Monday, October 9, 2017

शब्दचित्रं - बिझी माणसं आणि मृत्यू


दोन वर्षांपूर्वी मी व्हॉइसओव्हरचा एक कोर्स केला होता. आजकाल कोणताही क्लास केला किंवा कोर्स केला की त्यातील लोकं व्हाट्सऍप ग्रूप बनवतात, तसा त्याही क्लासचा बनला, आणि अशा सगळ्या ग्रुपचं जे होतं तेच झालं... काही दिवस ठराविक २-३ मेंबर पोस्ट टाकत राहिले. कालांतरानं तेही बंद झाले आणि ग्रुप dormant झाला. ग्रुप मधल्या २-३ लोकांशी संपर्क राहिला. बाकी सगळे गायब झाले.

ज्या लोकांशी संपर्क बाकी राहिला त्यात एक होती अनुश्री. पन्नाशीच्या आसपास असलेली अनुश्री म्हणजे मूर्तिमंत उत्साहाचा धबधबा! अगदी एखाद्या टीनएजरला लाजवेल असा. जिथे जाईल तिथे दोस्ती करणारच. आमच्या सगळ्या ग्रुपमध्ये माझी तिची मस्त दोस्ती जमली. कोर्स संपल्यावरही आमचे मधून मधून फोन व्हायचे. कधी तिला व्हॉइसओव्हरवर माझा सल्ला हवा असायचा, तर कधी कधी माझं एखादं चित्र बेहद्द आवडलेलं असायचं. मागच्या वर्षीच्या शेवटी शेवटीच आमचा फोन झाला होता, चांगला अर्धा तास. ३० डिसेंबर ला नवीन वर्षाच्या शुभेछया देऊन घेऊन झाल्या, आणि मग नंतर फोन झालाच नाही. मी बिझी झालो आणि ती पण बिझी झाली असेल असं समजून घेतलं. अगदी बरेच दिवसात फोन झाला नाही हे पण जाणवलं नाही.

आणि अचानक परवा तिच्या मृत्यूची बातमी समजली! जानेवारीमधेच एका दुर्दैवी अपघातात तिचा मृत्यू झाला होता, आणि मला हे समजायला तब्बल १० महिने लागले. म्हणजे १० महिन्यात एकदाही मी तिला फोन केला नव्हता, न तिचा फोन न आल्याचं मला जाणवलं होतं. खरंच मी एवढा बिझी होतो का? नक्कीच नाही. कोणीच एवढं बीझी नसतं. पण आपण आपल्या रोजच्या धबडग्यात एवढे हरवलेलो असतो की आपल्या बरोबर धावणारे सोडून बाकी कुठे लक्षपण जात नाही. आणि मग एखादी अशी बातमी आपल्याला खाडकन जमिनीवर उतरवते.

परवा हे समजल्यापासून अस्वस्थ होतो. असाच एक प्रसंग आठवला, १० वर्ष आधीचा. खाडकन जमिनीवर उतरवणारा.

समीर म्हणजे माझा मामेभाऊ. मिरजेला असायचा. माझ्यापेक्षा ३-४ वर्षं मोठा. दिसायला माझा जुळा भाऊ असेल असा. प्रचंड काटक आणि तेवढाच वात्रट. मी सगळ्या मावस-मामे भावंडांत सगळ्यात धाकटा, त्यामुळे त्यातल्या त्यात जवळच्या वयाचा समीरच. आमचं मस्त जमायचं. कधी मी मिरजेला गेलो आणि आम्ही बाहेर फिरताना कोणपण समोरून येऊदे, हमखास विचारणारच .. सम्या, हा तुझा भाऊ काय रे? आणि समीर म्हणजे जगन्मित्र असल्यामुळे दर १०-१५ मीटरवरती हा प्रश्न यायचाच.

लहानपणी मिरजेला बरेचदा जाणं-येणं व्हायचं, नंतर आम्ही दोघं आपापल्या शिक्षणांत बिझी झालो. समीर सांगलीला कॉलेजमध्ये शिकत होता. रोज मिरज सांगली बसनं जाणंयेणं करायचा. एकदा सांगलीमध्ये काही कारणानं दंगल झाली, आणि तो त्यात सापडला. कसाबसा सुखरूप परत आला, पण नेमकं त्याचं नाव पोलीस रेकॉर्डमध्ये गेलं. कसं ते अजूनही कुणाला माहित नाही. त्याचा त्या दंगलीशी काडीचा संबंध नव्हता, त्याची चूक एवढीच कि तो चुकीच्या वेळी चुकीच्या जागी होता. त्या एका प्रसंगानं त्याच्या आयुष्यातली पुढची ३-४ वर्षं कोर्टाच्या वाऱ्या करत खाल्ली.

हे सगळं होत असताना मी माझं कॉलेज आणि त्यानंतर नोकरी, घराचा शोध या मध्ये बिझी झालो होतो. नंतर एक वर्ष मी भारताबाहेर काढलं. पुण्याला माझ्या लग्नात तो आला. खूप धमाल केली होती आम्ही. आदल्या दिवशी रात्रभर जागलो. भेंड्या खेळलो. एकमेकांना नॉनव्हेज जोक्स सुनावले. मी लग्नानंतर पुन्हा भारताबाहेर गेलो.

त्याच सुमाराला समीरचं लग्न झालं. एव्हाना अनेक वर्षांच्या कटकटीनंतर तो त्या केसमधून निर्दोष सुटला होता, पण दुर्दैव परत आड आलं, आणि एका अपघातात त्याचा पाय खूप विचित्र पद्धतीनं मोडला. पुढचे कित्येक महिने त्याला पुन्हा पायावर उभं राहायला लागले.

मी २००३ साली परत भारतात आलो. त्या नंतर एकदा तो पुण्यात आला होता, मला ऑफिसवर भेटायला, अवघ्या काही मिनिटांसाठी. मग तो आंध्रप्रदेश आणि कर्नाटक सीमेवरच्या चित्तूर नावाच्या एका छोट्या गावात कामानिमित्त राहायला गेला आणि मग आमचा संपर्क तुटला.

एव्हाना मी टिपिकल IT च्या करियर मध्ये बुडून गेलो होतो. प्रमोशन, increments आणि प्रोजेक्ट्स एवढंच माझं जग झालं होतं. दिवसरात्र ऑफिसमध्ये राबणे आणि रात्री उशिरा घरी येऊन पुन्हा उद्याच्या कामाचा विचार करत झोपणं असा दिनक्रम होता. रात्री जेवायला घरी आलो तर घरात दिवाळी साजरी व्हायची अशी परिस्थिती होती. मुलाला फक्त आडवा वाढताना बघत होतो. समीरला मुलगी झाली होती हे ऐकलं होतं, पण एवढ्या लांब चित्तूरला जायला वेळ कुणाला होता? विशेषतः प्रोजेक्टची एवढी कामं माझ्यावर अवलंबून असताना!

आणि अश्याच एका बिझी दिवशी ऑफिसमध्ये माझा फोन वाजला. घरचा नंबर बघून जरा आठ्याच पडल्या. दुपारी भर कामाच्या वेळेला फोन करायला काय नडलंय हाच विचार. तरी फोन घेतला. फोनवरची बातमी ऐकली आणि पायातलं बळच गेलं. चित्तूरच्या जवळ ऑफिसच्या कामानिमित्त जाताना हायवेवर जोरदार अपघात झाला होता आणि समीरचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर मला कुणीतरी घरी सोडलेलं आठवतंय. माझ्यात त्राणच राहिले नव्हते. एकीकडे काहीतरी खूप दुःखाचं फीलिंग होतं, तर एकीकडे खूप काही राहून गेल्याचं. आणि हे दुसरं फीलिंग खूपच जास्त वाईट होतं.

दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह पुण्याला अंत्यसंस्कारासाठी आणला. त्या दिवशी मी पहिल्यांदा वहिनीला भेटलो. त्याची मुलगी तीन नुकतीच वर्षांची झाली होती आणि तिला पहिल्यांदा भेटण्यासाठी हि वेळ साधली गेली होती. नियती कधी कधी आपल्या आयुष्याची आणि त्यातील माणसांची किंमत आपल्याला अशी समजावून देते, वेळ हातातून निघून गेल्यावर!

या घटनेला आता दहा वर्षं झाली. सहसा कोणाच्याही मृत्युप्रसंगी मला रडू येत नाही. त्या वेळी मी खूप प्रॅक्टिकल विचार करतो. माझी आई गेली तेव्हाही माझ्या डोळ्याला टिपूस नव्हता. पण फक्त दोन वेळा असे प्रसंग आले की आपल्या काळजाचा तुकडा कुणीतरी तोडल्याची भावना झाली, त्यातला हा एक प्रसंग. दुसऱ्या प्रसंगाबद्दल लिहिण्याचं अजूनही माझ्यात धाडस नाही.

पुढे वहिनी सावरली, आणि तिनं परत नव्यानं संसार सुरु केला. दोन वर्षापूर्वी तिच्या गावी गेलो होतो, तेव्हा तिला आवर्जून भेटलो. सम्याची पोरगी अगदी हुबेहूब त्याचा चेहरा घेऊन आलीये, आणि त्याच्याचसारखी बिनधास्त आहे. बरं वाटलं. थोडा सल कमी झाला.

आपली नोकरी आणि आपलं करिअर हे महत्वाचं आहेच, पण त्यातून जाताना आसपासच्या जगाचं भान सुटू नये हे मात्र लक्षात ठेवायला हवं. माझा एवढा लाडका भाऊ, पण ना त्याच्या सुखाचे क्षण मला त्याच्याशी शेअर करता आले ना दुःखाचे. उद्या भेटू, परवा भेटू म्हणत तो निघूनही गेला. हातातून रेती निसटून जावी तसे ते अमूल्य क्षण निसटून गेले आणि मग फक्त राहिले फक्त त्या न शेअर केलेल्या क्षणांचे रीग्रेट्स!

No comments:

Post a Comment

मुलींचे कपडे आणि NCB

परवा फेसबुकवर भिंतींना तुंबड्या लावत बसलेलो असताना माझ्या मित्रयादीतील एकाची पोस्ट पाहिली . सध्या बॉलीवूडमध्ये ड्रग्सवरून जे ...