Friday, March 16, 2018

बंड्याउवाच - पॅरिसमधला थरार!




काहीवेळा लहानपणापासून स्वप्नवत वाटणाऱ्या गोष्टी अचानक काही काळ अनपेक्षितपणे एक दुःस्वप्न बनून समोर येतात. असंच काहीसं माझ्या बाबतीत झालं जगातील सर्वाधिक रोमँटिक आणि स्वप्ननगरी समजल्या जाणाऱ्या पॅरिसमध्ये! लहानपणापासून पॅरिस बघणं हे माझं स्वप्न होतं. पण पॅरिसमधला माझा पहिला अनुभव थरकाप उडवणारा होता.

बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट. मी स्कॉटलंडमध्ये ग्लासगो शहरात कामानिमित्त राहत होतो. ऑगस्ट महिन्यात एक "लॉंग वीकएंड" आला आणि मी कुठेतरी भटकायला जायचं ठरवलं. ग्लासगोला आल्यापासून जास्तीतजास्त यूरोप बघून घ्यायचा हे ठरवलंच होतं. त्यातून आयुष्यात एकदातरी पॅरिस बघितलंच पाहिजे हे ठरवलं होतं. त्यामुळे यावेळी पॅरिसला जायचं नक्की केलं.

त्याचवेळी भारतातून माझा एक मित्र फ्रान्समधील एका गावात त्याच्या ऑफिसच्या कामानिमित्त आला होता. तो आणि त्याचे ऑफिसमधले काही सहकारी त्याच सुमाराला पॅरिस बघायला येणार होते, त्यामुळे आम्ही एकत्रच पॅरिस बघण्याचा बेत आखला. ते चारजण ट्रेननं पॅरिसला गुरुवारी संध्याकाळी पोहोचणार होते आणि मी ग्लासगो-लंडन-पॅरिस असा विमानानं त्याचदिवशी रात्री पोहोचणार होतो. भारतीय सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या परंपरेला अनुसरून मी सर्वात स्वस्त अशा "रायन एअर" या विमानकंपनीचं तिकीट बुक केलं होतं.

रायनएअर हि यूरोपमधली सर्वात स्वस्त विमानकंपनी आहे. पण हा स्वस्तपणा इतकापण स्वस्त नसतो हे त्या विमानात बसण्यापासूनच समजतं! रायन एअरची विमानं नेहमी कुठल्यातरी लांबच्या कोपऱ्यातल्या विमानतळावरून उडतात / उतरतात, जिथे कोणतीही धड बस वगैरेची सोया नसते. विमान उतरल्यावर साधारण अर्ध्या पाऊण तासानं एकमेव बस सगळ्या प्रवाशांना घेऊन पुढे तासभर प्रवास करून मुख्य शहरामध्ये आणून टाकते (त्या बसचं तिकीट वेगळं काढावं लागतं !).

आमचं विमान ठरलेल्या वेळेपेक्षा भरपूर उशिरा पॅरिसमध्ये उतरलं. त्यानंतर ती एकमेव बस पकडून पॅरिस शहरात जेव्हा मी पोचलो तेव्हा रात्रीचा एक वाजून गेला होता.  बस मधून उतरल्यावर मी ज्या हॉटेलचं बुकिंग केलं होतं तिथे पोहोचण्यासाठी मला टॅक्सी करणं आवश्यक होतं.  बसमधून उतरलेले सगळेच प्याशिंजर टॅक्सीच्या शोधात होते. त्यामुळे लवकर टॅक्सीपण मिळेना. जेव्हा मोठ्या मुश्किलीनं टॅक्सी मिळाली तेव्हा लक्षात आलं कि त्या ड्रायव्हरला इंग्लिश येत नव्हतं!

एव्हाना मी भुकेनं कावलेलो आणि प्रचंड दमलेलो होतो. टॅक्सिवाल्याला पत्ता लिहून आणलेला कागद दाखवला आणि चल म्हणालो. त्यानं टॅक्सी चालू केली, १-२ किलोमीटर पुढे नेली आणि खुणेनं मला सांगितलं कि या पुढचा रस्ता मला माहीत नाही. मी कपाळाला हात लावला. कारण टॅक्सी चालवणाऱ्याला रस्ते माहित असावेत हि माझी किमान अपेक्षासुद्धा फोल ठरली होती. त्या काळात GPS वगैरे चैनीच्या गोष्टी नव्हत्या. त्यामुळे आता ते हॉटेल शोधायचं कसं हा मोठा प्रश्न होता. एव्हाना रात्रीचे पावणेदोन झाले होते. या आडवेळी पत्ता विचारणार तरी कुणाला?

मग पुन्हा एकदा दमशेरा खेळायचा अनुभव कामाला लावला आणि खाणाखुणा करून त्याला सांगितलं की बाबारे, मला पुढच्या चौकात तरी सोड. त्यानंपण  माझ्यावर उपकार केल्याच्या थाटात गाडी चालू केली.

पुढच्या चौकात पोचलो आणि एकदम मला सुरक्षित वाटलं. तिथे एक पोलिसांची व्हॅन उभी होती आणि ६-७ सशस्त्र पोलीस तिच्या आसपास उभे होते. मी टॅक्सिवाल्याला (खुणेनं) म्हणलं, "मला इथेच उतरव". त्यानं पडत्या फळाची आज्ञा घेऊन मला offload केलं.

खाली उतरून मी माझी कपड्यांची बॅग पाठीला अडकवली, माझ्या SLR कॅमेऱ्याची बॅग पुढच्या बाजूला अडकवली, आणि उत्साहानं चालत पोलिसांकडे गेलो. एव्हाना सगळी पोलीसमंडळी व्हॅनमध्ये बसायला लागली होती. झपाझप चालत त्यांच्या दिशेनं येणाऱ्या माझ्याकडे मख्खपणे बघत एकच पोलीस बाहेर उभा  होता. मी त्याच्या पुढ्यात जाऊन उभा राहिलो आणि वदलो, "Do you speak English?".

त्या पोलिसाने माझ्याकडे एक तुच्छ फ्रेंच कटाक्ष टाकला आणि म्हणाला ... "नो". तो एवढंच बोलून थांबला नाही तर त्यानं माझ्याकडे चक्क पाठ फिरवली, आणि तो व्हॅनमध्ये अंतर्धान पावला. व्हॅनचा दरवाजा धाडकन बंद झाला आणि ती पोलीसव्हॅन माझ्या डोळ्यांसमोरून चालती झाली ! मला काही मदत हवी आहे का हे विचारण्याचे कष्टही त्यानं घेतले नव्हते.

हे सगळं इतक्या क्षणार्धात घडलं की मला काही सुचेचना .. हसावं कि रडावं की माझ्या झालेल्या अपमानाबद्दल चिडावं ! पण त्याक्षणी पोटातली भूक आणि पाठीत येऊ पाहणारी उसण याशिवाय काही भावना मनाला शिवत नव्हती.

आता मी चालत चालत हॉटेल शोधायला निघालो आणि “आपली फाटणे" हे फीलिंग काय असतं याचा मला चांगलाच फील येऊ लागला! मी जिथे टॅक्सिमधून उतरलो होतो ती वस्ती फारशी चांगली नाहीये हे आता मला जाणवत होतं. रात्रीचे दोन वाजत आले तरी रस्त्यावर थोडीफार वर्दळ होती. आणि ती सर्व वर्दळ आफ्रिकन आणि अरब तरुणांची होती. ४-५ च्या घोळक्याघोळक्यानं रस्त्याच्या बाजूला कट्टा जमवून अपरात्री चकाट्या पिटणारी ती पोरं बघून मला जाम टेन्शन आलं.
माझ्या पाठीवर आणि छातीवर अशा दोन बॅगा होत्या. मी प्रचंड दमलेलो होतो. गेले ६-७ तास माझ्या पोटात अन्नाचा कण नव्हता. आणि त्या सर्व लोकांमध्ये मी उपरा आहे हे कुणीही सांगू शकलं असतं. त्यावेळी मला कुणी लुटलं असतं किंवा भोसकून  कुठे फेकून दिलं असतं तर मी अक्षरशः काहीही करू शकलो नसतो. ना पायात पळण्याची शक्ती होती, ना घशात ओरडण्याची!

अशाच परिस्थितीत मी किमान अर्धा तास त्या रस्त्यांवर फिरत होतो. दोन- चार लोकांना  जरा  हिम्मत करून पत्ता विचारला, पण कुणालाच इंग्रजी येत नव्हतं, किंवा त्यांची इंग्रजी बोलायची इच्छाच नव्हती. मला मात्र जोरजोरात रडायची इच्छा होत होती. काही केल्या हॉटेल सापडत नव्हतं. थोड्या थोड्या वेळानं चकवा लागल्याप्रमाणे मी परत त्याच त्याच रस्त्यांवर यायला लागलो.

त्या विशिष्ट गल्लीमध्ये मी का गेलो आणि कसा गेलो हे मला अजूनही आठवत नाही. खरंतर कुठल्याही सुनसान गल्ल्यांमध्ये जाणं त्यावेळी जास्त धोकादायक होतं. पण मला बहुदा ती गल्ली आहे हे समजलंच नसावं. मला तिथे एक साधारण विशीतला तरुण दिसला. बाजूला लावलेली त्याची सायकल तो बाहेर काढत होता. मला त्याच्याशी का बोलावंसं वाटलं माहित नाही, पण एका intuition ने मी त्याच्याकडे गेलो. त्याला तो हॉटेलचा पत्ता लिहिलेला कागद दाखवला आणि खाणाखुणा करून चौकशी चालू केली.

आणि इथे कहानीमें जोरदार twist आला !!

त्या माणसानं दोन-तीन सेकंद माझ्याकडे पाहिलं आणि मला विचारलं "Do you speak English?".  काय सांगू , त्या रात्री ऐकलेले हे सगळ्यात स्वर्गीय शब्द! मला आनंदातिशयनं इंग्लिशही आठवेना! त्याला मी शोधत असलेल्या हॉटेलचा पत्ता नेमका माहित होता, ते हॉटेल पलीकडच्याच गल्लीत होतं आणि तो माणूस अतिशय सज्जन होता. तो मला नुसता हॉटेलचा पत्ता सांगून थांबला नाही तर स्वतः मला हॉटेलच्या दारापर्यंत सोडायला आला, बेल वाजवून रिसेप्शनिस्टला फ्रेंच भाषेतून माझी सोय लावायला सांगून मगच तो त्याच्या घरी गेला.

रिसेप्शनिस्टनं मला माझी खोली दाखवली. एव्हाना रात्रीचे साडेतीन झाले होते. पोटात अजूनही भुकेची आग होती. पण खाण्याचेही त्राण नव्हते. हा सगळं थरार ओसरल्यावर हात पाय लटपटायला लागले होते. मी तसाच आडवा झालो आणि काही मिनिटांत गाढ झोपून गेलो. सकाळी एकदम फ्रेश होऊन उठलो. सगळी बाकी मंडळीही मग भेटली, आणि पुढची ट्रिप बाकी काही exciting गोष्टी न होता पार पडली.

त्या रात्री पॅरिसमध्ये त्या माणसाच्या रूपानं साक्षात देवदूतच मला भेटला. त्या रात्रीचा तो थरार मात्र कायमचा लक्षात राहिला.

मुलींचे कपडे आणि NCB

परवा फेसबुकवर भिंतींना तुंबड्या लावत बसलेलो असताना माझ्या मित्रयादीतील एकाची पोस्ट पाहिली . सध्या बॉलीवूडमध्ये ड्रग्सवरून जे ...