त भीती होती. त्याला काहीही सुचत नव्हतं. आता जिवंत राहायचं असेल तर जे काही करायचं ते मलाच करायचं होतं.

मग मी एवढ्या पर्यायांचा विचार केला

१. ब्रेक लावावा का? -- नाही , तेवढा वेळच नाही - नक्की मृत्यू !
२. कार डावीकडे घ्यावी का? किंवा ब्रेक लावून ट्रकच्या मागे? - नाही , नक्की मृत्यू!
३. कार उजवीकडे घ्यावी का? उजवीकडे रस्ता सोडून खाली किती खोल आहे माहित नाही. उतार किती आहे माहित नाही. पण समोरच्या गाडीशी धडक कदाचित चुकवता येईल. एकदा धडक टळली कि मग बघू.

या सगळ्या पर्यायांचा विचार त्यावेळी क्षणार्धात करून, निर्णय घेऊन मी पूर्ण ताकदीनं स्टिअरिंग उजवीकडे फिरवलं. गाडी सत्तरच्या वेगातच नव्वद अंशात उजवीकडे फिरली आणि रस्ता सोडून बाजूच्या उतारावर झेपावली. पुढच्या क्षणी ती मारुती व्हॅन माझी कार वळण्यापूर्वी जिथे होती त्या जागी पोचली होती. क्षणभर मला वाटलं कि आता माझी कार उजवीकडे उलटणार. पुन्हा एकदा पूर्ण ताकदीनं मी डावीकडे स्टिअरिंग फिरवलं, आणि माझी कार पुन्हा रस्त्याला समांतर झाली.

सुदैवानं तो उतार फारसा खोल नव्हता आणि एवढ्या वेगात दोनवेळा स्टिअरिंग फिरवूनही गाडीची चारही चाकं जमिनीवर टिकली होती. मी आता करकचून ब्रेक मारला आणि गाडी रस्त्याच्या बाजूला थांबली.

इतक्या वेळात आलेली "adrenaline rush" आता एकदम ओसरली. माझे हातपाय लटपटत होते. गाडीतल्या बाकी सर्व प्रवाशांची काहीशी तशीच अवस्था होती. मी कसाबसा गाडीच्या बाहेर आलो आणि मटकन खाली बसलो. सकाळचा ब्रेकफास्ट पोटातून ओठापर्यंत येण्याच्या धमक्या देत होता. सात आठ मोठमोठे  श्वास घेतले आणि स्वतःला शांत केलं.

ती मारुती व्हॅन माझ्या गाडीच्या चांगली पंचवीस-तीस मीटर पुढे जाऊन थांबली होती. तो ड्रायव्हरही बाहेर आला होता. त्याचीही अवस्था माझ्याचसारखी होती. त्या गाडीमधले लोकही थरथर कापत होते. आपण मृत्यूच्या किती समीप आलो होतो या जाणिवेनं कुणालाच बोलणं सुचत नव्हतं. शेवटी त्या व्हॅनच्या ड्रायव्हरनं तोंड उघडलं ... "काय राव... ". मी त्याचं बोलणं मधेच थांबवलं .. म्हणलं .. "मला मान्य आहे माझीच चूक आहे यामध्ये. माझा अंदाज चुकला, पण महत्वाची गोष्ट म्हणजे आपला काळ आला होता पण वेळ आली नव्हती". त्यानंही मान डोलावली, थोडावेळ स्वतःला सावरलं, आणि गाडीत बसून निघून गेला.

आत्तापर्यंत माझे पॅसेंजर्सपण सावरले होते. त्यांनी मला सांगून पाहिलं .. "तू मागे बस, आमच्यापैकी कुणीतरी गाडी चालवेल. तू फारच हलला आहेस". पण मी ठाम नकार दिला. कारण मला माहित होतं, जर आत्ता कच खाल्ली तर स्वतःवरचा माझा विश्वास उडेल. पुढचा सगळा रस्ता मी व्यवस्थित गाडी चालवली आणि सुखरूप परतही आलो.

त्या दिवशी माझा पुनर्जन्म झाला, आणि मला माझ्या आयुष्याची खरी किंमत मला उमगली. आपला प्रत्येक दिवस कसा आपल्याला मिळालेला बोनस असतो हे समजण्यासाठी एवढा जोरदार नाही तरी एखादा धक्का आपल्याला बसावा लागतो हेच खरं!

मुलींचे कपडे आणि NCB

परवा फेसबुकवर भिंतींना तुंबड्या लावत बसलेलो असताना माझ्या मित्रयादीतील एकाची पोस्ट पाहिली . सध्या बॉलीवूडमध्ये ड्रग्सवरून जे ...