Monday, October 9, 2017

शब्दचित्रं - सीमोल्लंघन


आज दसऱ्याच्या निमित्तानं सुमारे सतरा वर्षं आधी केलेल्या सीमोल्लंघनाच्या आठवणी ताज्या झाल्या आणि हा लेख लिहायला घेतला.

माझा जन्म पुण्यातला. आई-बाबा माझ्या जन्माच्या वर्षभर आधी पेठेतल्या एका लहानश्या घरात भाड्यानं राहायला आले होते. आई-बाबा , दोन मोठ्या बहिणी, आजी, आजोबा आणि मी असा आजच्या तुलनेत भरगच्च परिवार त्या एवढ्याश्या तीन खोल्यांमध्ये राहायचा.

आज काल स्वतः आलिशान फ्लॅटमध्ये राहून जुन्या पुण्याच्या वाड्यांबद्दल कळवळा असणारे लोक खूप भेटले. जुनं पुणं कसं संपत चाललंय आणि ते जतन करणं कसं आवश्यक आहे या वर बरीच मतं मी ऐकतो. ज्याला त्याला त्याचं मत असायला माझी काहीच हरकत नाही, पण मी माझ्या पुरतं एवढं सांगेन , की कळायला लागल्यापासून असा एक दिवस गेला नाही ज्या वेळी मला त्या वाड्यातून बाहेर पडण्याची इच्छा झाली नाही! ज्या लोकांना जुन्या पुण्याचा एवढा कळवळा आहे त्यांनी फक्त एक वर्ष अशा एखाद्या वाड्यात राहून पाहावं आणि तिथल्या कूपमंडूक वृत्तीचा अनुभव घ्यावा, आणि मग आपली मतं मांडावीत असं माझं जाहीर आव्हान आहे.

आम्ही राहायचो त्या घराची रचना आगगाडीसारखी, एका मागोमाग एक अशा खोल्या. त्या मुळे मधली खोली, जी स्वयंपाकघर म्हणून वापरली जाई, ती सदैव रोगट आणि अंधारलेली. सर्वात मागची लहान खोली पावसाळ्यात एवढी गळायची की सहा महिने ती वापरण्याच्या लायकीची नसे. त्या मुळे वापरण्याच्या त्यातल्या त्यात लायकीची एकच खोली, जी रस्त्याला लागून होती. त्या वाड्यातलं वातावरण सदैव रोगट आणि त्यातील खोल्यांप्रमाणेच संकुचित आणि खुरटलेली लोकं. सार्वजनिक संडासात जाऊन आल्यावर पाणी ओतावं एवढीही जाणीव नसलेले आणि सदैव इतरांना पाण्यात पाहणारे जीव. त्यावेळी त्या लोकांचा खूप राग येत असे. आता फक्त कीव येते.

पुढे रस्त्यावर रहदारी प्रचंड वाढली आणि पुढची एक खोली सुद्धा वापरण्यासारखी राहिली नाही. प्रचंड प्रदूषण, धूर आणि धूळ यांनी जीव गुदमरून जाऊ लागला. घरात एकमेकांशी बोलणं आवाजामुळे अशक्य झालं. तिथली शेवटची काही वर्षं मी रात्री ९-१० पर्यंत बाहेरच राहायचो, आणि रहदारी कमी झाली की घरी यायचो.

शहरे ही सगळीकडे बऱ्यापैकी "melting pots" झालीयेत असं आपण ऐकतो. कामाच्या ठिकाणी तरी कोण कुठल्या जातीचा आणि धर्माचा आहे याचा आपल्याला फरक पडत नाही. त्या मानानं गावांमध्ये जातीपातीचे प्रस्थ बऱ्यापैकी आहे. जातीचा अभिमान हि गोष्ट मला आजपर्यंत कळली नाही, आणि या पुढेही कळेल असं वाटत नाही. पण या बद्दल माझं एक निरीक्षण आहे (आणि असायलाच हवं , कारण मी पुणेकर आहे!). लोक जातीच्या बाबतीत खालीलपैकी एक भावना बाळगून असतात:

१. माझ्या पूर्वजांवर जोरदार अन्याय झाला, त्या मुळे मी जन्मापासून victim आहे (आत्ता मी ऐश्वर्यात लोळत असलो तरी).
२. माझ्या पूर्वजांनी इतरांवर जोरदार अन्याय केला, त्या मुळे मला कायम अपराधी भावनेनं जगणं भाग आहे (मी कुणाचं काही वाकडं केलं नसेल तरी).
३. यांच्या पूर्वजांनी इतरांवर जोरदार अन्याय केला, त्या मुळे मी यांच्यावर उगाचच खार खाऊन जगणार.
४. माझ्या पूर्वजांनी खूप कर्तृत्व गाजवलं, त्या मुळे मी काही न करताच आपोआप भारी झालो.
५. कोण कुठल्या जातीत, धर्मात आणि कुटुंबात जन्माला येतो तो केवळ एक योगायोग (अपघात) असतो. जन्माला येऊन आपण पुढे काय करतो हे पूर्वजांनी काय केलं या पेक्षा महत्वाचं असतं.

आम्ही जेथे राहत होतो तिथली जनता १ ते ४ मध्येच जगत होती. सुदैवानं मला ५ वा पर्याय भावला. आज मला कोणत्याही व्यक्तीशी बोलताना ती व्यक्ती दिसते, तिची जात नाही. त्या बद्दल माझ्या आई-बाबांची आणि विशेषतः आईची किंमत आज मला कळते. कोणत्याही कर्मठपणापासून आणि कर्मकांडापासून तिनं मला दूर ठेवलं. तिला शेवटी शेवटी जेव्हा आपलं आयुष्य संपत आल्याची जाणीव झाली त्या वेळी तिनं मला स्पष्ट सांगितलं कि माझे १०वं -१३ वं वगैरे दिवस करू नकोस. आज कोणत्याही निरर्थक धार्मिक रूढीला स्पष्ट नकार देण्याची नैतिक ताकद आहे ती तिच्याचमुळे.

असो, तर शेवटची काही वर्षं आधीच असह्य असलेलं तिथलं राहणीमान अती यातनामय झालं. प्रदूषण आणि अस्वच्छता, सतत होणारा डास, झुरळं, पाली आणि कधी कधी सापसुद्धा, या प्राण्यांचा उपद्रव, या बरोबरीनं माणसांचाही उपद्रव वाढला. भैXX, माXXXX, या शब्दांनी वेळीअवेळी उद्धार चालू झाला. कधीकधी अंगावर धावून येणं आणि मारहाण करण्याचाही प्रयत्न झाला. अर्थात या सगळ्यात मी मेन टार्गेट होतो. अशा खुरटलेल्या जागांची एक खासियत असते. तिथे आपण जर मॉबचा भाग नसू तर आपण आपोआप शत्रुपक्षात जातो. There's no neutral territory. मी कधीच आसपासच्या लोकांमध्ये मिसळणं सोडलं होतं. त्यामुळे मी आपोआपच शत्रुपक्षात गेलो. एकदा अनंतचतुर्दशीच्या मिरवणुकीच्याआडून आमच्या घरावर झालेली दगडफेक सुद्धा स्पष्ट आठवतीये.

या सर्व गोष्टींमुळे माझा आयुष्यातला पहिला स्ट्रॉंग गोल आपोआप तयार झाला. या नरकातून लवकरात लवकर बाहेर पडायचं. खरं तर माझा रस त्यावेळी आर्ट्समध्ये होता. पण त्याच वेळी भारतात IT इंडस्ट्री जोम धरत होती, आणि त्यामध्ये लगेच पैसा आहे एवढं माझ्या लक्षात आलं, आणि मी तिकडे जाण्याच्या दृष्टीनं पावलं उचलली. मला कॅम्पस इंटरव्हूमधून नोकरी मिळाली, आणि लगेचच मी फ्लॅट शोधायला सुरुवात केली. अर्थात ते अजिबात सोपं नव्हतं. हातात काहीही पैसे नव्हता. कर्ज मिळणं अतिशय कठीण होतं. पण इरादा पक्का होता. आणि परतीचे दोर कापले होते. अडीच वर्षं प्रयत्न केल्यावर शेवटी सगळं जुळून आलं आणि माझ्या पहिल्या घराची किल्ली हातात आली.

पण आता पुढचा प्रॉब्लेम सुरु झाला. आई-बाबांना पेठेतून बाहेर हलायची इच्छा नव्हती. माणसाची एक inertia नावाची गंमतशीर गोष्ट असते. आपण नरकात लोळत असू आणि कुणी १० फुटावर स्वर्गाचा दरवाजा दाखवला, तरी आधी हलायची इच्छाच होत नाही! वाड्यातले प्रॉब्लेम दिवसेंदिवस वाढत चालले होते. आम्ही राहत होतो त्या घराच्या एका खोलीची फरशी चक्क खचली होती. पण आईचा हट्ट कायम होता.

२४ सप्टेंबर २००० चा दिवस. भल्या पहाटे ५ वाजता मला अचानक जाग आली. खरंतर त्या वेळी मला ८ च्या आधी जाग येत नसे. कोणताही मोठा आवाज झाला नव्हता. कुणी मला हाकही मारली नव्हती. तरीही मी जागा झालो, आणि तेही पूर्ण सतर्क. कदाचित यालाच sixth सेन्स म्हणत असावेत. उठून मी सरळ मागच्या खोलीकडे धावलो, कुणीही न बोलावता. तिथे पोचलो तर काय... तिथली आधीच खचलेली जमीन आता पूर्ण खचली होती, आणि त्यातून आई खाली गेली होती!

आईचं (आणि आमचं) नशीब बलवत्तर, कि ती सरळ खालच्या घरात न पडता त्या घराच्या छताच्या तुळईवर पडली, त्या मुळे ती कमरेपर्यंत जमिनीत गायब झाली होती. मी उंबरठ्यावर बसकण मारली आणि सगळी ताकत लावून आईला बाहेर ओढली. त्या दिवशी तडक त्या नतद्रष्ट वाड्यातून बाहेर पडण्याचा निर्णय आईनं घेतला आणि लगेच अमलात पण आणला.

ह्या अपघाताची बातमी कळल्यावर आमचे काही नातेवाईक घरी येऊ लागले, आणि माझ्या चेहर्यावरचा अतीव आनंद पाहून बुचकळ्यात पडू लागले. पण माझा आनंद गगनात मावत नव्हता. इतके वर्षं ज्या गोष्टीची वाट पाहत होतो तो क्षण जवळ आला होता.

१-२ दिवसातच आम्ही नवीन घरी राहायला गेलो आणि माझ्या आयुष्यातली एक साडेसाती संपली. पण आजही कधी कधी मनात पाल चुकचुकते, कि जर त्या पहाटे आई तुळईवर न पडता सरळ खाली गेली असती तर? किंवा मला गाढ झोपेत हे सगळं ऐकू आलं नसतं तर? हे सगळं झालं यामागे कोणती अदृश्य शक्ती काम करत होती? की माझ्या जबरदस्त इच्छाशक्तीचा हा परिणाम होता? असो. ज्याचा शेवट गोड ते सगळंच गोड!

No comments:

Post a Comment

मुलींचे कपडे आणि NCB

परवा फेसबुकवर भिंतींना तुंबड्या लावत बसलेलो असताना माझ्या मित्रयादीतील एकाची पोस्ट पाहिली . सध्या बॉलीवूडमध्ये ड्रग्सवरून जे ...