Friday, December 27, 2019

हम (हिंदुस्तानी) नहीं सुधरेंगे!!


हम (हिंदुस्तानी) नहीं सुधरेंगे!!
––––––––––––––––
काल कंबोडिअमधील एक मंदिराच्या बाहेर मी स्केचिंग करत असताना एक तरुणांचा ग्रुप तिथे आला. त्यांच्या चेहऱ्यावरून ते भारतीय आहेत हे लगेच माझ्या लक्षात आलं.
त्यांच्यापैकी 2-3 जण कुतूहलाने माझ्याइथे आले, माझं स्केचिंग बघून बरेच लोक बघायला येतात तसे. मग त्यांनी बोलायला सुरुवात केली इंग्लिश मधून. मी त्यांना विचारले कुठून आलात तसे एकजण म्हणाला मुंबईतून.
मग मी त्यांच्याशी मराठीत बोललो तसे ते भलतेच एक्साईट झाले! ते पण सगळे मराठीच होते. मग एकदम 'आईच्या गावात' पासून सुरुवात झाली आणि आपला मराठी माणूस कसा इथे भेटला यावर आनंद व्यक्त झाला.
मग एकानं माझं नाव विचारलं, आणि माझं आडनाव ऐकल्यावर त्याच्या तोंडून पहिलं वाक्य बाहेर पडलं ते हे... "हां चेहरा पाहिल्यावर मी म्हणलंच, हे नक्की 'भट' असणार".
अर्थात त्याचा उद्देश तुच्छतेचा नव्हता, त्याच्या तोंडून हे वाक्य निघून गेलं. त्यानंतरही आमचं थोडंफार बोलणं झालं आणि ते सगळे त्यांच्या मार्गानं गेले.
पण या प्रसंगामुळे मला दोन गोष्टी नव्यानं कळल्या:
1. भारतीय माणूस जगात कुठेही गेला तरी त्याची 'जात' काहीकेल्या जात नाही.
2.
भारतात भेटा नाहीतर हजारो मैल दूर, आपली लोकं काय सुधारणार नाहीत!

हम (हिंदुस्तानी) नहीं सुधरेंगे!! अजून एक....
––––––––––––––––––––––––
कंबोडिअमधील मंदिरे अतिशय प्राचीन आहेत, जवळ जवळ 800-900 वर्षे जुनी. त्यातून अनेक शतकं ही मंदिरे जंगलांनी वेढलेली होती. त्यामुळे ती बरीच जीर्ण झाली आहेत. अनेक ठिकाणचे चिरे ढासळत आले आहेत. ही मंदिरे आहे त्या स्थितीत ठेवण्यासाठीसुद्धा प्रचंड कष्ट आणि पैसे लागतात.
साहजिकच कंबोडियन लोक ही मंदिरे उत्तम स्थितीत ठेवण्यासाठी अपार कष्ट करतात. पर्यटकांकडून जरी यासाठी पैसा येत असला तरी पर्यटकांनी मंदिरांना भेट देताना किमान जबाबदारीनं वागावं अशी त्यांची अपेक्षा असते.
बायॉन या तिथल्या प्रसिद्ध मंदिरात गेलो असताना माझ्या समोरच घडलेला हा किस्सा:
भारतीय लोकांचा एक ग्रुप माझ्या समोरून चालला होता. मी जिथे उभा होतो तिथून जवळच एक फोटोसाठी प्रसिद्ध स्पॉट होता. बरेच लोक तिथे येऊन फोटो काढत होते. हा स्पॉट मंदिराच्या वरच्या मजल्याच्या एका कडेला होता. तिथून खाली १०-१५ फूट थेट ड्रॉप होता. कुणी खाली पडलं तर थेट कपाळमोक्षच! त्यातून तिथले कडेचे दगड कधीही सुटून येतील अशा स्थितीत होते. त्यामुळे त्या दगडांच्या थोडं अलीकडे पाटी लावली होती की दगडांवर बसू नये.
या भारतीय पर्यटकांमधली एक बाई बरोबर जाऊन त्या दगडावर बसली आणि स्वतःचे बरेच फोटो काढून घेतलें. तिच्याच ग्रुपमधला एक माणूस जेव्हा तिला ती पाटी दाखवू लागला तेव्हा तिने ही मुक्ताफळे उधळली... 'क्या कर लेंगे...ज्यादा से ज्यादा कोई सिक्यूरिटीवाला आके बोलगा इधर मत बैठो. Sorry बोल देने का और उठने का, तब तक फोटो निकाल!'
म्हणजे आपल्याखाली जे दगड आहेत निखळले तर आपला जीव जाईल, किंवा आपल्यामुळे एखाद्या हेरिटेज साईटचे कायमचे नुकसान होईल, किंवा आपल्या देशाला नावं ठेवली जातील अशा किरकोळ गोष्टींची तिला काहीही फिकीर नव्हती. शेवटी फोटो चांगला येणं महत्वाचं! बाकी सगळ्या गोष्टी गौण आहेत!
त्यादिवशी कंबोडिअमधील लोकांना हिंदी येत नाही याबद्दल मला अतीव हायसं वाटलं!!


No comments:

Post a Comment

मुलींचे कपडे आणि NCB

परवा फेसबुकवर भिंतींना तुंबड्या लावत बसलेलो असताना माझ्या मित्रयादीतील एकाची पोस्ट पाहिली . सध्या बॉलीवूडमध्ये ड्रग्सवरून जे ...