Tuesday, December 5, 2017

शब्दचित्रं - At the Wrong End of the Gun!


कधी कधी आयुष्यात असे प्रसंग येतात जे आपण फक्त सिनेमात बघतो आणि जे फक्त इतरांच्या आयुष्यात येतात अशी आपली समजूत असते.  पण जेव्हा ते आपल्या बाबतीत घडतात तेव्हा त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी हेसुद्धा त्या क्षणी कळत नाही.  असाच एक प्रसंग घडला २००४ साली.

त्या वेळी मी नुकतीच एक मोठी IT कंपनी जॉईन केली होती आणि नवीन ठिकाणी स्वतःला शाबीत करण्याची माझी खाज अजून शिल्लक होती. त्यामुळे जेव्हा एका नवीन येऊ घातलेल्या प्रोजेक्टसाठी मला विचारण्यात आलं तेव्हा मी तात्काळ होकार दिला. हा प्रोजेक्ट एका जर्मन कंपनीसाठी होता. सुरुवातीला १-२ महिने जर्मनीला जाऊन क्लायंटच्या ऑफिसमधून काम करायचं होतं, आणि मग परत येऊन पुण्याच्या ऑफिसमधून.

ITच्या परंपरेला अनुसरून एक दिवस अचानक सांगण्यात आलं कि २ दिवसांनी लगेच उडायचं आहे. भराभर पॅकिंग आटपून मी आणि माझा एक सहकारी फ्रॅन्कफुर्टला रवाना झालो.

तो फेब्रुवारी महिना होता आणि जर्मनीमध्ये आपल्या मानानं प्रचंड थंडी होती. त्यातून फ्रॅन्कफुर्ट शहरात गगनचुंबी इमारतींमुळे हवेचे जोरदार झोत जमिनीलगत वाहतात आणि त्या थन्डीमध्ये "चिल फॅक्टर" ची भर पडते. अर्थातच तिथे पोचल्या पोचल्या आम्ही चांगलेच "गार" पडलो होतो!

आम्हाला आमचा भत्ता travellers cheques च्या स्वरूपात देण्यात आला होता. ते फ्रॅन्कफुर्टला जाऊन तिथल्या थॉमस कूकच्या ऑफिसमध्ये एनकॅश करायचे होते. हे ऑफिस फ्रॅन्कफुर्टच्या मुख्य रेल्वे स्टेशनच्या अगदी जवळ आहे असं आम्हाला सांगण्यात आलं होतं. अर्थात फ्रॅन्कफुर्टच्या मुख्य रेल्वे स्टेशनचं अजून एक वैशिष्ठ्य इथे नमूद करायला पाहिजे. ते म्हणजे ऍमस्टरडॅमप्रमाणे फ्रॅन्कफुर्टची वेश्यावस्ती पण त्याच रेल्वे स्टेशनच्या समोर आहे! स्टेशनमधून बाहेर येऊन मुख्य रस्त्याला लागलं कि ओळीनं दुतर्फा सेक्स शॉप्स आणि लालबत्तीच्या रांगा दिसतात.

दिवसा हा इलाका तसा शांत असतो. संध्याकाळ होते तसा "माहोल" तयार होऊ लागतो. आम्ही सकाळी सकाळीच कॅश आणायला थॉमस कूकच्या ऑफिसमध्ये जायला निघालो. आता "या" इलाक्यातून कॅश घेऊन यायची म्हणजे थोडं टेन्शन होतं. पण दिवसाढवळ्या काही लफडं होणार नाही अशी एक आशा होती.

आम्ही स्टेशनवर उतरून मुख्य रस्त्याला लागलो. आम्हाला जेमतेम ३-४ चौक पार करून त्या ऑफिसमध्ये जायचं होतं. सकाळ असूनही हाडं गोठवणारी थंडी होती, आणि वारा पण भन्नाट होता. मी कपड्यांचे दोन थर चढवले होते. हातात गरम हातमोजे, जाड जॅकेट, डोक्यावर लोकरीची टोपी एवढं असूनही चेहरा थंडीनं बधीर होत होता. म्हणून अर्धा चेहरा मफलरनं झाकला होता.

आम्ही जेमतेम एक चौक पार केला असेल कि आम्हाला पोलीस किंवा अँब्युलन्सचा जसा सायरन वाजतो तसा आवाज येऊ लागला. आता कोणत्याही मोठ्या शहरात असे आवाज सतत कानावर आदळतच असतात. त्यामुळे अगदी ते आपल्या आसपास असले तरच तिकडे आपलं लक्ष जातं. आम्हीही तिकडे फारसं लक्ष दिलं नाही.

पण लवकरच तो आवाज खूपच जवळ आला आणि अचानक बंदच झाला. काहीतरी चुकतंय हे आमच्या लक्षात येतंय तोवर त्या आवाजाचं मूळ म्हणजे एक पोलीस व्हॅन कच्चकन ब्रेक मारून आमच्या पुढ्यात थांबली. आतून फिकट हिरव्या रंगाचे गणवेश घातलेले डझनभर आडदांड स्त्रीपुरुष जर्मन पोलीस दणादण उड्या मारून उतरले. सगळ्यांच्या हातात गन्स होत्या. आम्हाला काही समजायच्या आत त्यांनी आम्हांलाच घेराव घातला. आम्हाला हे काय झेपलंच नाही. कायतरी लफडं या एरियामध्ये झालंय आणि आपल्याला गम्मत बघायला मिळेल असं वाटेपर्यंत आपलीच गम्मत होतीये हे लक्षात आलं !

बाकीचे पोलीस आपापल्या बंदुकांवर हात ठेवून आमच्याकडे बघत होते. त्यांचा एक सव्वासहा फुटी कप्तान पुढे आला. मी माझ्या चेहऱ्यावरचा मफलर शहाण्या मुलासारखा बाजूला केला. त्यानं माझ्या खिशातून डोकावणाऱ्या एका वस्तूकडे बोट दाखवलं आणि इंग्लिशमध्ये विचारणा केली "What is that in your pocket?". त्याला बहुदा माझ्या खिशात काहीतरी हत्यार असल्याचा संशय होता.

आता माझ्या खिशात असणाऱ्या हत्याराचा उपयोग फक्त केस विंचरण्यापुरता होता हे मला माहित होतं. त्यामुळे तो कंगवा त्याला दाखवून टाकावा म्हणून मी चटकन खिशाकडे हात नेला. त्याबरोबर आसपासच्या ३-४ पोलिसांच्या हातातल्या गन्स झटकन वर येऊन माझ्यावर रोखल्या गेल्या. समोरची एक महिला पोलीस करड्या आवाजात म्हणाली ... "Empty your pocket very slowly". मी शक्य तेवढ्या हळुवारपणे तो कंगवा बाहेर काढला. मग त्यांनी आमचे पासपोर्ट बघायला मागितले. आत्तापर्यंतच्या अनुभवानं आम्ही शहाणे झालो होतो. त्या मुळे आम्ही हळूsssssच पासपोर्ट काढून त्यांना दाखवले. भारतीय पासपोर्ट बघून ते एकदमच निवळले, आणि त्या पासपोर्टवरचा "green card work permit" चा स्टॅम्प पाहूनतर मग ते प्रेमानेच बोलले.

तोपर्यंत त्यांची खात्री पटली होती की ते ज्या लोकांना शोधत होते ते आम्ही नव्हतो. मग लगेच त्यांनी गाडीत उड्या टाकल्या आणि सगळे अंतर्धान पावले.

हा सगळं प्रसंग जास्तीत जास्त पाच मिनीटांत संपला असेल. हे सर्व चालू होतं त्या वेळी विचारही करायला वेळ नव्हता इतकं सगळं वेगानं घडत होतं. त्या पोलिसांनी ज्यावेळी माझ्यावर त्यांची पिस्तुलं रोखली होती त्याक्षणी मला काडीचीही भीती वाटली नव्हती. कारण मी काहीच गुन्हा न केल्याची मला खात्री होती. पण जसे ते लोक गेले तशी मला जाणीव झाली की त्यावेळी काहीही होऊ शकलं असतं. त्या पोलिसांना जर मी धोकादायक वाटलो असतो तर त्यांनी माझ्यावर फायर करायलाही मागे पुढे पाहिलं नसतं! पुढची काही मिनिटं चांगलीच फाटली होती.

त्यानंतर महिनाभर मी फ्रॅन्कफुर्टमधे राहिलो, आणि नंतरसुद्धा दोन वेळा तिथे गेलो. पण पुढचे दिवस कोणत्याही "गनदर्शना" शिवाय गेले.


गन्सच्या चुकीच्या टोकाला असण्याचा हा पहिला (आणि hopefully शेवटचा) अनुभव मात्र कायमचा लक्षात राहिला.

2 comments:

  1. मस्त रे शिरीष! वाचताना थोडी थंडी आणि थोडी घाबरगुंडी मीही अनुभवली!!
    - अपर्णा देशपांडे

    ReplyDelete
  2. Being in IT i always have a feeling of being at gun point! ☺ Well written Shirish!

    ReplyDelete

मुलींचे कपडे आणि NCB

परवा फेसबुकवर भिंतींना तुंबड्या लावत बसलेलो असताना माझ्या मित्रयादीतील एकाची पोस्ट पाहिली . सध्या बॉलीवूडमध्ये ड्रग्सवरून जे ...