Thursday, December 7, 2017

जोडीची स्टोरी - भांडण

माझं आणि तिचं भांडण झालं. २ दिवसांच्या अबोल्यानंतर शेवटी मी तोंड उघडलं.

तिनं अतिशय मुद्देसूदपणे माझी चूक मला पटवून दिली.

मी सॉरी म्हणलं. आमचं भांडण मिटलं.

परत एकदा माझं आणि तिचं भांडण झालं. २ दिवसांच्या अबोल्यानंतर शेवटी मी तोंड उघडलं.

मी अतिशय मुद्देसूदपणे तिची चूक तिला पटवून दिली.

तिच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहायला लागले!

मी सॉरी म्हणलं आणि तिला गिफ्ट आणून दिली. मग आमचं भांडण मिटलं!

बंड्याउवाच - "तसले" निळे चित्रपट!

हा प्रसंग अस्मादिकांच्या टीनएजमधला. सर्व टीनएजर्सची जी अनेक स्वप्नं असतात त्यामधील एक प्रमुख स्वप्न म्हणजे निळे चित्रपट (ज्यांना आमच्या कॉलेजमध्ये "भक्त प्रल्हाद" असा पर्यायी शब्द होता), ते बघणं. आताच्या युट्यूब आणि तत्सम साईट्सचं बाळकडू पिलेल्या आजच्या टीनएजर्सना असे चित्रपट पाहण्यासाठी त्यावेळी किती मगजमारी करावी लागे याची कल्पनाही करता येणार नाही.

व्हिडीओ कॅसेट भाड्यानं देणाऱ्या दुकानांत गेलं की हमखास मागे मागे रेंगाळणारी, इतर गिऱ्हाईक जाऊन काउंटर रिकामं व्हायची वाट बघणारी पोरं दिसायची. दुकानदार सोयीस्करपणे त्यांना बघितल्यासारखं करायचा. मग एकदाचं काउंटर रिकामं झालं की ती पोरं हळूच दबक्या आवाजात विचारणा करत ...  "BP पाहिजे होती".

त्यात कुणी आधी येऊन गेलेला अनुभवी पोट्ट्या दिसला तर दुकानदार नीट बोलायचा, नाहीतर पार हाडूतहुडुत करायचा. मग जरा बावळट असणारी पोरं रडक्या चेहऱ्यानं बाहेर पडायची. "तयार" पोरं दामटून तिथेच थांबायची. मग दुकानदार त्यांना एका कोपऱ्यात बोलवायचा आणि आतून ठेवणीतला माल आणून द्यायचा. त्या बदल्यात एखाद्याचं ड्रायविंग लायसन्स तिथे ठेवावं लागायचं डिपॉझिट म्हणून. एवढं करून त्या टीचभर घरांमध्ये प्रायव्हसी नावाची काय चीजच नसायची बघण्यासाठी.

तर अनेक वर्षांनी एकदा तो योग आला आणि आमच्या घराचे सगळे कधी नव्हे ते गावाला गेले. मी अन माझ्या दोन मित्रांनी नीलचित्रपट बघण्याचा प्लॅन केला आणि एक कॅसेट आणली. कॅसेटवर नाव पण एकदम नामी छापलं होतं ... "The Spread Legs of Madam Sex"!

आता हे एवढं मोठं नाव माझ्या कसं लक्षात राहिलं असा प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर लवकरच मिळेल. कारण त्या मोठ्या नावामुळे पुढे बरेच घोळ झाले.

तर ती कॅसेट घेऊन येता येताच पहिली माशी शिंकली!

आम्ही राहत होतो त्या वाड्यात कशा प्रकारची लोकं राहायची त्यावर मी एक लेखच लिहिला आहे, त्यामुळे पुढे काही मी त्यावर लिहिणार नाही. पण त्यातल्या एका माणसानं एक कुत्रा पाळला होता. आमच्या वाड्यात लोकच एकमेकांवर एवढे भुंकायचे की त्या कुत्र्याला काय कामच राहिलं नव्हतं. तो आपला फक्त त्याच्या परीनं लोकांची शक्य तेवढी गैरसोय होईल या बेतानं जिन्याच्या वरच्या पायरीवर गप्प पडून असायचा. त्यामुळे कुठेपण जायचं तर त्याला ओलांडूनच जावं लागायचं.

आम्ही कॅसेट घेऊन परत आलो आणि मी जिना चढून वर येऊ लागलो. तो कुत्रा नेहमीप्रमाणे जिन्याच्या वरच्या पायरीवर झोपला होता. मी वरून तिसऱ्या किंवा चवथ्या पायरीवर असेन, आणि एकदम मी अडखळलो. प्रतिक्षिप्त क्रियेनं माझा एक हात आधारासाठी आपोआप पुढे आला ... आणि डायरेक्ट त्या कुत्र्याच्या तोंडावर आपटला! तो कुत्रा दचकून उठला आणि प्रतिक्षिप्त क्रियेनं त्यानं माझा पंजा काचकन दातात पकडला! - सेकन्दात त्याला माझी ओळख पटली आणि त्यानं पंजा सोडला, पण तोवर माझ्या हातावर त्याच्या दातांची मस्त नक्षी उमटली होती!

माझा हात सुजायला लागला होता. पण सुदैवानं रक्त आलं नव्हतं, आणि पाळीव कुत्रा असल्यामुळे तसा फार धोका नव्हता. त्यामुळे सकाळी डॉक्टरला हात दाखवायचं असं ठरलं. तसेच आम्ही घरी आलो.

एवढं रामायण झाल्यावर आता एकदाची फिल्म बघायची वेळ आली. आम्ही VCR मध्ये कॅसेट टाकली आणि रिवाइंड करायला लावली ... आणि गच्च्कन एक आचका देऊन VCR बंद पडला! काही केल्या तो VCR चालू होईना आणि कॅसेटपण बाहेर येईना! आमची प्रचंडच फाटली! त्यातही आम्हाला जास्त हळहळ याची वाटत होती की ती कॅसेट बघायला पण मिळाली नव्हती! VCR ला बंदच पडायचं होतं तर निदान फिल्म बघून झाल्यावर तरी पडायचं होतं!

स्क्रूड्रायव्हर घेऊन तो VCR चा स्लॉट उघडण्याचे अनंत प्रयत्न झाले. VCR चालू-बंद करून, राग- रागानं बडवून झाला. पण पट्ठ्यानं कशालाही दाद दिली नाही. सगळे प्रयत्न वाया गेले आणि आता हेपण काम उद्या करणं गळ्यात आलं.

आता कॅसेट काही केल्या बाहेर येत नाही हे लक्षात आल्यावर पुढचा प्रश्न आला. ते लांबलचक नाव कॅसेट्च्या स्लॉटमधून स्पष्ट दिसत होतं! उद्या दुरुस्तीला जाताना ते झाकणं गरजेचं होतं, कारण आमच्याकडे या सगळ्या गोष्टींची दुरुस्ती करण्याचं ठिकाण एकच होतं, माझ्या एका लांबच्या मामाचं दुकान!! तिथे जाऊन त्यांनी "हे" नाव पाहून घरी रिपोर्ट दिलाच असता आणि आमची उत्तरपूजा मांडली गेली असती! मग आम्ही एका कागदाच्या पट्टीवर "Raiders of the Lost Ark" ची पट्टी तयार केली आणि कॅसेट्च्या स्लॉट्मधे बोटं घालून ओरिजनल नावावर चिकटवलं.

दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी डॉक्टरकडे जाण्याआधी तो VCR घेऊन दुकानात गेलो. मेकॅनिक VCR उघडून ती कॅसेट काढेपर्यंत त्याच्या डोक्याभोवतीच मी घोंघावत होतो. ज्याक्षणी ती कॅसेट बाहेर आली त्याक्षणी ती ताब्यात घेतली आणि तडक कॅसेट्च्या दुकानात परत नेऊन दिली. मगच येता येता डॉक्टरकडे गेलो.


हा सगळा प्रकार शेवटी सुमडीत आटपला असला तरी त्या वेळी चांगलीच फाटली होती. अर्थात त्यावेळी जेवढी अशक्य फाटलेली असते तेवढी नंतर त्या आठवणींची गम्मत वाटते हेही खरंच :-D.

Tuesday, December 5, 2017

शब्दचित्रं - At the Wrong End of the Gun!


कधी कधी आयुष्यात असे प्रसंग येतात जे आपण फक्त सिनेमात बघतो आणि जे फक्त इतरांच्या आयुष्यात येतात अशी आपली समजूत असते.  पण जेव्हा ते आपल्या बाबतीत घडतात तेव्हा त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी हेसुद्धा त्या क्षणी कळत नाही.  असाच एक प्रसंग घडला २००४ साली.

त्या वेळी मी नुकतीच एक मोठी IT कंपनी जॉईन केली होती आणि नवीन ठिकाणी स्वतःला शाबीत करण्याची माझी खाज अजून शिल्लक होती. त्यामुळे जेव्हा एका नवीन येऊ घातलेल्या प्रोजेक्टसाठी मला विचारण्यात आलं तेव्हा मी तात्काळ होकार दिला. हा प्रोजेक्ट एका जर्मन कंपनीसाठी होता. सुरुवातीला १-२ महिने जर्मनीला जाऊन क्लायंटच्या ऑफिसमधून काम करायचं होतं, आणि मग परत येऊन पुण्याच्या ऑफिसमधून.

ITच्या परंपरेला अनुसरून एक दिवस अचानक सांगण्यात आलं कि २ दिवसांनी लगेच उडायचं आहे. भराभर पॅकिंग आटपून मी आणि माझा एक सहकारी फ्रॅन्कफुर्टला रवाना झालो.

तो फेब्रुवारी महिना होता आणि जर्मनीमध्ये आपल्या मानानं प्रचंड थंडी होती. त्यातून फ्रॅन्कफुर्ट शहरात गगनचुंबी इमारतींमुळे हवेचे जोरदार झोत जमिनीलगत वाहतात आणि त्या थन्डीमध्ये "चिल फॅक्टर" ची भर पडते. अर्थातच तिथे पोचल्या पोचल्या आम्ही चांगलेच "गार" पडलो होतो!

आम्हाला आमचा भत्ता travellers cheques च्या स्वरूपात देण्यात आला होता. ते फ्रॅन्कफुर्टला जाऊन तिथल्या थॉमस कूकच्या ऑफिसमध्ये एनकॅश करायचे होते. हे ऑफिस फ्रॅन्कफुर्टच्या मुख्य रेल्वे स्टेशनच्या अगदी जवळ आहे असं आम्हाला सांगण्यात आलं होतं. अर्थात फ्रॅन्कफुर्टच्या मुख्य रेल्वे स्टेशनचं अजून एक वैशिष्ठ्य इथे नमूद करायला पाहिजे. ते म्हणजे ऍमस्टरडॅमप्रमाणे फ्रॅन्कफुर्टची वेश्यावस्ती पण त्याच रेल्वे स्टेशनच्या समोर आहे! स्टेशनमधून बाहेर येऊन मुख्य रस्त्याला लागलं कि ओळीनं दुतर्फा सेक्स शॉप्स आणि लालबत्तीच्या रांगा दिसतात.

दिवसा हा इलाका तसा शांत असतो. संध्याकाळ होते तसा "माहोल" तयार होऊ लागतो. आम्ही सकाळी सकाळीच कॅश आणायला थॉमस कूकच्या ऑफिसमध्ये जायला निघालो. आता "या" इलाक्यातून कॅश घेऊन यायची म्हणजे थोडं टेन्शन होतं. पण दिवसाढवळ्या काही लफडं होणार नाही अशी एक आशा होती.

आम्ही स्टेशनवर उतरून मुख्य रस्त्याला लागलो. आम्हाला जेमतेम ३-४ चौक पार करून त्या ऑफिसमध्ये जायचं होतं. सकाळ असूनही हाडं गोठवणारी थंडी होती, आणि वारा पण भन्नाट होता. मी कपड्यांचे दोन थर चढवले होते. हातात गरम हातमोजे, जाड जॅकेट, डोक्यावर लोकरीची टोपी एवढं असूनही चेहरा थंडीनं बधीर होत होता. म्हणून अर्धा चेहरा मफलरनं झाकला होता.

आम्ही जेमतेम एक चौक पार केला असेल कि आम्हाला पोलीस किंवा अँब्युलन्सचा जसा सायरन वाजतो तसा आवाज येऊ लागला. आता कोणत्याही मोठ्या शहरात असे आवाज सतत कानावर आदळतच असतात. त्यामुळे अगदी ते आपल्या आसपास असले तरच तिकडे आपलं लक्ष जातं. आम्हीही तिकडे फारसं लक्ष दिलं नाही.

पण लवकरच तो आवाज खूपच जवळ आला आणि अचानक बंदच झाला. काहीतरी चुकतंय हे आमच्या लक्षात येतंय तोवर त्या आवाजाचं मूळ म्हणजे एक पोलीस व्हॅन कच्चकन ब्रेक मारून आमच्या पुढ्यात थांबली. आतून फिकट हिरव्या रंगाचे गणवेश घातलेले डझनभर आडदांड स्त्रीपुरुष जर्मन पोलीस दणादण उड्या मारून उतरले. सगळ्यांच्या हातात गन्स होत्या. आम्हाला काही समजायच्या आत त्यांनी आम्हांलाच घेराव घातला. आम्हाला हे काय झेपलंच नाही. कायतरी लफडं या एरियामध्ये झालंय आणि आपल्याला गम्मत बघायला मिळेल असं वाटेपर्यंत आपलीच गम्मत होतीये हे लक्षात आलं !

बाकीचे पोलीस आपापल्या बंदुकांवर हात ठेवून आमच्याकडे बघत होते. त्यांचा एक सव्वासहा फुटी कप्तान पुढे आला. मी माझ्या चेहऱ्यावरचा मफलर शहाण्या मुलासारखा बाजूला केला. त्यानं माझ्या खिशातून डोकावणाऱ्या एका वस्तूकडे बोट दाखवलं आणि इंग्लिशमध्ये विचारणा केली "What is that in your pocket?". त्याला बहुदा माझ्या खिशात काहीतरी हत्यार असल्याचा संशय होता.

आता माझ्या खिशात असणाऱ्या हत्याराचा उपयोग फक्त केस विंचरण्यापुरता होता हे मला माहित होतं. त्यामुळे तो कंगवा त्याला दाखवून टाकावा म्हणून मी चटकन खिशाकडे हात नेला. त्याबरोबर आसपासच्या ३-४ पोलिसांच्या हातातल्या गन्स झटकन वर येऊन माझ्यावर रोखल्या गेल्या. समोरची एक महिला पोलीस करड्या आवाजात म्हणाली ... "Empty your pocket very slowly". मी शक्य तेवढ्या हळुवारपणे तो कंगवा बाहेर काढला. मग त्यांनी आमचे पासपोर्ट बघायला मागितले. आत्तापर्यंतच्या अनुभवानं आम्ही शहाणे झालो होतो. त्या मुळे आम्ही हळूsssssच पासपोर्ट काढून त्यांना दाखवले. भारतीय पासपोर्ट बघून ते एकदमच निवळले, आणि त्या पासपोर्टवरचा "green card work permit" चा स्टॅम्प पाहूनतर मग ते प्रेमानेच बोलले.

तोपर्यंत त्यांची खात्री पटली होती की ते ज्या लोकांना शोधत होते ते आम्ही नव्हतो. मग लगेच त्यांनी गाडीत उड्या टाकल्या आणि सगळे अंतर्धान पावले.

हा सगळं प्रसंग जास्तीत जास्त पाच मिनीटांत संपला असेल. हे सर्व चालू होतं त्या वेळी विचारही करायला वेळ नव्हता इतकं सगळं वेगानं घडत होतं. त्या पोलिसांनी ज्यावेळी माझ्यावर त्यांची पिस्तुलं रोखली होती त्याक्षणी मला काडीचीही भीती वाटली नव्हती. कारण मी काहीच गुन्हा न केल्याची मला खात्री होती. पण जसे ते लोक गेले तशी मला जाणीव झाली की त्यावेळी काहीही होऊ शकलं असतं. त्या पोलिसांना जर मी धोकादायक वाटलो असतो तर त्यांनी माझ्यावर फायर करायलाही मागे पुढे पाहिलं नसतं! पुढची काही मिनिटं चांगलीच फाटली होती.

त्यानंतर महिनाभर मी फ्रॅन्कफुर्टमधे राहिलो, आणि नंतरसुद्धा दोन वेळा तिथे गेलो. पण पुढचे दिवस कोणत्याही "गनदर्शना" शिवाय गेले.


गन्सच्या चुकीच्या टोकाला असण्याचा हा पहिला (आणि hopefully शेवटचा) अनुभव मात्र कायमचा लक्षात राहिला.

मुलींचे कपडे आणि NCB

परवा फेसबुकवर भिंतींना तुंबड्या लावत बसलेलो असताना माझ्या मित्रयादीतील एकाची पोस्ट पाहिली . सध्या बॉलीवूडमध्ये ड्रग्सवरून जे ...