Saturday, October 28, 2017

बंड्या उवाच - अन्न हे पूर्णब्रह्म !

प्रसंग - पुण्यातल्या कोणत्याही मंगल कार्यालयातल्या कोणत्याही "आमच्या बाळ्याचं" त्यांच्या "चिसौकां" बरोबरचं शुभमंगल (किंवा कोणताही प्रसंग, तेरावं सोडून!)

उपस्थित मंडळी - बंड्या, बंडी आणि नोकरीच्या ठिकाणी "आलोच जेवून" असं सांगून अक्षता टाकायला पोचलेली, आणि प्रत्येकी एक डोळा जेवण कधी वाढतायत तिकडे लावून बसलेली बरीच जनता. एखादा अगदीच गांजलेला IT वाला कानाला मोबाईल लावून कानात प्राण आणून तेवढ्यात मीटिंग अटेंड करतोय.

अक्षता (एकदाच्या) पडतात, शुभमंगल पार पडतं आणि बंड्या, बंडी आणि मंडळी मुख्य कामासाठी भोजनगृहाकडे वळतात. पटापट खुर्च्या बळकावून बसून घेतात.

पाहता पाहता अर्धं जेवण होत येतं, बंड्यानं आवडतं म्हणून आम्रखंडाची वाटी संपवून अजून एकदा मागून घेतलेलं असतं. आता इथून पुन्हा ऑफिसला जाऊन तीनची मीटिंग न पेंगता कशी पार पाडायची या टेन्शनमध्ये बंड्या मठ्ठा संपवतो आणि नेमके चार खुर्च्या सोडून खणखणीत आवाज येतो ...

"अरे वाढ त्याला .. वाढ. नाही काय म्हणतो.  जाऊन मस्त झोपायचंच आहे ना. नाही म्हणायचंच नाही. तू बघतोयस काय .. वाढ रे!"

बंड्याच्या त्या डब्ब पोटातही त्या आवाजानं गोळा येतो आणि तो हळूच डोकावून बघतो. अर्थात तो आवाज ऐकून सगळ्या पंगतीचेच कान टवकारलेले असतात.

बंड्याच्या चार खुर्च्या पलीकडे साधारण पन्नाशीच्या आसपासचे सदुकाका बसलेले असतात. त्यांच्यापुढे दोन इंचांवर दामूकाकांची ढेरी आणि त्यामागे सहा इंचावर दामूकाका उभे. बाजूला त्यांचा हक्काचा आग्रहगडी केशव. केशवच्या हातात आम्रखंडानं उचंबळणारी थापी.  सदुकाका केविलवाण्या चेहऱ्यानं त्या थापीचं त्यांच्या पानावरचे आक्रमण थोपवायला बघतायत. पण दामूकाका आग्रहाच्या बाबतीत कुणाला ऐकणारे नाहीत. आपण आग्रह करकरून लोकांच्या घशात अन्न कोंबलं नाही तर लोक उपाशी  मरतात यावर त्यांचा ठाम विश्वास. मग त्या आग्रहाच्या मध्ये कोणीही येणे नाही. ना सदुकाकांच्या विनवण्या, ना सदुकाकांचा बळावलेला मधुमेह.

मागच्याच महिन्यात सदुकाका त्यांच्या मधुमेहामुळे हॉस्पिटलची वारी करून आले होते. पण आता हा आम्रखंडाचा ताटात येऊन पडलेला डोंगर संपवणं भाग होतं, आणि तोही दामूकाका परत परात घेऊन येण्याच्या आधी! आपत्तीत पडल्याप्रमाणे सदुकाका चमचा उचलतात. तोवर दामूकाका पुढच्या सावजाकडे वळतात.

चार खुर्च्या आटोपून विजयी मुद्रेनं दामूकाका बंड्याच्यासमोर पोचतात. बंड्या आम्रखंडाची वाटी हातानं झाकतो.

"असं चालायचं नाही . लाजतोय काय!" - दामूकाका
"माझं पोट भरलंय . अगदी न लाजता खाल्लंय मी, आणि गोड जरा कंट्रोल करतोय सध्या " - इति बंड्या
"बघितलं का.. हि आजची पिढी. यांचे नखरेच फार."
"नखरे कसले काका... माझं पोट भरलंय , आणि इथून परत ऑफिसला जायचंय."
"ते काही नाही चालायचं. आग्रहाचं गोड घेतलंच पाहिजे"
"अहो कशाला आग्रह ? मी काय लाजत नाहीये . चांगला ताव मारून खाल्लंय"
"मग एक-दोन डाव आम्रखंडाने काय फरक पडतो रे? वाढ रे त्याला केशव. वाटी सोडली नाही तर बाजूला ताटात वाढ"

केशव उत्साहानं पुढे सरसावतो. बंड्या थंडपणे त्याच्याकडे एक नजर टाकतो. केशव जागेवर थिजतो. बंड्या वाटीवरचा हात बाजूला घेतो.

"ठीक आहे. वाढा वाढायचं असेल तर ...", इथे दामूकाकांचा अहंकार सुखावयाला लागलेला असतो तोच बंड्या वाक्य पूर्ण करतो, "... पण मी खाणार नाही. वाया जाईल ".

दामूकाकांच्या कपाळावरची शीर क्षणभर ताडकन उडते.

"काय म्हणालास??"
"तुम्ही ऐकलं तेच. जबरदस्तीनं वाढलं तर मी खाणार नाही. माझं पोट भरलं कि मी उठून जाणार."
"लाज वाटते का असं बोलायला? या देशात एवढी लोकं भुकेनं मरतात रोज, आणि तुम्ही खुशाल अन्न टाकता! अरे अन्न वाया घालवणं पाप असतं .. शिकवलं नाही का कुणी तुला ?"
"अच्छा .. म्हणजे अन्न वाया घालवणं पाप असतं हे पटतंय तर तुम्हाला काका !"
"अर्थात, तुलाच ते कळत नाहीये"
"बर मग मला सांगा, ज्या माणसाचं पोट भरलंय त्याला जबरदस्ती करून करून अन्न वाढणं म्हणजे अन्न वाया घालवणं नाहीये का? जे लोक बाहेर भुकेनं मरतायत म्हणताय त्यांना द्या कि हे सुग्रास अन्न. ज्या क्षणी तुम्ही ते अन्न जबरदस्तीनं वाढलं त्याच क्षणी ते वाया गेलं. पाप झालं. आता ते नको असताना खाऊन , माझ्या शरीरावर अन्याय करून, मी दुसरं पाप करू का?"

अर्थातच या प्रश्नाचं उत्तर दामूकाकांकडे नसतं, आणि त्यामागचं लॉजिक समजून घेण्यात अहंकार आड येत असतो. त्यामुळे आजची पिढी कशी उर्मट आणि परंपरा न जुमानणारी आहे यावर पुट्पुट करत ते पुढच्या रांगेकडे वळतात आणि नव्या दमानं अन्नाची नासाडी सुरु करतात.

बंड्याच्या अलीकडच्या खुर्च्यांवरची लोकं मनातल्या मनात बंड्याचे आभार मानतात आणि दामूकाका दुसऱ्या रांगेत आहेत तोवर आपलं जेवण आटपायच्या मागे लागतात .


ताजा कलम: पहिल्या परिच्छेदात लिहिलेलं माझं वाक्य मी परत घेतो. मी एका तेराव्यालापण एका अतिउत्साही कार्यकर्त्याला लाडूचा आग्रह करताना पाहिलंय!

No comments:

Post a Comment

मुलींचे कपडे आणि NCB

परवा फेसबुकवर भिंतींना तुंबड्या लावत बसलेलो असताना माझ्या मित्रयादीतील एकाची पोस्ट पाहिली . सध्या बॉलीवूडमध्ये ड्रग्सवरून जे ...