Monday, October 16, 2017

शब्दचित्रं - पुनर्जन्म - भाग १


कधी कधी मागे वळून बघताना अशा काही आठवणी येतात ज्या आपण पूर्ण विसरून गेलेलो असतो, किंवा आपण त्या जाणून बुजून मनाच्या एखाद्या खोल कप्प्यात दडवून टाकलेल्या असतात. आज दिवाळीच्या निमित्तानं एकदम अशी एक आठवण आली, माझ्या (पहिल्या) पुनर्जन्माची!

मी कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होतो त्यावेळची गोष्ट. दिवाळीची वेळ होती. मी आणि माझा एक मित्र अवी एका संध्याकाळी काही कामासाठी अप्पा बळवंत चौकात गेलो होतो. आधीच तो अप्पा बळवंत चौक, आणि त्यात दिवाळीची वेळ. त्यामुळे सगळा चौक माणसांनी दुथड्या भरून वाहत होता. सगळीकडे दिव्यांच्या माळांची रोषणाई होती. दुकानं प्रकाशानं लखलखत होती. जिकडे तिकडे लोकच लोक दिसत होते.

मी आणि अवी नूमवि (नूतन मराठी विद्यालय .. नॉन पुणेकरांच्या माहितीसाठी !) जुनिअर कॉलेजजवळ पोचलो होतो. त्याचं घर नूमविला लागूनच असलेल्या बिल्डिंगमध्ये होतं. त्याला घरातून काहीतरी आणायचं होतं, बहुदा तो त्याचं पैशांचं पाकीट घरी विसरला होता. आता नक्की काहीच आठवत नाही कि तो परत घरी का गेला, पण त्या नंतरची घटना मात्र अगदी धडधडीत आठवतेय.

अवी त्याच्या घरी गेला तोवर मी रस्ता पार केला आणि समोरच्या बाजूला थांबलो. मी तिथेच नूमविच्या बाजूला न थांबता रस्ता पार का केला? हेपण मला आठवत नाही. कदाचित त्या बाजूला दुकानं होती म्हणून टाईमपाससाठी गेलो असेन, किंवा पुढे जे होणार होतं ते घडवून आणण्यामधली ती एक पायरी असावी ... माहित नाही. पण मी रस्ता पार करून थांबलो खरा. थांबलो तोही तिथल्या दुकानांकडे पाठ करून रस्त्याच्या बाजूला तोंड करून. समोरून अखंड चालणारी माणसं आणि थांबत थांबत रडतखडत चाललेल्या वाहनांचा अखंड कोलाहल चालू होता. ती सगळी गम्मत बघत मी उभा होतो.

आणि माझी नजर त्याच्यावर पडली. सगळ्या नटूनथटून बाहेर पडलेल्या लोकांमध्ये एकदमच वेगळा दिसणारा. अतिशय गलिच्छ, फाटके कपडे... कपडे कसले , लक्तरंच. केसांच्या जटा. अनवाणी पाय. भिरभिरणारी अस्वस्थ नजर. तोंडातून गळणारी लाळ. बघितल्याबरोबर शिसारी यावी असा अवतार. मला वाटलं कि एखादा भिकारी असावा. असे भिकारी ही दुर्दैवानं आपल्या शहरांच्या रस्त्यांवर नाक्यानाक्यावर दिसतात. त्या मुळे त्या माणसाचं तिथे असणं मला फारसं विशेष वाटलं नाही. माझी नजर त्या भिकाऱ्यावर गेली आणि एक-दोन सेकंद स्थिरावली, तिरस्कार किंवा करुणा कोणत्याच भावनेनं नाही, तर केवळ तो माणूस एकदम "आऊट ऑफ प्लेस" वाटला म्हणून.

आणि नेमक्या त्याच एक-दोन सेकन्दात त्याची ती भिरभिरणारी नजर माझ्याकडे वळली. आमची नजरानजर झाली आणि त्याचक्षणी मला जाणीव झाली कि हा नुसता भिकारी नाहीये, तर ठार भ्रमिष्ट आहे. मी चटकन नजर दुसरीकडे वळवली, पण त्या माणसानं एव्हाना त्याच्या चालण्याची दिशा बदलून माझ्याकडे मोर्चा वळवला होता, एवढ्या सगळ्या गर्दीमध्ये!

१-२ सेकंदातच ढांगा टाकत तो तो माझ्यासमोर येऊन उभा राहिला, गलिच्छपणे थुंकला आणि काहीतरी अगम्य बोलायला लागला. तो माझ्यापासून ५-६ फुटांवर उभा होता तरी त्याच्या अंगाची असह्य दुर्गंधी माझ्यापर्यंत येत होती. आधी त्याच्या नजरेला नजर देऊन मी एक चूक केली होती, त्या असह्य दुर्गंधीला वैतागून मी दुसरी मोठी चूक केली. मला वाटलं कि मी जर त्याच्याकडे सपशेल दुर्लक्ष केलं तर तो निघून जाईल, आणि मी त्याच्याकडे पाठ फिरवली.

दुसऱ्याक्षणी त्या वेड्या माणसानं मागून माझ्यावर झडप घातली आणि एका हाताचा घट्ट विळखा माझ्या गळ्याभोवती घालून सर्वशक्तीनिशी आवळला! एका क्षणात माझा श्वासाचा मार्ग पूर्ण बंद झाला. मानेला जोरदार हिसका बसून मी मागे ओढला गेलो. तो असह्य दुर्गंध आता नाकाला जाणवत नव्हता, कारण त्याहून मोठा प्रॉब्लेम आता माझ्यापुढे होता. श्वास बंद झाला होता, त्या अचानक बसलेल्या हिसक्यानं मान आणि गळ्याचे स्नायू प्रचंड दुखावले होते आणि डोळ्यापुढे अंधारी यायला सुरुवात झाली होती. मी दोन्ही हातांनी त्याची ती मगरमिठी सोडवायचा प्रयत्न करत होतो. पण त्याची पकड राक्षसी होती. खरं तर देहयष्टीनं तो एवढा कुपोषित माणूस होता कि फुंकर मारली तर पडेल. पण डोकं फिरलं कि असे लोक दहा लोकांना ऐकत नाहीत.

एव्हाना माझ्या हातापायातला जीव जाऊन ते लुळे पडायला सुरुवात झाली होती. आसपास एव्हाना लोकं जमा झाली होती, पण कुणीच मदतीला आलं नाही. सगळे गम्मत बघत उभे होते. त्या वेळी मोबाईल फोन नव्हते, नाहीतर तो झटापटीचा व्हिडीओ "व्हायरल" पण झाला असता!

अचानक गर्दीतल्या कुणाचीतरी ट्यूब पेटली आणि तो ओरडला... "अरे हा वेडा माणूस आहे" (हे तो त्याच्याकडे बघून म्हणाला!).... "सोडवा त्या पोराला" (हे तो माझ्याकडे बघून म्हणाला)! तरीपण कुणाची पुढे होऊन त्याला पकडायची छाती होत नव्हती. पण लोकांनी आरडाओरडा सुरू केल्यावर त्या वेड्याचा धीर सुटला आणि माझ्या गळ्यावरची त्याची पकड सैल झाली. मी पोट भरून श्वास घेतला आणि एक जोरदार हिसका देऊन बाजूला झालो. एव्हाना बिथरून तो वेडा पळत सुटला होता आणि माझा पारा चढला होता. मी त्याच्या मागे धावत सुटलो आणि त्याच्या पाठीत लाथ घातली. तो वेडा तोंडावर आपटला. मी लाथाबुक्क्यांनी त्याला तुडवायला सुरुवात केली. माझं डोकं एवढं चढलं होतं की त्यावेळी मी त्याला किती मारला असता माहीत नाही. २-३ लोकांनी मला धरून मागे ओढलं आणि समजूत घातली, तोवर तो वेडा गर्दीत दिसेनासा झाला होता.

हि सगळी घटना केवळ १-२ मिनिटात झाली असेल. पण माझा गळा पुढे महिनाभर दुखला. गळ्यावर लाल काळे व्रण त्याहून जास्त काळ टिकले, आणि ती आठवण आयुष्यभराची राहिली!

हि घटना घडल्यावर माझी लगेचची प्रतिक्रिया तीच होती जी सगळ्या व्हिक्टिम्सची असते ... हे माझ्याच बाबतीत का झालं? पण नंतर मी जेव्हा त्याबद्दल विचार करतो तेव्हा मनात विचार येतो.. मी नसतो आणि त्या वेड्यानं एखाद्या लहान मुलाचा किंवा एखाद्या मुलीचा गळा आवळला असता तर? किंवा एखाद्या म्हाताऱ्या व्यक्तीचा? शेवटी मला त्यामधून कोणतीही कायमस्वरूपी इजा झाली नाही हे महत्वाचं! पण त्यामुळे ती दिवाळी कायमची लक्षात राहिली हे मात्र खरं!

No comments:

Post a Comment

मुलींचे कपडे आणि NCB

परवा फेसबुकवर भिंतींना तुंबड्या लावत बसलेलो असताना माझ्या मित्रयादीतील एकाची पोस्ट पाहिली . सध्या बॉलीवूडमध्ये ड्रग्सवरून जे ...