Thursday, June 20, 2019

मेरा शहर बदल रहा है...


माझ्या ऑफिसला येण्या-जाण्याच्या मार्गावर एक चिंचोळा एकमार्गी रस्ता आहे. एकदा एखादं वाहन त्या रस्त्यावर आलं की तिथून मागे फिरायची सोय नाही, आणि रस्ता चिंचोळा असला तरी त्यावर रहदारी जोरात असते. त्यामुळे 'सावज' पकडायला ट्रॅफिक पोलिसांना ही एकदम मोक्याची जागा आहे. 

पुण्यात हेल्मेट सक्ती झाल्यापासून रोज आठ ते दहा पोलिसांचा तांडा संध्याकाळी तिथे गळ टाकून उभा असतो. शक्यतो ते कार चालकांना हटकत नाहीत, कारण कार चालकांना (अजूनतरी) हेल्मेट सक्ती नाहीये.

त्यामुळेच काल मी त्या रस्त्यानं कारमधून जात असताना अचानक दोन ट्रॅफिक पोलिसांनी मला इशारा करून कार रस्त्याच्या बाजूला घ्यायला सांगितली तेव्हा मला जरा आश्चर्य वाटलं.

मी कार रस्त्याच्या बाजूला उभी केली आणि पाकीट घेऊन खाली उतरलो. आत्तापर्यंतच्या अनुभवावरून पहिलं लायसन दाखवावं लागणार म्हणून पाकीट धुंडाळू लागलो, तर ते काही विचारता मामांनी एकदम स्मितहास्य केलं. इथे मी पहिला उडालो.

आधी हळूच चेक करून पाहिलं की आपल्या पँटची चेन उघडी वगैरे नाहीये ना. पण सगळं जागच्या जागी होतं. मग मामा हसतायत कशाला ते कळेना.

तोपर्यंत दुसऱ्या मामांनी त्यांच्या टॅबमध्ये माझ्या कारचा नंबर टाकून काहीतरी बटणं खटाखट दाबून कायतरी चेक केलं. मग त्यांच्यामध्ये काहीतरी खलबतं झाली. एव्हाना माझ्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिंन्ह गडद होत चाललं होतं.

मग त्या दोघांनी माझ्याकडे मोर्चा वळवला.

टॅबचा स्क्रीन माझ्या दिशेला वळवण्यात आला. त्यावर एक भलामोठा शून्य दिसत होता.

मग मामांनी परत एक स्मितहास्य दिलं.

एव्हाना मी उत्कंठेपोटी फुटायला आलो होतो.

मग मामांनी मला खुलासा केला.

त्यांनी माझ्या गाडीचा नंबर त्यांच्या अँप मध्ये टाकून चेक केलं होतं की माझ्या कारवर काही Pending fines for traffic violations आहेत का. तो भलामोठा शून्य हा त्याचा search result होता. अर्थातच माझ्या गाडीचं कोणतंही ‘traffic violation record’ नव्हतं.

आधी त्यांनी माझं याबद्दल अभिनंदन केलं, आणि सांगितलं, "RTO कडून सध्या एक मोहीम चालू आहे. ज्या गाड्यांनी कोणत्याही ट्रॅफिकच्या नियमाचा भंग केला नाहीये त्यांना RTO कडून १० टक्के डिस्काउंट कूपन दिलं जाणार आहे!".

हे वाचणाऱ्यांमध्ये जे पुणेकर आहेत त्यांच्या मनात साहजिकच हा खवचट विचार आला असेल की - "१० टक्के डिस्काउंट कशावर? पुढच्या नियमभंगाच्या रकमेवर का?".

हे मला कसं कळलं? सुज्ञास सांगणे न लगे!

पण मी शहाण्यासारखा हा प्रश्न (पु लं च्या भाषेत) जिभेवरून पडजिभेवर ढकलला.

मग त्यांनी माझा मोबाईल नंबर घेऊन अजून एका अँपमध्ये टाकला.

मग मला एक SMS आला. हा १०% डिस्काउंट पुण्यातल्या अनेक दुकानांमध्ये (मॅकडोनाल्ड आणि चितळे बंधूंपासून व्हिनस ट्रेडर पर्यंत) कुठेही वापरता येईल असा डिस्काउंट कोड त्या मेसेजमध्ये होता. पुन्हा एकदा माझं अभिनंदन करून पोलिसांनी मला बाय बाय केलं.

"माझं लायसन नक्की बघायचं नाहीये का?" हा प्रश्न पुन्हा एकदा जिभेवरून पडजिभेवर ढकलून, डोळ्यातलं पाणी लपवत मी गाडी चालू केली आणि घराची वाट धरली!

मुलींचे कपडे आणि NCB

परवा फेसबुकवर भिंतींना तुंबड्या लावत बसलेलो असताना माझ्या मित्रयादीतील एकाची पोस्ट पाहिली . सध्या बॉलीवूडमध्ये ड्रग्सवरून जे ...