Monday, November 6, 2017

बंड्या उवाच - स्ट्रीट हॉक

फार फार पूर्वीची गोष्ट. पुणे शांत शहर होतं, आणि दूरदर्शन हा एकच चॅनेल टीव्हीवर लागायचा इतक्या जुन्या काळातली.

त्या वेळी रविवारी टीव्हीवर अमेरिकेतून आयात केलेल्या काही मालिका लागायच्या. स्टार ट्रेकसारख्या काही मालिकांनी माझं भावविश्वच बदलून टाकलं. आपल्या इथले सिनेमे आणि मालिका किती ठराविक साच्यात खेळात असतात त्याची जाणीव करून दिली. पण अशा मालिकांबरोबरच काही तद्दन फालतू मालिकासुद्धा खपून गेल्या. त्यापैकीच एक म्हणजे Street Hawk.

तर या Street Hawk मालिकेचा एक "व्हिजिलांते" हिरो असायचा, बॅटमॅनसारखा. तो त्याच्या बाईकवरून सुसाट (मालिकेच्या लेखकाच्या मते ३०० किमी की मैल प्रतितास) वेगाने गुन्हा घडत असेल तिथे पोचायचा. त्याच्या त्या प्रवासाचं ते ठराविक एकच ऍनिमेशन सतत दाखवायचे. मग तो तिथे पोचला की एकदम हळू बाईक चालवायचा. मग गुंड त्याच्यावर गोळ्या झाडत. तो हिरो असल्यामुळे अर्थातच त्याला एकही गोळी लागत नसे. मग एक लुटुपुटुची लढाई व्हायची. ह्याच्या पण गोळ्या गुंडाना लागत नसत. पण ते घाबरून शरण येत. आणि मग पोलीस आले की आपला हिरो ३०० किमी की मैलच्या वेगानं आपल्या घरी परतत असे.

त्यावेळी रविवारी सकाळी करमणुकीसाठी ऍक्शनमध्ये जास्त पर्यायच नव्हते, त्यामुळे ही मालिकापण मी आवडीनं बघायचो. त्यावेळी Street Hawk म्हणजे फार म्हणजे फारच भारी बाईक असं मनात ठसलं होतं. अर्थात आमचा ग्रुप कट्टर पुणेकर मंडळींचा असल्यामुळे कोणतेही विशेषण काहीतरी वळवून, वाकवून आणि भरपूर कुचकटपणा मिसळून द्यायचं हे ठरलेलंच.

आमच्या ग्रुपमध्ये एक मुलगा येऊन जाऊन असायचा. आता त्याचं नावपण लक्षात नाही. त्याची एक अत्यंत जुनी मोपेड होती. कुठेपण रेस्टोरंटमध्ये जायचं ठरलं कि हा प्राणी उत्साहानं पुढे होणार आणि आमच्या बरोबर क्लासमधून निघणार. पण तिथं पोचणार मात्र हा सोडून सगळे. १-२ किलोमीटर जाताना कमीतकमी ३-४ वेळातरी याची मोपेड बंद पडणार. हा आला नाही बघून कोणीतरी हा कुठे कडमडला म्हणून परत जाणार. मग सगळे मिळून याची मोपेड चालू करणार. परत अर्धा किलोमीटर गेला की पुन्हा खरखर चालू! त्याच्या त्या मोपेडला आम्ही "स्ट्रीट हॉक" म्हणायचो!

तर सांगायचा मुद्दा हा की नंतर त्या पोरानं अचानक स्ट्रीट हॉकला तलाक दिला आणि सायकलवर हिंडायला लागला. कारण विचारलं तर सांगेना.  खोदून खोदून विचारलं तरी यव नाही इ त्यंव नाही.  मग इकडून तिकडून माहिती कानावर आली. कॉलेजात सगळेच भोचक असल्यामुळे अशा गोष्टी तशाही लपत नाहीत.

तर झालं असं होतं, की हा प्राणी एकदा त्याच्या स्ट्रीट हॉकवरून एका झोपडपट्टीवजा वस्तीतून चालला होता. त्यावेळी एक नतद्रष्ट कोंबडं त्याच्या मोपेडच्या खाली आलं. लोकं जमा व्हायला लागले तशी याची टरकली. स्ट्रीट हॉकला किक मारून साहेब निघाले कि जोरात. आणि इथेच कहाणीमध्ये "ट्विस्ट" आला! चिडलेल्या लोकांनी चक्क पळत पळत येऊन त्याला चालत्या गाडीवर गाठलं आणि धुलाई केली! त्याच क्षणी साहेबांनी स्ट्रीट हॉकला तलाक दिला.

या प्रकारामुळे त्याची जरी चिडचिड झाली होती तरी हा किस्सा ऐकून आमची चांगलीच करमणूक झाली, आणि या एका प्रकारामुळे स्ट्रीट हॉक मालिका चांगलीच लक्षात राहिली !

No comments:

Post a Comment

मुलींचे कपडे आणि NCB

परवा फेसबुकवर भिंतींना तुंबड्या लावत बसलेलो असताना माझ्या मित्रयादीतील एकाची पोस्ट पाहिली . सध्या बॉलीवूडमध्ये ड्रग्सवरून जे ...