Tuesday, July 17, 2018

पुनर्जन्म आणि पर्स्पेक्टिव्ह - Rebirth and Perspective


आजकाल आसपासच्या कोणत्याही व्यक्तींकडे पाहिलं तरी सतत एक चिडचिड, निराशा झरताना दिसते. कुणालाही विचारा ... त्यांच्या कामात, शाळेत, घरात ते समाधानी आहेत असं कुणीच म्हणत नाही. एक प्रकारचं असमाधान सगळीकडे व्यापून राहिलेलं आहे. यातून कुणी सकारात्मक विचार करू पाहत असेल तर मीडियाचा आणि समाजाचा नकारात्मक भडीमार एवढा असतो की कुणाचाच त्यापुढे निभाव लागत नाही.

अशा वेळी आयुष्य आपल्याला कधी कधी असा झटका देतं की आपण विचार करू लागतो... खरंच आपले प्रॉब्लेम्स एवढे मोठे आहेत, की मी या प्रॉब्लेम्सना त्यांच्या लायकीपेक्षा मोठं करतोय?

कधी कधी ही अक्कल एकाच झटक्यानं सुचत नाही, मग आयुष्य आपल्याला अजून एक झटका देऊन खात्री करून घेतं की "निरोप पोचलाय ".

गेल्या महिन्याभरात मला असेच दोन झटके बसले, आणि मला परत एकदा जाणीव झाली की आपण फालतू गोष्टींचं फार टेन्शन घेतोय. इट्स नॉट वर्थ इट!

प्रसंग पहिला:

मी आणि माझा मुलगा गेल्या महिन्यात लेह-लडाख ट्रिपसाठी निघालो होतो. पुणे एअरपोर्टवरून सकाळी पाचचं विमान होतं. रात्री तीन वाजेपर्यंत तिथे पोचावं या उद्देशानं मी :१५ ची टॅक्सी बुक केली. टॅक्सिवल्यानं आयत्या वेळी जरा येण्यासाठी आळमटळम चालू केली. पण मी त्याला ठासून सांगितलं की मी - तास आधी टॅक्सी बुक केली आहे, आणि त्याला यायलाच पाहिजे. मग तो दहा मिनिटं उशिरानं का होईना, उगवला.

आम्ही एअरपोर्टकडे निघालो. मी आणि ध्रुव मागच्या सीट्सवर बसलो होतो. रात्र असल्यामुळे रहदारी तुरळकच होती. गाडी सुरळीतपणे बंडगार्डन रस्त्याला आली.  गाडीचा वेग साधारण ५०-६० किलोमीटर असावा. मला आता डुलकी यायला लागली होती. ध्रुवला झोपच लागली होती.

गाडी बंडगार्डन रस्त्याच्या शेवटी आली. तिथे पोलिसांची एक गस्ती व्हॅन उभी होती, आणि पोलिसांनी अर्धा रस्ता बॅरीकेड्स लावून बंद केला होता. कदाचित जाणाऱ्या येणाऱ्या गाड्यांपैकी काही संशयास्पद आढळल्यास त्यांचा वेग कमी करून त्यांना रोखण्यासाठी असेल.

पण ते बॅरीकेड बघूनही आमच्या ड्रायव्हरने आपला वेग कमी केला नाही, आणि ते टाळण्यासाठी दिशाही बदलली नाही! त्यानं सरळ जाऊन त्या बॅरिकेडला धडक मारली! धडाम असा आवाज होऊन ते बॅरिकेड ५-१० फूट लांब उडून पडलं आणि गस्तीवरचे सगळे पोलीस धावत आले. तोवर आमची गाडी थांबली होती. पोलिसांनी आधी ड्रायव्हरला खाली उतरवलं आणि ते आमच्याकडे वळले.

कुठून आलात...कुठे चाललात वगैरे ठराविक प्रश्न झाल्यावर पोलिसानं जो प्रश्न विचारला त्यानंतर हातापायातलं त्राणच क्षणभर गेलं. तो मला म्हणाला ... "काय हो, ड्रायव्हरकडे लक्ष नव्हतं का तुमचं? तो आत्ता ड्रायविंग करताना चक्क झोपला होता!".

च्यामारी !

एका क्षणात अनेक नाही नाही त्या गोष्टी मनात तरळून गेल्या. देवदयेनं ते बॅरिकेड जर तिथे नेमकं त्यावेळी नसतं तर? आम्ही त्या बॅरिकेडला न धडकता एखाद्या भरधाव ट्रकला, बसला किंवा दुसऱ्या कारला धडकलो असतो तर? एखादा पादचारी किंवा सायकलस्वार त्यावेळी समोर आला असता तर?

एव्हाना पोलिसांनी त्या ड्रायव्हरला चार फटके देऊन चांगलाच "जागा" केला होता. पुढचे दोन दिवस तो झोपला नसेल! त्यानंतर एअरपोर्ट येईपर्यंत गाडीतले सगळे पाशिंजर टक्क जागे होते!

आता एवढं सगळं होऊनही काहीच नुकसान झाल्यामुळे या प्रसंगाचं फारसं गांभीर्य राहिलं नाही. पुढच्या ट्रीपच्या नादात हा प्रसंग एक छोटीशी आठवण म्हणून राहिला, आणि परत आल्यावर घरातल्या, ऑफिसमधल्या, सोशल मीडियामधल्या बारीकसारीक टेन्शननी पुन्हा एकदा आयुष्य व्यापून टाकलं. अर्थातच पुन्हा एकदा मेंदूवर एखादी टपली बसणं गरजेचं झालं.

प्रसंग दुसरा:

मागच्या आठवड्यातली गोष्ट. रात्री च्या सुमाराला मी कार चालवत घरी येत होतो. आमच्या घराजवळच एक नवीन उड्डाणपूल (फ्लायओव्हर) झालाय. त्या उड्डाणपुलाच्या बाजूनं एक अरुंद रस्ता आहे. उड्डाणपुलाच्या सुरुवातीला या दोन्हीच्या मध्ये साधारण - फूट लांबीचा डिव्हायडर आहे. उड्डाणपुलावरून जा, किंवा खालच्या रस्त्यानं, मला घरापर्यंत तेवढंच अंतर पडतं. त्यामुळे तिथे आल्यावर मी ठरवतो की आज पुलावरून जायचं की खालच्या रस्त्यानं.

त्या दिवशी अगदी "बंपर टू बंपर" वाहतूक होती, आणि उड्डाणपुलाच्या सुरुवातीला येईपर्यंत मी पार वैतागलो होतो. पावसानेही जोर धरला होता. त्यामुळे सगळेच हळूहळू चालले होते.
उड्डाणपुलाच्या जवळ आल्यावर मी पुढच्या वाहतुकीचा अंदाज घेतला, आणि मला जाणवलं की पुलावर खूपच गर्दी होती. त्यामुळे मी पुलाखालच्या रस्त्यानं जायचं ठरवलं. व्यवस्थित इंडिकेटर देऊन मी गाडी बाजूच्या रस्त्याला वळवली, आणि पुढे सगळा रिकामा रस्ता बघून वेग वाढवला.

अचानक मागच्या बाजूनं गाडीला जोरदार दणका बसला. पावसामुळे वळताना माझा अंदाज चुकला होता, आणि गाडीचं मागच्या डाव्या बाजूचं चाक तिथल्या डिव्हायडरवर चढलं होतं. मला काही समजायच्या आत गाडी डाव्या बाजूनं पूर्ण हवेत उचलली गेली, आणि उजव्या बाजूच्या दोनच चाकांवर धावू लागली! माझा आत थरकाप उडाला होता. सुदैवानं मी सीटबेल्ट्स लावलेले होते. नाहीतर मी कसाही इकडेतिकडे फेकला गेलो असतो.

गाडी एव्हाना ७०-८० अंशात उजवीकडे झुकली होती. जर ती उजव्या बाजूला आपटली असती, तर मी त्याच बाजूला होतो. तशा परिस्थितीत माझं काय झालं असतं कल्पना करवत नाही. पण नशीब असं बलवत्तर की उजव्या बाजूच्या एका रेलिंगवर गाडी सुरुवातीलाच आपटली होती, त्यामुळे तिच्या उजव्या बाजूला झुकण्याला लगाम लागला, आणि ती परत डाव्या बाजूला दणदिशी खाली आली. त्याचक्षणी पुढच्या डाव्या बाजूचं टायर फुटलं आणि मला एक नखशिखांत हादरा देऊन गाडी थांबली!

मी पहिले गाडी बंद केली. एव्हाना हा स्टंट बघून बरेच लोक धावत आले होते. माझ्या हातापायाला जोरदार कंप सुटला होता. आपले हातपाय जागेवर आहेत याची खात्री झाल्यावर कुणी आपल्या गाडीच्या खाली तर आलं नाही ना या शंकेनं अक्षरशः फाटली. मी गाडीच्या बाहेर आलो. बाकी कुणाला आपल्यामुळे काही झालं नाही बघून सुटकेचा श्वास घेतला.

मग जरा डोकं काम करायला लागलं. गाडीच्या सस्पेन्शनची आणि पुढच्या डाव्या बाजूच्या चाकाची पार वाट लागली होती. अशा परिस्थितीत गाडी चालवत घरी नेण्याचा प्रश्नच नव्हता. टो वेहिकल बोलावून, सगळी कागदपत्रं पूर्ण करून घरी यायला मला १२ वाजले. प्रचंड दमून गेलो होतो. पायांची वाट लागली होती. पण हे दुखणं जाणण्यासाठी हात-पाय शाबूत आहेत, आणि घरी जाण्यासाठी जीव आहे हा आनंद मोठा होता. एवढं दमूनसुद्धा झोप लागायला पुढचे तास लागले. सकाळी उठल्यावर देवाचे आभार मानून कामाला लागलो.

आज का कोण जाणे, कामाचं, नोकरीचं आणि पुढच्या आयुष्याचं रोजच्याएवढं टेन्शन जाणवत नव्हतं!


Today’s life is all about constant unpleasantness, irritation and always wanting more, never being satisfied or grateful. Ask anyone if they are satisfied in their lives, jobs, schools, and all you will get are complaints. No one is grateful for what they have, instead looking at others and ruing what they lack.

If anyone tries to defy the norms and think positive, the sheer force of negativity from media and people around them forces them to toe the negative line.

But sometimes, life sends us such jolts, that we are forced to introspect –  whether our so called big problems are really that big, or if we are making them big? And if one jolt is not enough to hammer this concept is us, life gives us more jolts till we wake up.

I got such jolts twice in last one month alone, and gave me a perspective that only life (and possibility of death) can. It made me realize that my problems are much smaller than they appear.


First jolt:

A month ago, I was travelling to Pune airport with my son. Both of us were sitting in the backseat of a cab, which was supposed to take us by 3:00 am to Pune airport for our 5:00 am flight. The roads were practically empty at these wee hours, and the cab was cruising at a comfortable speed of 50-60 kms. I was already feeling sleepy, and Dhruv was already asleep.

The cab reached Bung Garden road, and kept cruising till the end of the road, where a group of policemen had set up a barricade. They were inspecting random vehicles passing by. The barricade blocked half the road, making sure every vehicle slowed down near it.

However, our cab driver did not seem to be in mood to slow down, as he kept driving without braking, and before I could react, the cab had crashed head-on into the barricade. The impact was such that the barricade was thrown off five to ten feet, after which, thankfully, the driver stopped.

By this time, the stunned policemen came rushing towards us, and ordered everyone to get out. After deciding that we did not resemble any criminals / terrorists, they questioned us about where we were going. At this point, I realized that our cab driver had dozed off at the wheel.

What if the police had not set up that barricade on that night? Our cab, instead of colliding with the stationary (and harmless) barricade, may have crashed into a truck, or a bus, or another car. It could have mowed down a pedestrian, or a biker. It could have been in any of these scenarios, none of them pretty. I was very, very thankful to the universe that night.

However, getting out of this unscathed had its side effects. After the trip, the incident was forgotten, the usual pressures of office, home and life took over. Cribbing on tiny problems became a way of life, yet again. And then life came back to give me the second jolt!


Jolt 2:

Last week, about 9:00 pm. It was raining heavily, and the traffic was bumper to bumper. I was driving home from office in a car. I reached near a newly constructed flyover, which is hardly half a kilometer from my house. Adjacent to the flyover is a narrow road, which runs parallel to the flyover from below. Whether one drives over the flyover, or on the road below, the distance and time to reach my place hardly differs.

The flyover and the road are divided by a 3-4 feet stone divider before they part ways.

That night, as I reached near the flyover, I observed that it was very crowded, while the road below was nearly empty. So, I decided to skip the flyover, showed indicator, and turned on to the narrow road.

As the car entered the road, I increased the speed, since the road was deserted. Unknown to me, in the anticipation to get home, I had taken a more-than-necessary steep turn, resulting in the rear left tire of the car bumping against the road divider. As I sped on, I felt a crunch of the tire hitting the divider, followed by sudden tilt of the car.

I suddenly had a very sick feeling in my stomach when I realized that the car was now running on only its right-side wheels! The left side of the car had completely come off the ground and was tilting to the right side at an alarming rate.

At that time, seatbelts I was wearing made a life and death difference. If not for seatbelts, I don’t know how and where I would be flung. As I braced for the coming impact, much to my relief, the car suddenly tilted left and hit the asphalt extremely hard, completely jolting me inside and out. Just as I had entered the road, the car had hit a railing on the right side, killing the momentum of the tilt to the right side.

As the car hit the road, the front left tire burst with a bang, and it suddenly stopped. The whole ordeal must have taken less than five seconds, but it was enough to shake me to the core.

A crowd had gathered by then. People helped me get out and stand on my very shaky legs. After confirming that all my parts were still present where they are supposed to be, I was extremely relieved to know that no one else was hurt either.

Then the head took over, and I checked the car. The suspension was damaged and the tire (and alloy wheel) were beyond repair. There was no way anyone would be able to drive it. So I called the toe service and had it delivered to the garage. By the time the toe vehicle drove away, and the paperwork was done, it was midnight.

I came home completely exhausted, physically as well as mentally. But I was happy to be alive, and in one piece. It took me more than two hours to fall asleep even after so much exhaustion.

I woke up refreshed the next day, yet again thankful to the universe. 

I don’t know why, but all the problems, pressures and stresses of life suddenly felt insignificant now!

Saturday, June 30, 2018

सेन्सॉर बोर्ड आणि मठ्ठ प्रेक्षक! (Censor board and the Dumb Audience)


मागच्या आठवड्यात (स्वतःच्या) अर्धांगिनीसोबत एक हिंदी चित्रपट पाहण्याचा योग आला. लोकांना आजकाल चित्रपटगृहात जाऊन सिनेमे बघायला का आवडत नाही याच्या कारणांची यादी काढायची झाली तर हि हातभर लांब होईल. सारखे अवेळी वाजणारे मोबाईल फोन, घशात मुसळ कोंबल्याप्रमाणे "कुजबुजणारे" लोक, मल्टिप्लेक्सच्या पार्किंगपासून खाद्यपदार्थांपर्यंत चाललेली आपल्या पैशांची लूट ही काही प्रातिनिधिक कारणं. पण मला irritate करणारी मुख्य गोष्ट म्हणजे त्या चित्रपट पाहण्याच्या अनुभवात आपल्या महान सेन्सॉर बोर्डाची चाललेली लुडबुड!

मला परवाचा चित्रपट बघताना जी गोष्ट वारंवार खटकत होती तिची कदाचित बऱ्याच लोकांनी कधी नोंदही घेतली नसेल. त्या समस्त मंडळींची मी आधीच माफी मागतो. कारण पुढचं वाचल्यावर आता तुमचीही दर वेळी या मुद्द्यावरून चिडचिड होईल हे मला माहित आहे ... असो.

तर माझा मुद्दा मांडण्याआधी आपण "ब्रेकिंग द फोर्थ वॉल" आणि "suspension of disbelief" ह्या संकल्पना आधी समजून घेऊया. फार फार वर्षांपूर्वी, म्हणजे सिनेमा हा प्रकार जुना होण्याआधी गावोगावी आणि शहरोशहरी मनोरंजनाचं मुख्य साधन म्हणजे स्टेजवर होणारी नाटके. काही अपवाद सोडले तर नाटक या प्रकारामध्ये काही भाग अगदी तसाच राहिला आहे. उदाहरणार्थ स्टेज आणि विंगचा भाग. प्रेक्षकांच्या बरोबर समोर स्टेज असतं आणि उजव्या, डाव्या बाजूला विंगा. या सगळ्या सेटअपमुळे होतं काय, तर स्टेजवरील कलाकार आणि समोर बसलेले प्रेक्षक यांच्या मध्ये जणू एक अदृश्य भिंत तयार होते. स्टेजवरील कलाकार स्टेजच्या मागचा पडदा (भिंत क्र १), उजव्या आणि डाव्या बाजूच्या विंगा (भिंत क्र २ आणि ३) यांच्या मध्ये परफॉर्म करत राहतो, आणि प्रेक्षकही चौथ्या अदृश्य भिंतीमधून नाटक अनुभवतात. ही अदृश्य भिंत स्टेजवरच्या कलाकारांना प्रेक्षकांपासून वेगळं ठेवते. जणूकाही प्रेक्षक त्या नाटकातील पात्रांच्या नकळत त्यांच्या आयुष्यात डोकावून बघण्याचा अनुभव घेत असतो!

आता टीव्ही, कॉम्पुटर, टॅबलेट, मोबाईल किंवा सिनेमाहॉलचा पडदा यातील कोणत्याही ठिकाणी आपण कुठचाही शो किंवा सिनेमा बघतो तेव्हाही हि चौथी भिंत कलाकार आणि प्रेक्षकांत असतेच.

अर्थात कधीकधी कथेची गरज म्हणून, कधी गिमिक म्हणून, तर कधी प्रेक्षकांना नाटकात सामावून घेण्याचा प्रयत्न म्हणून काही कलाकार जाणूनबुजून हि चौथी भिंत भेदून टाकतात. उदाहरणार्थ एखादा कलाकार सूत्रधार म्हणून डायरेक्ट प्रेक्षकांशी संवाद करेल, तर कधी प्रेक्षकांकडून हशा आणि टाळ्यांची दिलखुलास मागणी करेल. पण असं करताना कलाकाराला हे भान नेहमी ठेवावं लागतं की त्याच्या आणि प्रेक्षकांमध्ये ही चौथी भिंत कायम असलीच पाहिजे, आणि ती भेदणे किंवा भक्कम ठेवणे ही त्या कलाकाराची निवड असते.

दुसरी संकल्पना म्हणजे "suspension of disbelief". यामध्ये प्रेक्षक राजीखुशीने आपला अविश्वास बाजूला ठेवून समोर चाललेल्या नाटक वा सिनेमाला खरं मानतो. काही काळासाठी ही समोर चाललेली कथा काल्पनिक आहे हे विसरून तो त्यात रममाण होतो. त्यातल्या पात्रांच्या सुखदुःखात स्वतःची भावनिक गुंतवणूक करतो. जेवढा हा "suspension of disbelief" तगडा, तेवढा त्या कलाकृतीचा impact जास्त. त्यामुळे प्रत्येक लेखक-दिग्दर्शक सर्वाधिक आटापिटा करत असतो तो प्रेक्षकांनी त्यांच्या पात्रांना खरं मानावं याचा.
तर आता परवाच्या सिनेमावर परत येऊयात.

तर या सिनेमामध्ये दारू पिण्याचे आणि सिग्रेटी फुंकण्याचे मोप सीन्स होते. आजकाल सिगारेट फुंकणारी लोकं नाक्यानाक्यावर दिसतात. सिगरेट पिणं ही आजकाल चोरून करायची गोष्ट राहिली नाहीये.

मी स्वतः कधी सिगारेट ओढली नाही, लोक ती का ओढतात हे मला समजलेलं नाही, आणि जोवर त्या सिगारेटचा धूर मला घ्यावा लागत नाही तोवर त्यांनी (त्यांच्या पैशांनी ) कितीपण सिगारेटी ओढल्या तरी त्यावर माझा कोणताही आक्षेप नाही. पण एक गोष्ट नक्की आहे की सिगारेटी ओढणाऱ्यांमध्ये असा / अशी कुणीही नसेल जिला सिगारेटचे दुष्परिणाम माहित नाहीत. तरीही ते फुंकत असतील तर तो त्यांचा चॉईस आहे , अज्ञान नाही.

पण यात माझी चिडचिड व्हायला काय झालं?

तर सिनेमामध्ये कधीपण सिगारेट फुंकण्याचा सीन आला कि स्क्रीनच्या उजव्या बाजूच्या खालच्या कोपऱ्यात एक सूचना झळकायची "SMOKING KILLS". आता साधा कॉमनसेन्स आहे ... जो माणूस सिगरेट फुंकतो त्याला आणि जो नाही फुंकत त्यालापण हे आधीच माहित आहे. जो सिग्रेटी फुंकतो तो हि सूचना बघून फुंकायचं थांबणार नाही. ज्याला फुंकायचं नाही त्याला तसंही सिनेमामधला सीन बघून काही फरक पडत नाही. या सूचनेनं फक्त होतं काय तर प्रेक्षकाला समोरच्या सिनेमापासून क्षणभर detach व्हायला होतं. ती चौथी अदृश्य भिंत क्षणभर भेदली जाते, प्रेक्षकांच्या suspension of disbelief ला तडा जातो  आणि प्रेक्षकाची त्या सीनमधली  भावनिक गुंतवणूक आपोआप कमी होते.  आणि हे सतत होत राहते.

सेन्सॉर बोर्डाला प्रेक्षक एवढे मठ्ठ वाटतात का? सगळीकडे सगळ्यांना अक्कल शिकवण्याच्या नादात कलाकृतीच्या अनुभवाला आपण नख लावतोय हे कुणालाच समजत नसेल का? मुळात आपल्या रोजच्या समस्या विसरण्यासाठी, एका कथेमध्ये हरवून जाण्यासाठी लोक सिनेमाला जातात, तर तिथेपण लेक्चर! नशीब ... अजून चुंबनदृश्यांमध्ये "KISSING INVOLVES EXCHANGE OF BACTERIA" च्या सूचनांची सक्ती केली नाहीये! मग लोकांनी सिनेमे डाउनलोड करून पाहिले तर त्यांचा काय दोष?



Last week, I had the good fortune of going to multiplex with (my own) wife to watch a Hindi movie. If one tries to infer why people now-a-days prefer watching movies at home rather than cinema halls, it will be a long list. Some definitive reasons include loud mobile ringtones, equally loud fellow cinemagoers and the open loot of our hard-earned money, right from the multiplex parking to the multiplex food.

However, the thing that bothered me while watching the movie last week was none of the above. If you didn’t notice what I am going to tell you now, I apologies for spoiling your viewing experience. But I will tell it anyway!

Let’s first understand two important concepts. These are extremely important to understand why and how we enjoy our entertainment. First concept is “Breaking the fourth wall” and the second is “suspension of disbelief”.  

A long time ago, when there was no film, the primary source of entertainment was the live shows which happened in towns and villages. These shows were performed on a stage, which had a rear wall (wall # 1) and right & left wings (wall # 2 and 3). The actors pretend that they do not see the audience, while the audience watches the plays / performances through “the fourth wall” which separates them from actors. It’s as if the audience watches the events in the play without the knowledge of the characters involved.

Regardless of whether we consume a show or a movie via our tab, computer, mobile phone, TV or cinema hall, the concept of this fourth wall remains the same.

Sometime, this fourth wall is breached by an actor by choice. It may be done simply as a gimmick, or due to demand of the story / screenplay. For example, a comedian / anchor may directly interact with audience, asking questions, or demanding applause. But an actor is always conscious of the fact that the fourth wall is always present and breaching it is his/her choice.

The second important concept is “suspension of disbelief”. It means the willingness of the audience to keep aside the knowledge that whatever is happening on screen is an act, and believe it as reality for the duration of the act. Suspension of disbelief gives us the ability to get involved in the act, to identify with the characters, to enjoy their triumphs and cry with their sorrows. The most successful directors have mastered this art of imbibing the suspension of disbelief in their audiences.

So let’s come back to the movie I watched last week and the reason for my ire.

There were dozens of scenes in that movie involving smoking and drinking. Cigarette smoking is fairly common now-a-days and not a big deal anymore.

I have never smoked in my life and I still do not understand why people find smoking so fascinating. Frankly, I don’t care whether someone smokes or not, as long as they do so with their own money and not involve me in passive smoking. However, I am pretty sure there’s no one out there in this era of information explosion who is unaware of the ill effects of smoking. If anyone smokes, it’s because of their choice, not because of lack of awareness.

But what triggered my ire?

Wherever there was a smoking scene in the movie, a warning would appear in the lower right hand corner of the screen … “SMOKING KILLS”. It’s a common sense to understand that everyone in the audience, smoker or non smoker, is aware of this fact. They need not be told this again and again. The one who smokes will surely ignore this warning. The one who does not, need not see this warning. So what’s the point of showing this on screen? The only purpose it serves is momentarily breaking the fourth wall and bringing audience out of their suspended disbelief. This automatically breaches their emotional involvement in the movie. And this just keeps happening.

Does the censor board think that audiences are so dumb? Don’t they realize that the only purpose their forced education efforts serve is diluting the moviegoing experience of the audience? People go watch the movies to forget themselves in another reality, and the censor board is hell bent on educating them even in the other reality! I won’t be surprised if censor board mandates the “KISSING INVOLVES EXCHANGE OF BACTERIA” warning in the kissing scenes in future movies! No wonder people prefer to download movies and watch them at home!

Wednesday, June 6, 2018

शूरा मी वंदिले ...












मागच्या आठवड्यात श्रीनगर - लेह - लडाख  सहल झाली. तिथली थंडी, अफाट डोंगरदऱ्या, विरळ हवा,  निसर्गाशी माणसाची चाललेली अखंड झुंज याची आता आपल्याला  चांगलीच ओळख आहे. आपल्या परिचयातील अनेक लोक तिथे जाऊन आलेही असतील. त्यामुळे त्यात नवीन फारसं काही सांगण्यासारखं नाहीये.

पण  जो अनुभव इथे सांगणार आहे तो माझ्या दृष्टीने खूप unique आणि संस्मरणीय आहे.
आम्ही पुणे-दिल्ली-श्रीनगर असा विमानप्रवास करून, श्रीनगरला  एक रात्र मुक्काम करून, मग पुढच्या दिवशी कारगिलला गेलो. एरवी कुणालाही माहित नसणारं हे छोटसं गाव १९९९ ला एकदम प्रकाशझोतात आलं ते पाकिस्तानी लष्करानं केलेल्या कुरापतींमुळे. श्रीनगरपासून  सियाचीनपर्यंत जाणाऱ्या "नॅशनल हायवे १" ला लक्ष्य करण्यासाठी १५० किलोमीटर्स च्या परिसरातील ४५० ठिकाणी पाकिस्तानी सैन्याने घुसखोरी करून dominating positions घेतल्या.

प्रचंड कडाक्याची थंडी, विरळ हवा (एरवी ४-६ जिने  सहज चढणाऱ्या मला एखादा जिना चढताना तिथे धाप लागत होती), वरून होणारा मशीनगन्स, तोफा आणि उखळी तोफांचा तुफान आणि अचूक मारा,  या सगळ्याला तोंड देत आपल्या जवानांनी अशक्य वाटणारा विजय खेचून आणला. आज कारगिल, द्रास आणि बटालिक या ३ सेक्टर्समधील १५० किलोमीटर परिसरातील सर्व dominant positions भारतीय लष्कराकडे आहेत.

पण हे "ऑपरेशन विजय" पार पाडताना आपल्याला ५६९ जवानांच्या प्राणांची आहुती द्यावी लागली. १,५०० पेक्षा जास्त सैनिक या लढायांमध्ये जखमी झाले. या सर्व वीरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ द्रास येथे एक विजयस्मारक उभारण्यात आले. आमच्या सहलीदरम्यान आम्ही या विजयस्मारकाला भेट दिली.

मला आपल्या जवानांसाठी कृतज्ञता म्हणून काहीतरी भेटवस्तू देण्याची इच्छा होती. म्हणून मी कारगिल युध्दाच्या थिमवर काही पेंटिंग्स बनवली होती. स्मारकाच्या आवारात  प्रवेश करताच मी तिथल्या काही जवानांना भेटून त्यांना ती दिली.

त्या जवानांनी माझ्या आग्रहाखातर तिथेच पॅकिंग उघडून पेंटिंग्स पहिली. ती पाहिल्यावर त्यांच्या डोळ्यातल्या आनंदानंच मला माझ्या कामाची पावती मिळाली. मी हॅन्डशेक करण्यासाठी  हात पुढे केला तर त्याने पुढे होऊन मला मिठीच मारली ! एवढ्या त्या दणकट जवानांच्या डोळ्यांत पाणी उभं राहिलं होतं. तो मला म्हणाला, "आप जैसे  लोगोंकी वजहसे हमें ताकत मिलती है इतनी उन्चाईपे सर्व्ह करने की!" माझ्या सगळ्या सहलीचा तो सर्वोच्च बिंदू होता!

ताजा कलम : 


कारगिल परिसरात हिवाळ्यात तापमान -४० ते -५० पर्यंत खाली जातं. द्रासचे विजयस्मारक समुद्रसपाटीपासून १०,००० फूट आहे. तिथेही हवा विरळ असते. ऐन उन्हाळ्यात आम्ही तिथे थंडीनं कुडकुडत होतो. हिवाळ्यात तिथे १०-१० फूट बर्फ असतो. तिथल्या जवानाच्या शब्दांत : "आप winter में  यहाँपे टोमॅटोसे क्रिकेट खेल सकते हो!"

आपले सैनिक द्रास-कारगिल-बटालिक मध्ये १२ महिने - २४ तास समुद्रसपाटीपासून २०,००० फुटांपर्यंतच्या चौक्यांमधून पाकिस्तानी सैन्यावर नजर ठेवून असतात. त्यांना रसदपुरवठा संपूर्णपणे पायी जाऊन करावा लागतो, कारण त्या खडतर पहाडांवर रस्ते टिकत नाहीत. रसद नेणारे सैनिक ३२ किलोचा "battle लोड" + रसद घेऊन त्या विरळ हवेत पहाड चढून जातात.  या जवानांना साष्टांग दंडवत घातला तरी तो अपुरा आहे. इथे सुरक्षित वातावरणात बसून जवानांना कॅन्टीनच्या सवलती का मिळतात म्हणून गळे काढणाऱ्या लोकांनी अशा ठिकाणी आवर्जून भेट द्यावी. जिद्द आणि निःस्वार्थी सेवा याचा अर्थ कळेल.

Sketching and painting on Kargil war theme after some research and framing/packaging – few hundred rupees

Travelling to Dras war memorial with those paintings – few thousand rupees

Presenting the paintings to the bravehearts who kicked Pakistani army’s ass and experiencing their joy firsthand – PRICELESS!



English Version


Last week, I went for a trip to Srinagar-Leh-Ladakh. Nowadays, it’s a common tourist destination, and many people around us have already made the trip. So there’s nothing new in the description of the inhospitable terrain, winding roads, cold & crisp weather, and man’s constant struggle with nature.

But the experience I am going to share here is very unique and memorable for me personally.

After travelling to Srinagar and staying there for a night, we started towards Kargil. Kargil is a small town which was virtually unknown in India till 1999. It suddenly came in limelight when Pakistani army made a large scale incursion along Dras-Kargil-Batalik Sectors.  The tall peaks along these sectors are at a strategic position. They overlook the NH1 from Srinagar right up to Siachen glacier. Pakistani forces captured 450 strategic posts along a distance of 150kms and took up dominating positions over those peaks.

The ensuing battles saw Indian armymen facing not only the enemy at dominating positions hammering them with mortars, heavy machine guns, and artillery, but the Nature too. It was biting cold and due to the height of Kargil from sea level, the oxygen levels are low.

In spite of these odds, Indian army recaptured all dominating peaks and made Pakistanis run back with their tails between their legs. But this Vijay came at the heavy price. 569 soldiers and officers martyred, and more than 1,500 wounded.

A war memorial was erected right at the foot of the hills where the battles took place, in the Dras sector. We visited this memorial on the way to Kargil.

I wanted to present something to these armymen as a token of gratitude, and what better way than a series of paintings on the Kargil war? I had spent a Saturday prior to leaving for the trip making some paintings on the theme of Kargil war, and had taken them with me to the memorial.

When we entered the premises of the memorial, I met some officers / NCOs and presented them the paintings. When they saw the paintings, the look in their eyes confirmed that it was all much more than worth it! I extended my hand to the armyman to shake, but he just came forward and tightly embraced me! That tough-as-nails jawan said to me with tears in his eyes, "आप जैसे  लोगोंकी वजहसे हमें ताकत मिलती है इतनी उन्चाईपे सर्व्ह करने की!" (It’s because of people like you that we get the strength to serve in such difficult conditions). It was THE highlight of my trip!

P. S.

Kargil has extremely hostile weather. In winter, the temperatures drop up to -40 to -50 degree C. Even in summers, we were feeling the biting cold.

The war memorial is located at more than 10,000 feet above sea level. The oxygen levels are lower than what we are used to. In winter, the landscape is covered by up to 10-12 feet of snow. In the words of the jawan there, “you can play cricket using a tomato in winter here!”.

Our soldiers keep a watchful eye on Pakistani army in Dras-Kargil-Batalik sector 24 X 7 X 365 days. The highest points where these soldiers serve are as high as 20,000 feet above sea level. The food and supplies have to be sent on foot, since roads cannot be constructed and maintained in such harsh conditions. The soldiers who carry these supplies do so in addition to the 32 KG battle loads they carry with them… in rarefied atmosphere! 

It’s simply unimaginable how much hardships these men endure to keep us safe. Everyone who thinks armymen get anything more than they deserve must visit these places. It’s a very sobering experience.

Last but not the least….
Sketching and painting on Kargil war theme after some research and framing/packaging – few hundred rupees

Travelling to Dras war memorial with those paintings – few thousand rupees

Presenting the paintings to the bravehearts who kicked Pakistani army’s ass and experiencing their joy firsthand – PRICELESS!


Friday, March 16, 2018

बंड्याउवाच - पॅरिसमधला थरार!




काहीवेळा लहानपणापासून स्वप्नवत वाटणाऱ्या गोष्टी अचानक काही काळ अनपेक्षितपणे एक दुःस्वप्न बनून समोर येतात. असंच काहीसं माझ्या बाबतीत झालं जगातील सर्वाधिक रोमँटिक आणि स्वप्ननगरी समजल्या जाणाऱ्या पॅरिसमध्ये! लहानपणापासून पॅरिस बघणं हे माझं स्वप्न होतं. पण पॅरिसमधला माझा पहिला अनुभव थरकाप उडवणारा होता.

बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट. मी स्कॉटलंडमध्ये ग्लासगो शहरात कामानिमित्त राहत होतो. ऑगस्ट महिन्यात एक "लॉंग वीकएंड" आला आणि मी कुठेतरी भटकायला जायचं ठरवलं. ग्लासगोला आल्यापासून जास्तीतजास्त यूरोप बघून घ्यायचा हे ठरवलंच होतं. त्यातून आयुष्यात एकदातरी पॅरिस बघितलंच पाहिजे हे ठरवलं होतं. त्यामुळे यावेळी पॅरिसला जायचं नक्की केलं.

त्याचवेळी भारतातून माझा एक मित्र फ्रान्समधील एका गावात त्याच्या ऑफिसच्या कामानिमित्त आला होता. तो आणि त्याचे ऑफिसमधले काही सहकारी त्याच सुमाराला पॅरिस बघायला येणार होते, त्यामुळे आम्ही एकत्रच पॅरिस बघण्याचा बेत आखला. ते चारजण ट्रेननं पॅरिसला गुरुवारी संध्याकाळी पोहोचणार होते आणि मी ग्लासगो-लंडन-पॅरिस असा विमानानं त्याचदिवशी रात्री पोहोचणार होतो. भारतीय सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या परंपरेला अनुसरून मी सर्वात स्वस्त अशा "रायन एअर" या विमानकंपनीचं तिकीट बुक केलं होतं.

रायनएअर हि यूरोपमधली सर्वात स्वस्त विमानकंपनी आहे. पण हा स्वस्तपणा इतकापण स्वस्त नसतो हे त्या विमानात बसण्यापासूनच समजतं! रायन एअरची विमानं नेहमी कुठल्यातरी लांबच्या कोपऱ्यातल्या विमानतळावरून उडतात / उतरतात, जिथे कोणतीही धड बस वगैरेची सोया नसते. विमान उतरल्यावर साधारण अर्ध्या पाऊण तासानं एकमेव बस सगळ्या प्रवाशांना घेऊन पुढे तासभर प्रवास करून मुख्य शहरामध्ये आणून टाकते (त्या बसचं तिकीट वेगळं काढावं लागतं !).

आमचं विमान ठरलेल्या वेळेपेक्षा भरपूर उशिरा पॅरिसमध्ये उतरलं. त्यानंतर ती एकमेव बस पकडून पॅरिस शहरात जेव्हा मी पोचलो तेव्हा रात्रीचा एक वाजून गेला होता.  बस मधून उतरल्यावर मी ज्या हॉटेलचं बुकिंग केलं होतं तिथे पोहोचण्यासाठी मला टॅक्सी करणं आवश्यक होतं.  बसमधून उतरलेले सगळेच प्याशिंजर टॅक्सीच्या शोधात होते. त्यामुळे लवकर टॅक्सीपण मिळेना. जेव्हा मोठ्या मुश्किलीनं टॅक्सी मिळाली तेव्हा लक्षात आलं कि त्या ड्रायव्हरला इंग्लिश येत नव्हतं!

एव्हाना मी भुकेनं कावलेलो आणि प्रचंड दमलेलो होतो. टॅक्सिवाल्याला पत्ता लिहून आणलेला कागद दाखवला आणि चल म्हणालो. त्यानं टॅक्सी चालू केली, १-२ किलोमीटर पुढे नेली आणि खुणेनं मला सांगितलं कि या पुढचा रस्ता मला माहीत नाही. मी कपाळाला हात लावला. कारण टॅक्सी चालवणाऱ्याला रस्ते माहित असावेत हि माझी किमान अपेक्षासुद्धा फोल ठरली होती. त्या काळात GPS वगैरे चैनीच्या गोष्टी नव्हत्या. त्यामुळे आता ते हॉटेल शोधायचं कसं हा मोठा प्रश्न होता. एव्हाना रात्रीचे पावणेदोन झाले होते. या आडवेळी पत्ता विचारणार तरी कुणाला?

मग पुन्हा एकदा दमशेरा खेळायचा अनुभव कामाला लावला आणि खाणाखुणा करून त्याला सांगितलं की बाबारे, मला पुढच्या चौकात तरी सोड. त्यानंपण  माझ्यावर उपकार केल्याच्या थाटात गाडी चालू केली.

पुढच्या चौकात पोचलो आणि एकदम मला सुरक्षित वाटलं. तिथे एक पोलिसांची व्हॅन उभी होती आणि ६-७ सशस्त्र पोलीस तिच्या आसपास उभे होते. मी टॅक्सिवाल्याला (खुणेनं) म्हणलं, "मला इथेच उतरव". त्यानं पडत्या फळाची आज्ञा घेऊन मला offload केलं.

खाली उतरून मी माझी कपड्यांची बॅग पाठीला अडकवली, माझ्या SLR कॅमेऱ्याची बॅग पुढच्या बाजूला अडकवली, आणि उत्साहानं चालत पोलिसांकडे गेलो. एव्हाना सगळी पोलीसमंडळी व्हॅनमध्ये बसायला लागली होती. झपाझप चालत त्यांच्या दिशेनं येणाऱ्या माझ्याकडे मख्खपणे बघत एकच पोलीस बाहेर उभा  होता. मी त्याच्या पुढ्यात जाऊन उभा राहिलो आणि वदलो, "Do you speak English?".

त्या पोलिसाने माझ्याकडे एक तुच्छ फ्रेंच कटाक्ष टाकला आणि म्हणाला ... "नो". तो एवढंच बोलून थांबला नाही तर त्यानं माझ्याकडे चक्क पाठ फिरवली, आणि तो व्हॅनमध्ये अंतर्धान पावला. व्हॅनचा दरवाजा धाडकन बंद झाला आणि ती पोलीसव्हॅन माझ्या डोळ्यांसमोरून चालती झाली ! मला काही मदत हवी आहे का हे विचारण्याचे कष्टही त्यानं घेतले नव्हते.

हे सगळं इतक्या क्षणार्धात घडलं की मला काही सुचेचना .. हसावं कि रडावं की माझ्या झालेल्या अपमानाबद्दल चिडावं ! पण त्याक्षणी पोटातली भूक आणि पाठीत येऊ पाहणारी उसण याशिवाय काही भावना मनाला शिवत नव्हती.

आता मी चालत चालत हॉटेल शोधायला निघालो आणि “आपली फाटणे" हे फीलिंग काय असतं याचा मला चांगलाच फील येऊ लागला! मी जिथे टॅक्सिमधून उतरलो होतो ती वस्ती फारशी चांगली नाहीये हे आता मला जाणवत होतं. रात्रीचे दोन वाजत आले तरी रस्त्यावर थोडीफार वर्दळ होती. आणि ती सर्व वर्दळ आफ्रिकन आणि अरब तरुणांची होती. ४-५ च्या घोळक्याघोळक्यानं रस्त्याच्या बाजूला कट्टा जमवून अपरात्री चकाट्या पिटणारी ती पोरं बघून मला जाम टेन्शन आलं.
माझ्या पाठीवर आणि छातीवर अशा दोन बॅगा होत्या. मी प्रचंड दमलेलो होतो. गेले ६-७ तास माझ्या पोटात अन्नाचा कण नव्हता. आणि त्या सर्व लोकांमध्ये मी उपरा आहे हे कुणीही सांगू शकलं असतं. त्यावेळी मला कुणी लुटलं असतं किंवा भोसकून  कुठे फेकून दिलं असतं तर मी अक्षरशः काहीही करू शकलो नसतो. ना पायात पळण्याची शक्ती होती, ना घशात ओरडण्याची!

अशाच परिस्थितीत मी किमान अर्धा तास त्या रस्त्यांवर फिरत होतो. दोन- चार लोकांना  जरा  हिम्मत करून पत्ता विचारला, पण कुणालाच इंग्रजी येत नव्हतं, किंवा त्यांची इंग्रजी बोलायची इच्छाच नव्हती. मला मात्र जोरजोरात रडायची इच्छा होत होती. काही केल्या हॉटेल सापडत नव्हतं. थोड्या थोड्या वेळानं चकवा लागल्याप्रमाणे मी परत त्याच त्याच रस्त्यांवर यायला लागलो.

त्या विशिष्ट गल्लीमध्ये मी का गेलो आणि कसा गेलो हे मला अजूनही आठवत नाही. खरंतर कुठल्याही सुनसान गल्ल्यांमध्ये जाणं त्यावेळी जास्त धोकादायक होतं. पण मला बहुदा ती गल्ली आहे हे समजलंच नसावं. मला तिथे एक साधारण विशीतला तरुण दिसला. बाजूला लावलेली त्याची सायकल तो बाहेर काढत होता. मला त्याच्याशी का बोलावंसं वाटलं माहित नाही, पण एका intuition ने मी त्याच्याकडे गेलो. त्याला तो हॉटेलचा पत्ता लिहिलेला कागद दाखवला आणि खाणाखुणा करून चौकशी चालू केली.

आणि इथे कहानीमें जोरदार twist आला !!

त्या माणसानं दोन-तीन सेकंद माझ्याकडे पाहिलं आणि मला विचारलं "Do you speak English?".  काय सांगू , त्या रात्री ऐकलेले हे सगळ्यात स्वर्गीय शब्द! मला आनंदातिशयनं इंग्लिशही आठवेना! त्याला मी शोधत असलेल्या हॉटेलचा पत्ता नेमका माहित होता, ते हॉटेल पलीकडच्याच गल्लीत होतं आणि तो माणूस अतिशय सज्जन होता. तो मला नुसता हॉटेलचा पत्ता सांगून थांबला नाही तर स्वतः मला हॉटेलच्या दारापर्यंत सोडायला आला, बेल वाजवून रिसेप्शनिस्टला फ्रेंच भाषेतून माझी सोय लावायला सांगून मगच तो त्याच्या घरी गेला.

रिसेप्शनिस्टनं मला माझी खोली दाखवली. एव्हाना रात्रीचे साडेतीन झाले होते. पोटात अजूनही भुकेची आग होती. पण खाण्याचेही त्राण नव्हते. हा सगळं थरार ओसरल्यावर हात पाय लटपटायला लागले होते. मी तसाच आडवा झालो आणि काही मिनिटांत गाढ झोपून गेलो. सकाळी एकदम फ्रेश होऊन उठलो. सगळी बाकी मंडळीही मग भेटली, आणि पुढची ट्रिप बाकी काही exciting गोष्टी न होता पार पडली.

त्या रात्री पॅरिसमध्ये त्या माणसाच्या रूपानं साक्षात देवदूतच मला भेटला. त्या रात्रीचा तो थरार मात्र कायमचा लक्षात राहिला.

मुलींचे कपडे आणि NCB

परवा फेसबुकवर भिंतींना तुंबड्या लावत बसलेलो असताना माझ्या मित्रयादीतील एकाची पोस्ट पाहिली . सध्या बॉलीवूडमध्ये ड्रग्सवरून जे ...