हा प्रसंग अस्मादिकांच्या टीनएजमधला.
सर्व टीनएजर्सची जी अनेक स्वप्नं असतात त्यामधील एक प्रमुख स्वप्न म्हणजे निळे चित्रपट
(ज्यांना आमच्या कॉलेजमध्ये
"भक्त प्रल्हाद" असा पर्यायी शब्द होता),
ते बघणं. आताच्या युट्यूब आणि तत्सम साईट्सचं बाळकडू पिलेल्या आजच्या टीनएजर्सना असे चित्रपट पाहण्यासाठी त्यावेळी किती मगजमारी करावी लागे याची कल्पनाही करता येणार नाही.
व्हिडीओ कॅसेट भाड्यानं देणाऱ्या दुकानांत गेलं की हमखास मागे मागे रेंगाळणारी, इतर गिऱ्हाईक जाऊन काउंटर रिकामं व्हायची वाट बघणारी पोरं दिसायची.
दुकानदार सोयीस्करपणे त्यांना न बघितल्यासारखं करायचा. मग एकदाचं काउंटर रिकामं झालं की ती पोरं हळूच दबक्या आवाजात विचारणा करत ...
"BP पाहिजे होती".

तर अनेक वर्षांनी एकदा तो योग आला आणि आमच्या घराचे सगळे कधी नव्हे ते गावाला गेले.
मी अन माझ्या दोन मित्रांनी नीलचित्रपट बघण्याचा प्लॅन केला आणि एक कॅसेट आणली.
कॅसेटवर नाव पण एकदम नामी छापलं होतं
... "The Spread Legs of Madam Sex"!
आता हे एवढं मोठं नाव माझ्या कसं लक्षात राहिलं असा प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर लवकरच मिळेल.
कारण त्या मोठ्या नावामुळे पुढे बरेच घोळ झाले.
तर ती कॅसेट घेऊन येता येताच पहिली माशी शिंकली!
आम्ही राहत होतो त्या वाड्यात कशा प्रकारची लोकं राहायची त्यावर मी एक लेखच लिहिला आहे, त्यामुळे पुढे काही मी त्यावर लिहिणार नाही. पण त्यातल्या एका माणसानं एक कुत्रा पाळला होता.
आमच्या वाड्यात लोकच एकमेकांवर एवढे भुंकायचे की त्या कुत्र्याला काय कामच राहिलं नव्हतं.
तो आपला फक्त त्याच्या परीनं लोकांची शक्य तेवढी गैरसोय होईल या बेतानं जिन्याच्या वरच्या पायरीवर गप्प पडून असायचा. त्यामुळे कुठेपण जायचं तर त्याला ओलांडूनच जावं लागायचं.
आम्ही कॅसेट घेऊन परत आलो आणि मी जिना चढून वर येऊ लागलो.
तो कुत्रा नेहमीप्रमाणे जिन्याच्या वरच्या पायरीवर झोपला होता. मी वरून तिसऱ्या किंवा चवथ्या पायरीवर असेन, आणि एकदम मी अडखळलो.
प्रतिक्षिप्त क्रियेनं माझा एक हात आधारासाठी आपोआप पुढे आला
... आणि डायरेक्ट त्या कुत्र्याच्या तोंडावर आपटला! तो कुत्रा दचकून उठला आणि प्रतिक्षिप्त क्रियेनं त्यानं माझा पंजा काचकन दातात पकडला! २-३ सेकन्दात त्याला माझी ओळख पटली आणि त्यानं पंजा सोडला,
पण तोवर माझ्या हातावर त्याच्या दातांची मस्त नक्षी उमटली होती!
माझा हात सुजायला लागला होता. पण सुदैवानं रक्त आलं नव्हतं, आणि पाळीव कुत्रा असल्यामुळे तसा फार धोका नव्हता.
त्यामुळे सकाळी डॉक्टरला हात दाखवायचं असं ठरलं.
तसेच आम्ही घरी आलो.
एवढं रामायण झाल्यावर आता एकदाची फिल्म बघायची वेळ आली. आम्ही VCR मध्ये कॅसेट टाकली आणि रिवाइंड करायला लावली ... आणि गच्च्कन एक आचका देऊन VCR बंद पडला!
काही केल्या तो
VCR चालू होईना आणि कॅसेटपण बाहेर येईना! आमची प्रचंडच फाटली! त्यातही आम्हाला जास्त हळहळ याची वाटत
होती की ती कॅसेट बघायला पण मिळाली नव्हती!
VCR ला बंदच पडायचं होतं तर निदान फिल्म बघून झाल्यावर
तरी पडायचं होतं!
स्क्रूड्रायव्हर घेऊन तो VCR चा स्लॉट
उघडण्याचे अनंत प्रयत्न झाले. VCR चालू-बंद करून, राग- रागानं बडवून झाला. पण पट्ठ्यानं कशालाही दाद दिली नाही. सगळे प्रयत्न
वाया गेले आणि आता हेपण काम उद्या करणं गळ्यात आलं.
आता कॅसेट काही केल्या बाहेर येत नाही हे लक्षात आल्यावर पुढचा प्रश्न आला. ते लांबलचक नाव कॅसेट्च्या स्लॉटमधून स्पष्ट दिसत होतं!
उद्या दुरुस्तीला जाताना ते झाकणं गरजेचं होतं,
कारण आमच्याकडे या सगळ्या गोष्टींची दुरुस्ती करण्याचं ठिकाण एकच होतं, माझ्या एका लांबच्या मामाचं दुकान!! तिथे जाऊन त्यांनी "हे" नाव पाहून घरी रिपोर्ट दिलाच असता आणि आमची उत्तरपूजा मांडली गेली असती! मग आम्ही एका कागदाच्या पट्टीवर "Raiders of the Lost Ark" ची पट्टी तयार केली आणि कॅसेट्च्या स्लॉट्मधे बोटं घालून ओरिजनल नावावर चिकटवलं.
दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी डॉक्टरकडे जाण्याआधी तो VCR घेऊन दुकानात गेलो. मेकॅनिक VCR उघडून ती कॅसेट काढेपर्यंत त्याच्या डोक्याभोवतीच मी घोंघावत होतो. ज्याक्षणी ती कॅसेट बाहेर आली त्याक्षणी ती ताब्यात घेतली आणि तडक कॅसेट्च्या दुकानात परत नेऊन दिली.
मगच येता येता डॉक्टरकडे गेलो.
हा सगळा प्रकार शेवटी सुमडीत आटपला असला तरी त्या वेळी चांगलीच फाटली होती. अर्थात त्यावेळी जेवढी अशक्य फाटलेली असते तेवढी नंतर त्या आठवणींची गम्मत वाटते हेही खरंच
:-D.
No comments:
Post a Comment