Thursday, December 14, 2017

बंड्याउवाच - #MeToo, बॉलीवूडच्या बायका आणि लैंगिक छळ

गेल्या महिन्यात #MeToo असा एक हॅशटॅग इंटरनेटवर सर्वत्र गाजत होता. ज्या लोकांना आत्तापर्यंतच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारच्या लैंगिक छळाला सामोरं जावं लागलं असेल त्यांनी हा हॅशटॅग आपल्या फेसबुक प्रोफाइलवर लावावा असं आवाहन झालं आणि बघता बघता हे लोण सगळीकडे पसरलं.

आता अशा प्रकारचे बरेच ट्रेंड्स इंटरनेटवर येतात आणि जातात. काही लोक प्रत्येक ट्रेंडमध्ये उत्साहानं सहभागी होतात, काही लोक सरळ कानाडोळा करतात, तर काही लोक त्यांची टर उडवण्यात धन्यता मानतात. टर उडवणाऱ्या लोकांचं (बऱ्याचदा रास्त) मत असतं की हे सगळे हॅशटॅग वगैरे लावणं आणि अमक्या तमक्याला फेसबुकवर सपोर्ट करणं म्हणजे कुठेतरी दहशतवादी हल्ले झाल्यावर मेणबत्त्या घेऊन मोर्चे काढणाऱ्या लोकांसारखं असतं. काही विशेष करावंही लागत नाही आणि काहीतरी केल्याचं समाधानही मिळतं!

पण या हॅशटॅगच्या बाबतीत थोडं वेगळं झालं. माझ्या मित्रयादीतल्या बऱ्याच मुलींनी हा हॅशटॅग त्यांच्या प्रोफाइलला लावला. आणि मला खात्री आहे की ज्या मुलींनी तो लावला नाही त्या एकतर अजूनही त्या आठवणी टाळतायत किंवा फेसबुकवर जास्त ऍक्टिव्ह नाहीयेत!

एकही पुरुषानं हा टॅग लावलेला मी तरी पाहिला नाही. पुरुषांना लैंगिक छळाला  सामोरं जावं लागत नाही असा याचा अर्थ नाही. पण त्यांच्यासाठी असं काही आपल्या बाबतीत झालंय हे सांगण्याचीही जास्त लाज असते. लहानपणापासून पुरुष म्हणून शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या ताकदवान राहण्याचा एवढा दबाव असतो की मनातली घालमेल बाहेर काढण्याऐवजी मुखवटे घालून वावरणं जास्त सोपं वाटतं (म्हणूनच बहुदा पुरुषांमध्ये हृदयविकारांचं प्रमाण जास्त असतं).

पण गमतिची गोष्ट अशी की #MeToo ची टर उडवणाऱ्या जवळजवळ सर्व लोकांचा एकच मुद्दा होता ... लैंगिक छळ काय फक्त बायकांचा आणि मुलींचा होतो का? पुरुषांचापण होतो. पण पुरुष कधी त्याचा असा टेम्भा मिरवतात का?

हे असं बोलणाऱ्या लोकांना एकच सांगावंसं वाटतं की आपल्या इथे लैंगिक छळ ही काहीच पुरुषांच्या वाट्याला येणारी दुर्दैवी घटना असते, पण दुर्दैवानं कोणत्याही मुलीची त्यातून सुटका नसते. मग हा छळ रोडरोमिओंच्या शिट्ट्यांपासून बलात्कारापर्यंत कोणताही असू शकतो. आपल्या आसपास एकही मुलगी/स्त्री अशी नसेल जिने एकही नकोसा स्पर्श सहन केला नसेल. आणि सर्वांत वाईट गोष्ट म्हणजे जी लोकं हा छळ करत असतात त्यांना आपण काही वेगळं किंवा वाईट करतोय याची जाणीवही नसते!

काही वर्षांपूर्वी एका नामांकीत IT कंपनीमध्ये काम करणाऱ्या माझ्या एका सहकाऱ्यानं तो कॉलेजमध्ये असताना मुद्दाम गर्दीच्या ठिकाणी मुलींच्यावर "चान्स मारायला" कसा जायचा याच्या गोष्टी मला सांगितल्या होत्या. हा माणूस स्वतः एका मुलाचा बाप होता, पण आपण काही वावगं करत होतो या भावनेचा लवलेश त्याच्या बोलण्यात नव्हता. असला तर अभिमानच होता.

कॉलेजमध्ये असताना एका ओळखीच्या मुलानं "मी गाडी चालवताना एकही मुलीला मला ओव्हरटेक करून देत नाही" अशी शेखी मिरवली होती.

काही वर्षांपूर्वी आमच्याबरोबर काम करणाऱ्या एका स्मार्ट ड्रेसिंग करणाऱ्या, मेकअप वगैरे करणाऱ्या आणि पुरुष सहकार्यांना चॅलेंज करणाऱ्या एका मुलीबद्दल माझ्या काही सहकाऱ्यांचे उद्गार - "बॉस खूष असणारच तिच्यावर ..  मोठे bXXXs  असले की सगळं चालून जातं".

पण या सगळ्या गोष्टींचा बॉलीवूडशी काय संबंध?

बॉलीवूडनं या सर्व गोष्टींचं ग्लोरिफिकेशन केलं!

या गोष्टी आपल्या इतक्या अंगवळणी पडल्यात की त्यात काही वावगंही वाटेनासं झालंय. आता आपल्याला रस्त्यांवर खड्डे, अस्ताव्यस्त पडलेला कचरा, मोकाट हिंडणारी भटकी कुत्री यांची जशी सवय होते आणि आपण त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करायला शिकतो, तसंच मुलींच्या लैंगिक छळाची सवय होऊन जाते!

गेल्या काही वर्षांपासून मी हिंदी सिनेमे बघणं फारच कमी केलं, त्यामुळे पुढची सगळी उदाहरणं जरा जुन्या सिनेमांमधली आहेत. पण आपल्या समाजाचा mindset आजही तोच आहे.

हिंदी सिनेमामध्ये दोन व्यक्तींमध्ये जोरदार भांडण चालू असेल आणि ते अगदी क्लायमॅक्सला आलं की एक व्यक्ती दुसरीच्या कानाखाली वाजवून त्या भांडणाचा निकाल लावणार हे ठरलेलंच! पण यातसुद्धा बॉलीवूडचे काही अलिखित नियम असतात.

१. जर हे भांडण एक पुरुष आणि एक स्त्री असं असेल तर कायम हे कानाखाली वाजवण्याचं काम पुरुषच करतो. अपवाद : ती बाई त्याची आई असेल तरच!

२. जर अपवाद म्हणून आई सोडून एखाद्या बाईनं पुरुषाच्या कानाखाली वाजवलीच, तर सिनेमामध्ये पुढे तो तिला तिची "योग्य जागा" दाखवून देतो!

असाच दुसरा नियम म्हणजे कौटुंबिक चित्रपटात एखादी बाई जर आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असेल, मेकअप वगैरे करत असेल, मॉडर्न ड्रेसिंग करत असेल तर ती नक्की "व्हॅम्प" असते, टिपिकल काडीमास्टर! याउलट नवऱ्यावर सर्व बाबतीत अवलंबून असणारी, सतत घरात (आणि अफाट एकत्र कुटुंबामध्ये) वावरणारी, सहनशील गृहिणी असणारी बाई म्हणजे सदगुणांची खाणच! हेच सगळं बॉलीवूडमधून टीव्ही मालिकांमध्ये उतरतं आणि सगळ्यात गम्मत म्हणजे या मालिकांचा सर्वात मोठा प्रेक्षकवर्ग महिलाच असतात !

हिरोईन जर आर्थिक-सामाजिक-बौद्धिकदृष्ट्या हिरोला वरचढ असेल तर हिरो "man with a golden heart" असतो, आणि हिरोईन शक्यतो माजुर्डी असते, जिला हिरो नंतर तिची जागा दाखवून देतो.

वानगीदाखल काही चित्रपटांचं उदाहरण बघू. यातले काही सिनेमे सो कॉल्ड "कुटुंबानं आवर्जून एकत्र बसून बघण्यासारखे" चित्रपट आहेत, तर काही चित्रपटांत स्त्री पात्रांचा मुख्य रोल आहे. हे सगळे हिट / सुपरहिट चित्रपट आहेत.

१. हम आपके है कौन - जेव्हा रेणुका शहाणे (एकदाची) मरते, आणि चित्रपटात पहिल्यांदा काहीतरी संघर्ष येतो, तेव्हा अजित वाच्छानी काडीमास्टर बिंदूच्या कानाखाली आवाज काढतो आणि म्हणतो... "तुझ्या याच स्वभावामुळे आपल्याला मूल झालं नाही". म्हणजे मूल न होणं यामध्ये पुरुष म्हणून आपला कसलाही दोष नाही हे हळूच तो सांगून टाकतो! कुटुंबानं एकत्र बसून पाहण्याच्या सिनेमामध्ये आपल्याला प्रेमिकांनी किस केलेलं चालत नाही, पण एवढे भयानक हिंसक डायलॉग चालतात!

२. लाडला - अनिल कपूर-श्रीदेवीचा हा चित्रपट बऱ्याच लोकांना आठवणार नाही. पण मूर्तिमंत sexist चित्रपट बघायचा असेल तर आवर्जून बघावा. एका मोठया औद्योगिक साम्राज्याची मालकीण असलेल्या श्रीदेवीला बेरोजगार अनिल कपूर शिकवतो .. "मर्द कि शान है सर उठाके चलना, औरत की शान है सर झुकाके चलना!", आणि शेवटी श्रीदेवी आपला सगळा बिझनेस नवर्याच्या हवाली करून सकाळी त्याचा डबा भरून द्यायचं काम करते!

३. दामिनी - या चित्रपटाचं नाव पाहून कदाचित काहीजणांच्या भुवया उंचावतील, कारण हा सर्व चित्रपट एका स्त्रीनं दुसऱ्या स्त्रीला न्याय मिळवून देण्याबद्दल होता. पण आजही "दामिनी" म्हणलं की आठवतो तो "ढाई किलो का हाथ" वाला सनी देओलच! दामिनी पहिल्यापासून शेवटपर्यंत अबलाच राहते (शेवटच्या एका प्रसंगाचा अपवाद सोडून)!

४. लगान - सगळं छान चाललं असताना शेवटच्या पाच मिनिटांत सगळी घाण केलीये. भुवनचं गौरीशी लग्न झालं आणि एलिझाबेथ परत इंग्लंडला निघून गेली एवढंच सांगितलं असतं तर काय बिघडलं असतं? ती एलिझाबेथ आयुष्यभर लग्न न करता राहिली हे कशाला बोलायचं? म्हणजे भुवन तिला भाव देत नाही हे माहित असूनही तिनं मात्र त्याच्याशीच एकनिष्ठ राहायचं? का?

भुवन मात्र त्याचं काम होईपर्यंत सोयीस्करपणे दोन्ही डगरींवर पाय ठेवून उभा असतो!

५. रंग दे बसंती - इथे जरा उलटा मामला आहे. म्हणजे AIR च्या इमारतीवर धाड टाकणं, खून करणं हि सगळी कामं पुरुष लोक करतात, शेवटी गोळ्या खाऊन मरतातही तेच. बायका फक्त "मार दो सबको" म्हणून त्यांना पुढे पाठवतात. कारण त्या अबला! बंदूक उचलण्याएवढी पण ताकद नसते त्यांच्यात!

६. रंगीला - अजिबात कोणतीही महत्वाकांक्षा नसणारा, अल्पसंतुष्ट (आणि अल्पमती!) हिरो आणि प्रचंड महत्वाकांक्षी, मोठी स्वप्नं पाहणारी आणि ती प्रत्यक्षात आणण्यासाठी पडेल ती मेहनत करणारी हिरॉईन. पण शेवटी सगळं सोडून ती त्याच्याचकडे जाते. कारण एक व्यक्ती म्हणून आपली क्षमता अजमावण्यापेक्षा पुरुषाचं प्रेम महत्वाचं ! सुदैवानं चित्रपट इथेच संपतो आणि पुढे त्यांच्या संसाराची होणारी वाताहत बघण्यापासून आपल्याला वाचवतो!

७. फूल और कांटे - अत्यंत डोक्यात जाणारा अजय देवगणचा पहिला चित्रपट! पहिल्या अर्ध्या तासात हा प्राणी हिरॉईनला एवढा त्रास देतो की बाकी कुठल्याही देशात हा जेलमध्ये सडायला गेला असता! पण इथे हिरोईन त्याला वश होते!

ही काही मोजकी उदाहरणं जरी पहिली तरी आपण लैंगिक छळाचं आणि अघोषित हिंसेचं कसं उदात्तीकरण करतो हे लक्षात येईल. चित्रपटातील जग आणि खरं जग यातलं अंतर समजण्याची समज सर्वानाच असते असंही नाही. त्यामुळे हेच सगळं आपल्या आसपास चालत राहतं. त्याची सवयही होऊन जाते. आणि मग त्याचं जस्टिफिकेशनपण दिलं जातं. मुलींचे कपडे, त्यांचा मेकअप यावर घसरून त्यांच्यावर दोष ढकलला जातो.

पण आपल्या मुलांना (आणि स्वतःलाही) आपल्या भावना कंट्रोल करणं शिकवणं हे त्यावर खरा उपाय नाही का? सिंगापूर-दुबईसारख्या ठिकाणी कायद्याच्या धाकानं कोणीही बायका-मुलींकडे वाकड्या नजरेनं बघायची हिम्मत करत नाही. यूरोपात मी २-२.५ वर्षं काढली. काही अपवाद वगळता कुठेही छेडछाड, किंवा निदान छेडछाडीचं उदात्तीकरण पाहिलं नाही. हे प्रकार होत नसतीलच असं नाही, पण हे चुकीचं आहे यावर तरी एकमत असतं.

ज्या दिवशी कोणतीही व्यक्ती, मग ती स्त्री असो, पुरुष व किन्नर, कोणत्याही लैंगिक छळाच्या भीतीविना आपल्या गाव-शहरांमधून वावरू शकेल त्यावेळी आपण भारतीय समाजात असल्याचा खऱ्या अर्थानं अभिमान वाटेल.

No comments:

Post a Comment

मुलींचे कपडे आणि NCB

परवा फेसबुकवर भिंतींना तुंबड्या लावत बसलेलो असताना माझ्या मित्रयादीतील एकाची पोस्ट पाहिली . सध्या बॉलीवूडमध्ये ड्रग्सवरून जे ...