Thursday, October 8, 2020

मुलींचे कपडे आणि NCB

परवा फेसबुकवर भिंतींना तुंबड्या लावत बसलेलो असताना माझ्या मित्रयादीतील एकाची पोस्ट पाहिली. सध्या बॉलीवूडमध्ये ड्रग्सवरून जे काही कांड चालू आहे त्यानंतर बऱ्याच लोकांना स्वतःच्या नैतिकतेचा आणि बॉलीवूडच्या अनैतिकतेचा साक्षात्कार झालाय, त्यापैकी हा एक प्राणी.

 

दीपिका पदुकोनला NCB (narcotic beauro) ने चौकशीला बोलावलं म्हणून याला प्रचंड आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. त्याचवेळी तिच्या नवऱ्यानं तिच्याबरोबर चौकशीला हजर राहण्याची विनंती केली, कारण तिला चौकशीचे दडपण आले होते.

 

या प्राण्याच्या पोस्टचा साधारण आशय हा होता की... "या बॉलीवूडच्या हिरॉइनीं अर्धेमुर्धे कपडे घालून रात्री अपरात्री पार्ट्या करत हिंडतात तेंव्हा यांना असुरक्षित वाटत नाही, आणि NCB ने चौकशीला बोलावलं की यांना टेन्शन येतं!".

 

काही वर्षांपूर्वी मी दुबईमध्ये काही महिने काढले. तिथे कायद्याची जरब अशी जबरदस्त आहे की रात्री अपरात्री सुद्धा बायकामुली बिनधास्त रस्त्यावर फिरू शकतात, आणि तेही त्यांना हव्या तशा कपड्यांमध्ये. खरंतर हे असं वातावरण असणं ही त्यांच्यासाठी अभिमानाची बाब आहे, आणि आपल्या इथल्या तथाकथित ‘सुशिक्षितांना’ बायकामुली रात्री रस्त्यावर दिसल्या की संस्कृती बुडाल्याचा साक्षात्कार व्हायला लागतो!

 

आता त्या दीपिकानं पार्टीमध्ये कोणते कपडे घालावेत आणि तिला NCB ने चौकशीला बोलावल्यावर दडपण यावं की येऊ नये या दोन गोष्टींचा अर्थाअर्थी काही संबंध आहे का?  पण कुणावर मुळातच राग असेल तर लॉजिकचा तसाही संबंध नसतो.

 

मला त्या प्राण्याला असं ठणकावून विचारायची इच्छा झाली की 'टोणग्या, तुला जर NCB ने चौकशीला बोलावलं तर तुझी हातभर फाटणार नाही का? यामध्ये तू सुटाबुटात फिरतोस की चट्ट्यापट्ट्यांची चड्डी घालून फिरतोस याचा काही संबंध आहे का?'.

 

पण ही लोकं अशा प्रश्नांच्या पल्याड गेलेली असतात. त्यांचे सगळे विचार बायकांच्या कपड्यांवर येऊन थांबतात. त्यामुळेच एखाद्या मुलीचा विनयभंग किंवा बलात्कार झाला की अपराध्याने काय केलं याआधी त्या मुलीनं कपडे कोणते घातले होते आणि ती एवढ्या रात्री बाहेर कशी फिरत होती यावर चर्चा जास्त रंगते.

 

आणि सर्वांत वाईट गोष्ट म्हणजे ही 'सुशिक्षित' लोकं या चर्चांमध्ये आघाडीवर असतात.

 

शिक्षण आणि अक्कल यांचा संबंध यायला बराच अवकाश आहे हे मात्र खरं!

1 comment:

  1. शिक्षणाची degree आणि शहाणपण यात फरक आहे.

    ReplyDelete

मुलींचे कपडे आणि NCB

परवा फेसबुकवर भिंतींना तुंबड्या लावत बसलेलो असताना माझ्या मित्रयादीतील एकाची पोस्ट पाहिली . सध्या बॉलीवूडमध्ये ड्रग्सवरून जे ...